MNS President Raj Thackeray - Pramod Kute Sarkarnama
मराठवाडा

Hingoli Assembly Constituency : हिंगोलीत मनसेचे ओबीसी कार्ड, प्रमोद कुटे यांना उमेदवारी जाहीर..

MNS's Hingoli OBC card : महायुती-महाविकास आघाडीकडून हिंगोली विधानसभा मतदारसंघात मराठा उमेदवार दिले जाण्याची शक्यता आहे. या दोन पक्षामधील मतांचे ध्रुवीकरण झाल्यास मनसेच्या प्रमोद कुटे यांचा मार्ग सुकर होऊ शकतो, असे बोलले जाते.

Jagdish Pansare

संदीप नागरे

Hingoli MNS Political News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंगोली दौऱ्यात आपला राज्यातील चौथा उमेदवार जाहीर केला. राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष भडकलेला असताना राज ठाकरे यांनी हिंगोलीत ओबीसी कार्ड खेळल्याचे बोलले जाते. मनसेचे जिल्हाप्रमुख प्रमोद कुटे यांना हिंगोली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. स्वतः राज ठाकरे यांनी कुटे यांच्या उमेदवारीची घोषणा केली.

2014 मध्ये प्रमोद कुटे यांनी मनसेकडून हिंगोली (Hingoli) विधानसभेची निवडणूक लढवली होती, पण त्यांना यश आले नव्हते. राज्यात पक्षांतरांचे वारे आणि लाट असताना प्रमोद कुटे हे गेल्या कित्येक वर्षापासून मनसे सोबत कायम आहेत. हिंगोली नगर परिषदेत नगरसेवक असलेले प्रमोद कुटे हे वंजारी असून हिंगोलीत या मतदारांची संख्या लक्षणीय आहे.

जातीय समीकरणे डोळ्यासमोर ठेवत राज ठाकरे यांनी प्रमोद कुटे यांची उमेदवारी जाहीर केल्याची चर्चा आहे. महायुती-महाविकास आघाडीकडून हिंगोली विधानसभा मतदारसंघात मराठा उमेदवार दिले जाण्याची शक्यता आहे. या दोन पक्षामधील मतांचे ध्रुवीकरण झाल्यास मनसेच्या प्रमोद कुटे यांचा मार्ग सुकर होऊ शकतो, असे बोलले जाते.

हिंगोली जिल्ह्यात मनसेची संघटनात्मक ताकद फारशी नसली तरी मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाचा फायदा मनसेच्या (MNS) उमेदवाराला होऊ शकतो, असा तर्क लढवला जात आहे. राज ठाकरे आपल्या मराठवाडा दौऱ्यावर असताना आज त्यांनी हिंगोलीतील मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक घेत त्यांच्याशी संवाद साधला.

जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतानाच त्यांनी हिंगोली विधानसभेसाठी प्रमोद कुटे यांच्या नावाची घोषणा केली. मनसेचे जिल्हाप्रमुख प्रमोद उर्फ बंडू कुटे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. हिंगोली विधानसभेची जागा सध्या भाजपकडे आहे. तानाजी मुटकुळे हे हिंगोलीचे विद्यमान आमदार आहेत.

हिंगोलीत प्रमोद कुटे यांची उमेदवारी जाहीर करत मनसेने राज्यातील चौथ्या उमेदवाराची घोषणा केली आहे. नांदेड, परभणी, जालना, संभाजीनगर जिल्ह्याचा दौरा राज ठाकरे करणार आहेत. यात आणखी किती उमेदवार मनसेकडून जाहीर केले जातात? याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT