दिलीप दखणे
Vadigodri, 22 July : आम्ही न्याय हक्कासाठी दहा-अकरा महिन्यांपासून आंदोलन करतोय. इकडे अंतरवालीत उपोषण सुरू केले, तर ते छगन भुजबळ ओबीसीच्या लोकांना आंदोलन करायला लावतात. तुम्हाला हेच करायचे असेल तर मी येवला, नाशिकला येवूनच आंदोलन करतो, असे आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ यांना दिले. मी नाशिक, येवला येथे उपोषण करण्यासाठी परवानगी मागितली आहे. संबंधितांकडे अर्ज दिला आहे, मग गर्दी कशी असते, हे तुम्हाला कळेल, असा टोला जरांगे पाटील यांनी लगावला.
मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी अंतरवाली सराटीत पाचव्यांदा उपोषण सुरू केले आहे. आज उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी काल पुण्यात केलेल्या भाषणावर टीका केली. मराठा आरक्षणावर शाह यांनी घेतलेल्या भूमिकेचा समाचार घेतानाच तुम्हाला आरक्षण देण्यापासून कोणी रोखले? असा प्रश्न उपस्थित केला.
ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीमुळे राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष सुरू झाला आहे. ओबीसीतून आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत, तर ओबीसी नेत्यांकडून ओबीसी आरक्षण बचाव रॅली काढली जात आहे. छगन भुजबळ ओबीसी नेत्यांना आंदोलन करायला लावून मराठ्यांविरुद्ध भडकावत आहेत. त्यांना असेच करायचे असेल तर मी येवला, नाशिकला येवून उपोषण करतो? मग गर्दी काय असते हे तुम्हाला कळेल, असा थेट इशाराच मनोज जरांगे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
मराठा समाजाला आरक्षण देण्यापासून तुम्हाला कोणी रोखले, सध्या सत्ता कोणाची आहे? आरक्षण देतो देतो म्हणून किती दिवस वाट पाहायची? गोरगरीब समाजाचा विचार करा अन् आरक्षण द्या, असे म्हणत जरांगे पाटील यांनी अमित शाह यांनी पुण्यात केलेल्या विधानावर संताप व्यक्त केला. अमित शहा यांना गरीबाकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही, त्यांना मराठा, गुर्जर आदी मोठ्या जाती संपवायच्या आहेत.
सत्ता असूनही आरक्षण मिळत नाही. आंदोलन करणाऱ्यांवर लाठी हल्ला, गोळीबार करून उलट आमच्याच पोरांवर, महिलांवरच खोटे गुन्हे दाखल केले. शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांची काय भूमिका आहे, त्यांचा पाठींबा आहे का? या पेक्षा तुम्हाला द्यायचे का नाही ते सांगा? तुम्हाला फक्त मराठा समाजाचे मत पाहिजे, अशा शब्दांत जरांगे यांनी अमित शहा यांना सुनावले.
भुजबळ शंभर टक्के दंगल घडवणार आहेत. सरकारने त्यांना समज द्यावी, असे आवाहन जरांगे यांनी केले. मुख्यमंत्री शिंदे व शरद पवार यांची भेट होणार आहे, या संदर्भात विचारले असता दोघांना आरक्षणाचे काही घेणंदेण नाही, त्यांचा काय निर्णय होतो, ते लवकरच कळेल? लाड यांनी समाजाचा रोष घेऊ नये, मॅनेज करण्याचा प्रयत्न करू नये. समाजाच्या बाजूने उभे राहिले पाहिजे, असे सांगत जरांगे यांनी लाड यांच्या आमदारकीचा राजीनामा देण्याच्या विधानाची खिल्ली उडवली.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.