Jitesh Antapurkar-MP Vasant Chavan Sarkarnama
मराठवाडा

MP Vasatrao Chavan News : आमदार जितेश अंतापूरकरांवर कारवाईची खासदार वसंत चव्हाणांनी 'का' केली मागणी !

MLA Antapurkar met BJP leader Ashok Chavan : विधान परिषदेत क्रॉस व्होटिंग केल्याचा आरोप असतानाच काँग्रेस आमदार जितेश अंतापूरकर यांनी भाजप नेते अशोक चव्हाण यांच्यासह इतर नेत्यांची भेट घेतल्याचे समोर आले आहे.

Jagdish Pansare

Nanded News : विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचे प्रकरण गाजत आहे. मराठवाड्यातील देगलूर-बिलोली चे आमदार जितेश अंतापूरकर, नांदेड दक्षिण चे मोहन हंबर्डे या दोघांची नावे क्रॉस व्होटिंग आमदारांच्या यादीत असल्याची माहिती आहे. त्यातच आमदार जितेश अंतापूरकर यांनी नुकतीच काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह भाजपच्या इतर नेत्यांची भेट घेतल्याचे समोर आले.

विधान परिषदेत क्रॉस व्होटिंग केल्याचा आरोप असतानाच आता लोकसभेच्या नांदेड मतदारंसघाचे नवनिर्वाचित काँग्रेस खासदार वसंतराव चव्हाण यांनी थेट जितेश अंतापूरकर यांच्यावर निशाणा साधला आहे. केवळ विधान परिषदेतच नाही तर अंतापूरकर यांनी लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसच्या विरोधात काम केल्याचा आरोप खासदार वसंत चव्हाण यांनी केला.

लोकसभा निवडणुकीत अंतापूरकर यांनी काँग्रेस-महाविकास आघाडीचे काम केले नाही. माझ्या प्रचारात ते कुठेही दिसले नाही.विधान परिषदेच्या निवडणुकीतही त्यांनी काँग्रेस उमेदवाराला आपले मत दिले नसल्याचा त्यांच्यावर ठपका आहे. पक्षाशी गद्दारी करणाऱ्या अशा लोकांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी खासदार वसंत चव्हाण यांनी केली आहे.

जितेश अंतापूरकर हे अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.त्यांचे वडील रावसाहेब अंतापूरकर यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी देऊन निवडून आणले होते.

अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीपुर्वी भाजपमध्ये प्रवेश केला, मात्र जितेश अंतापूरकर यांच्यासह त्यांचे जिल्ह्यातील समर्थक काँग्रेस आमदार तिथेच थांबले.अशोक चव्हाण यांच्या राजकीय खेळीचा तो भाग असल्याचे बोलले जाते. विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचे सात आमदार फुटल्याचा प्रकार समोर आला आणि त्यात अंतापूरकर,हंबर्डे यांचे नाव समोर आले होते.

जालन्याचे काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी सर्वप्रथम काँग्रेस आमदारांच्या क्रॉस व्होटिंगचा दावा केला होता.संशयाच्या भोवऱ्यात अडकलेल्या आणि पक्षश्रेष्ठींकडून कारवाई होणारच हे लक्षात आल्यानंतर जितेश अंतापूरकर अशोक चव्हाण यांना भेटले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीपुर्वी ते भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. एवढेच नाही तर काँग्रेसमधील इतर आमदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात भाजपचे कमळ हाती धरणार असल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात आहे.

काँग्रेसच्या (Congress) राज्यातील नेत्यांनी विधान परिषदेत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांची नावे आणि अहवाल केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवला आहे.19 जुलै रोजी यावर निर्णय होऊन संबंधित आमदारांवर कारवाई केली जाईल,अशी शक्यता होती. मात्र विधान परिषदेच्या निवडणुकीला आठवडा उलटून गेला तरी काँग्रेसच्या त्या आमदारांवर अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही.

नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांनी आता थेट जितेश अंतापूरकर यांचे नाव घेत लोकसभा निवडणुकीतही त्यांनी पक्षाचे काम केले नाही असा आरोप केल्याने ते अधिकच अडचणीत आले आहेत.

(Edited by : Chaitanya Machale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT