Babajani Durani News, Parbhani Sarkarnama
मराठवाडा

Babajani Durani With Ajit Pawar: कोंडी होत असल्याने आमदार बाबाजानींनी शरद पवारांची साथ सोडली...

Prasad Shivaji Joshi

Parbhani NCP News : राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अजित पवार यांनी बंडाचा झेंडा फडकावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. (Marathwada Political News) त्यानंतर राज्यातील राष्ट्रवादीत फूट पडली आणि स्वतःला शरद पवारांचे कट्टर समर्थक म्हणवणारे अजितदादांच्या तंबूत शिरले.

परभणी जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष व विधान परिषदेचे आमदार बाबाजानी दुर्राणी (Babajani Durani) यांचे कधीच अजित पवारांशी पटले नाही. त्यामुळे राष्ट्रवादीतील बंडात दुर्राणी यांनी शरद पवारांचीच साथ दिली; पण दोन महिन्यांतच दुर्राणी यांनी आपला निर्णय फिरवला आणि मोठ्या साहेबांची साथ सोडत अजितदादांचा हात धरला. परभणी जिल्ह्यात (Ajit Pawar) अजित पवारांची सावली म्हणून ओळख असलेले माजी आमदार विजय भांबळे बंडानंतर त्यांच्यासोबत जातील असे मानले जात होते, पण घडले उलटेच.

शरद पवारांचे कट्टर अशी ओळख असलेल्या बाबाजानींनी त्यांची साथ सोडली आणि अजित पवारांचा शब्द प्रमाण मानणारे भांबळे मात्र मोठ्या साहेबांसोबत ठामपणे उभे आहेत. (NCP) राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राज्यसभा सदस्य फौजिया खान यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्वजण शरद पवार यांच्या सोबत असल्याचे पक्षातील बंडानंतर सांगितले होते. परंतु माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश विटेकर, माजी आमदार मधुसूदन केंद्रे व माजी महापौर प्रताप देशमुख या सर्व नेत्यांनी अजित पवार यांची साथ दिली.

मात्र, शरद पवार यांची उघडपणे साथ दिल्याने बाबाजानी दुर्राणी यांना प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागला. शिवसेना अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांनी पाथरी तालुक्यातील अनेक गावांचे सरपंच, पाथरी शहरातील नगरसेवक व प्रामुख्याने बाबाजानी यांच्या अनेक निकटवर्तीयांचा शिवसेनेत प्रवेश करून त्यांच्या समोर तगडे आव्हान उभे केले. शहरातील बाबा टॉवर व इतर जमिनीवर अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित झाले व यासंदर्भात चौकशीसुद्धा झाली.

तसेच दुर्राणी यांच्या ताब्यातील नगरपरिषदेला विकासकामांसाठी निधी उपलब्ध होण्यात अडचणी निर्माण होत होत्या. मागील पंचवीस वर्षांपेक्षा जास्त काळ नगरपरिषदेत असणारी सत्ता व आमदारकीची दुसरी टर्म उपभोगताना दुर्राणी यांनी यापूर्वी एवढी प्रतिकूल परिस्थिती कधीच अनुभवली नव्हती. परिणामी दुर्राणी हे अजित पवार यांच्याशी जवळीक साधतील, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात होता. 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या परभणी दौऱ्यात दुर्राणी हे त्यांच्या सोबत दिसले. दुर्राणी यांच्या चिरंजीवांनी अजित पवार यांचा पाथरी येथे सत्कारही केला.

अखेर छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीप्रसंगी अजित पवार माध्यमांना सामोरे जाताना दुर्राणी हे अजित पवार यांच्यासोबत असल्याचे दिसून आले. जिल्ह्यातील जिंतूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार विजय भांबळे हे शरीराने शरद पवार यांच्यासोबत असले तरीही ते पूर्वीपासून अजित पवार यांचे खंदे समर्थक मानले जातात. विधानसभेत विजय भांबळे यांचा पराभव झाल्याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केल्याच्या अजित पवार यांच्या आॅडिओ क्लिप समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्या होत्या. त्यामुळे विजय भांबळे हे निसंकोचपणे अजित पवार यांची साथ देतील, असा कयास असताना भांबळे शरद पवार यांच्या सोबत राहिले.

मात्र, जिंतूर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या मेघना बोर्डीकर या विद्यमान आमदार असल्याने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ही जागा भाजपकडेच असणार हे उघड आहे. अजित पवार यांची साथ दिल्यास जिंतूर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या मेघना बोर्डीकर यांना सहकार्य करावे लागू शकते. त्यामुळे विजय भांबळे हे संभाव्य अडचणीच्या परिस्थितीमुळे शरद पवार यांच्या सोबत आहेत. परंतु मनाने मात्र ते अजित पवारांकडेच असल्याचे बोलले जात आहे. एकूणच शरीराने दुर्राणी हे अजित पवारांकडे असले तरी त्यांच्या मनात शरद पवार हेच आहेत, तर माजी आमदार विजय भांबळे हे शरीराने शरद पवार यांच्या गटात असले तरी त्यांच्या मनात मात्र अजित पवार यांच्याबाबत आदराचीच भावना असल्याचे बोलले जाते.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT