Raj Thackeray : अशी पडली राज ठाकरेंच्या बंडाची ठिणगी

Raj Thackeray Shivsena Rebellion : शिवसेनेत आपल्याला डावलले जात आहे, अशी भावना राज ठाकरे आणि त्यांच्या समर्थकांमध्ये निर्माण झाली होती. नेमकी ठिणगी कुठे आणि कशी पडली आणि राज ठाकरे यांनी बंड केलं, याबाबतची उत्सुकता आजही कायम आहे.
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

शिवसेना आधीही फुटली होती, शिवसेनेचे मोठे नेते आधीही बाहेर पडले होते. यात सर्वात धक्कादायक होतं राज ठाकरे यांचं शिवसेनेतून बाहेर पडणं. राज ठाकरे यांच्या व्यक्तिमत्वाला वलय होतं, ते आजही कायम आहे. त्यांच्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची छबी दिसते. त्यांची वक्तृत्वशैली हुबेहूब बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखी आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण ऐकण्यासाठी लोक स्वतःहून यायचे. राज ठाकरे यांच्याबाबतीतही तसंच आहे.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील उदयाची आणि त्यामुळे आपल्यावर येणाऱ्या मर्यादांची जाणीव राज ठाकरे यांना झाली होती. ते बाळासाहेबांना धोका देऊन बाहेर पडले नाहीत, त्यांना स्पष्ट कल्पना देऊन त्यांनी शिवसेना सोडली आणि स्वतःचा पक्ष स्थापन केला. अन्य पक्षांत जाऊन त्यांनी सत्तेची फळे चाखली नाहीत. शिवसेना सोडणारे अन्य नेते आणि राज ठाकरे यांच्यात हा फरक आहे. ''मला मिठी मारून बाळासाहेब तेव्हा म्हणाले होते, आता जा'', अशी आठवण राज ठाकरे यांनी मागे एकदा सांगितली होती. ''त्याप्रसंगी तेथे मनोहर जोशी (Manohar Joshi) होते. ते उठून खोलीच्या बाहेर गेले. त्यानंतर बाळासाहेबांनी मला आत बोलावून हात पसरत मला मिठी मारली होती आणि म्हणाले होते, आता जा. मी गद्दारी, दगाफटका करून किंवा खंजीर खुपसून बाहेर पडलो नाही, अन्य कोणत्याही पक्षात गेलो नाही, तुमच्या विश्वासावर पक्ष उभा केला'', असे राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांसमोर बोलताना सांगितले होते.

नेमकी ठिणगी कुठे आणि कशी पडली आणि राज ठाकरे यांनी बंड केलं, याबाबतची उत्सुकता आजही कायम आहे. या विषयावर पुस्तकेही लिहून झाली आहेत. मुंबई येथील धवल कुलकर्णी यांनी या विषयावर 'दी कझिन्स ठाकरेः उद्धव, राज अँड शॅडो ऑफ देअर सेनाज' या नावाचे पुस्तक लिहिले आहे. ते म्हणतात, ''राज ठाकरे हे 1989 मध्ये विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष बनले. त्यानंतर साधारण दोन वर्षांनी उद्धव ठाकरे यांचा राजकारणात प्रवेश झाला. मुलुंडला झोपडपट्टीत उभारलेल्या नळ योजनेचं उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. हा निव्वळ योगायोग नव्हता.

धवल कुलकर्णी पुढे सांगतात, की राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी बेरोजगारांचे प्रश्न हाती घेऊन विद्यार्थी सेनेच्या बॅनरखाली संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला होता. या मोहिमेचा समारोप विधीमंडळाच्या नागपूर अधिवेशनावर मोर्चा काढून होणार होता. मोर्चाच्या आदल्या रात्री राज ठाकरे यांना ते थांबलेल्या हॉटेलवर फोन आला. तुझ्या सभेमध्ये दादूंनाही बोलू दे, असे त्यांना सांगण्यात आले. दादू म्हणजे उद्धव ठाकरे. दुसऱ्या दिवशी ट्रकवर उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या स्टेजवर शिवसेनेच्या नेत्यांची भाषणं सुरू होती आणि याचदरम्यान मनोहर जोशी यांनी आता उद्धव ठाकरे हेही भाषण करतील, असं जाहीर केलं. अर्थात हे सगळं अचानक झालं, असं दाखवण्यात आलं होतं. उद्धव ठाकरेंचं भाषण झालं. त्यानंतर शिवसेना व विद्यार्थी सेनेच्या शिष्टमंडळानं तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांची भेट घेतली. या घटनेनंतर राज ठाकरे सावध झाले, असे त्यांच्या जवळचे लोक सांगतात, कारण पक्ष आणि संघटनेत एका विशिष्ट पातळीच्या पुढे आपल्याला जाता येणार नाही, हे त्यांच्या लक्षात आलं होतं.

राज्यात 1995 मध्ये शिवसेना-भाजप युतीचं सरकर आलं, त्यामागं काही ठराविक कारणं होती. मुंबईत झालेल्या दंगलींनंतर बाळासाहेब ठाकरे यांचा आक्रमक हिंदुत्वाचा प्रचार, गोपीनाथ मुंडेंनी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांच्या विरोधात संघर्ष यात्रा काढून उठवलेली आरोपांची राळ आणि राज ठाकरेंचा महाराष्ट्रातला झंजावाती प्रचार, ही कारणं त्यामागं होती. त्यामुळे राज्यात शिवसेना-भाजप युतीचं सरकार आलं होतं. सत्ता आल्यानंतर काही मंत्र्यांनी मंत्रलयातील आपल्या केबिनमध्ये राज ठाकरे यांचे फोटो लावले होते. मात्र राज ठाकरे यांचे फोटो काढावेत, असं त्यांना सांगण्यात आलं होतं. तरीही राज ठाकरे हे सत्ताकेंद्र म्हणून पुढं येत होते, पण त्याचदरम्यान रमेश किनी प्रकरण झालं आणि राज ठाकरे यांच्या शिवसेनेतील प्रवासाला कायमस्वरूपी खीळ बसली. त्यानंतर 1997 मध्ये झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी हळूहळू शिवसेनेवर आपला जम बसवला आणि उमेदवार निवडीत महत्वाची भूमिका पार पाडली, असं धवल कुलकर्णी सांगतात.

या प्रकारांमुळे राज ठाकरे यांना शिवसेनेत डावललं जात आहे, अशी भावना शिवसैनिकांमध्येही निर्माण झाली होती. नोव्हेंबर 2005 मध्ये त्यांनी शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिला. आपल्याला आणि आपल्या समर्थकांनाही डावललं जात आहे, असं कारण त्यांनी त्यावेळी दिलं. काही दिवसांत शिवसेनेतून बाहेर पडणार, असं त्यांनी त्यावेळी सांगितलं आणि पुढे तीन आठवड्यांनंतर त्यांनी शिवसेना सोडल्याचं जाहीर केलं. 'शिवसेनाप्रमुख हेच आपले दैवत आहेत, मात्र आपल्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं आहे. माझा लढा विठ्ठलाशी नाही, त्याच्याभोवतीच्या बडव्यांशी आहे', असं त्यावेळी ते म्हणाले होते.

Raj Thackeray
Bangaru laxman : असा उघड झाला होता राजकारणातील निलाजरेपणा...

उद्धव ठाकरे यांचं प्रस्थ शिवसेनेत (Shivsena) वाढत होतं. संघटनेतील महत्वाचे निर्णय तेच घेऊ लागले होते. शिवसेनेचे गटप्रमुख म्हणून काम केलेले मिलिंद नार्वेकर हे 1992 मध्ये पहिल्यांदाच 'मातोश्री'वर गेले आणि पाहता पाहता त्यांनी महत्वाचं स्थान मिळवलं. 1993 मध्ये ते उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक बनले. त्यानंतर शिवसेना पक्ष संघटनेत त्यांचंही महत्व वाढू लागलं. उद्धव ठाकरे कोणाला भेटणार, कोणाला भेटणार नाहीत, हे नार्वेकर ठरवू लागले. 2003 मध्ये उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष बनले. त्यानंतर तर राज ठाकरे यांचं महत्व कमी झाल्याचं अप्रत्यक्षपणे जाहीरच झालं. शिवसेना सोडणाऱ्या नारायण राणेंसह अनेक नेत्यांनी नार्वेकर यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. राज ठाकरे यांचाही रोख त्यांच्याककडेच होता, असं सांगितले जातं.

राज ठाकरे म्हणजे मुलुखमैदानी तोफच. बाळासाहेबांसारखी हुबेहूब शैली, आवाजात करारीपणाही तसाच. त्यांच्या विचारांत स्पष्टता, पक्षसंघटनेवर पकड होती. त्यामुळं शिवसेनेची धुरा त्यांच्याच हाती येणार, असं त्यावेळी बोललं जायचं. राज ठाकरे यांनाही तसंच वाटणं साहजिक होतं. मात्र उद्धव ठाकरे सक्रिय झाल्यामुळे राज यांची कोंडी होत गेली, पक्षात त्यांची घुसमटही वाढत गेली. त्यांना नाशिकची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांच्याकडून मुंबईची जबाबदारी काढून घेण्यात आली, असा त्याचा सरळ अर्थ होता. त्यानंतर असे प्रकार सुरूच राहिले.

2003 मध्ये महाबळेश्वर येथे शिवसेनेचं अधिवेशन भरलं होतं. 30 जानेवारी रोजी अधिवेशनाचा समारोप होता. बाळासाहेब ठाकरे आपला उत्तराधिकारी कोणाला नेमणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. शेवटच्या दिवशी बाळासाहेब उपस्थित नव्हते. कार्याध्यक्षपदासाठी राज ठाकरे यांनीच उद्धव ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आणि भविष्याचं चित्र स्पष्ट झालं. बाळासाहेबांचा निर्णय अंतिम असायचा. त्याला आव्हान देणं अशक्य होतं. त्यामुळं तो निर्णय सर्वांनी स्वीकारला होता. दोन्ही भावांमध्ये जबाबदारीची विभागणी केली जाईल, अशी चर्चा होती, मात्र तसं झालं नव्हतं. राज ठाकरेंच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. असा प्रश्न निर्माण होण्याची ही काही पहिली वेळ नव्हती.

राज ठाकरे म्हणजे शिवसेनेची त्यावेळची मुलुखमैदान तोफच. बाळासाहेब ठाकरेंची हुबेहुब शैली आणि आवाजातील करारीपणा... एखाद्या मुद्द्यावर असलेले स्पष्ट विचार आणि पक्ष संघटनेवर असलेली पकड.... या सर्व गुणांमुळे राज ठाकरे हेच शिवसेनेचं उद्याचं नेतृत्व असल्याचं अनेकजण बोलत होते. पण उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) वाढत्या सक्रियतेमुळे राज ठाकरेंची कुचंबणा होत गेली. त्यांची पक्षातील घुसमट वाढत गेली. मुंबईची जबाबदारी अप्रत्यक्षपणे हातातून काढून घेऊन त्यांना नाशिकची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर अशा अनेक घटना घडत गेल्या की ज्यामुळे राज ठाकरेंची शिवसेनेत घुसमट वाढत गेली. अखेर 27 नोव्हेंबर 2005 रोजी ही कोंडी फुटली. दादर येथील कृष्णकुंज येथील निवासस्थानी त्यांनी शिवसेना सोडल्याचं जाहीर केलं. राज्यभरातील कार्यकर्ते त्यावेळी जमा झाले होते.

Raj Thackeray
Yashvantrao Gadakh : यशवंतराव गडाखांनी बाळासाहेब विखे पाटील यांना पराभूत केलं, पण...

शिवसेना संपवयाला निघालेल्या चार कारकुनांच्या कंपूच्या पापात आपल्याला भागीदार व्हायचं नाही, असेही त्यावेळी ते म्हणाले होते. शिवसेनेसाठी आपण सर्वस्व दिलं, मात्र आपल्याला वाईट वागणूक मिळाली. असं असलं तरी शिवसेना संपवण्याची माझी इच्छा नाही. पक्षातील चार-सहा जणांनी चुका करायच्या आणि आपण त्यांना निवडून आणण्यासाठी प्रचार करायचा, हे आपल्याला जमणार नाही. राजकारण न कळणारे काही दीडदमडीचे लोक आता शिवसेना चालवत आहेत, अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती.

मराठी माणसाच्या हक्कासाठी शिवसेना स्थापन झाली होती. कालांतराने शिवसेनेनं हिंदुत्वाचा स्वीकार केला. राज ठाकरे यांनीही मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणार, असे जाहीर करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. 9 मार्च 2006 हा तो दिवस होता. पुढं 2009 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे तब्बल 13 आमदार निवडून आले. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतही मनसेला चांगलं यश मिळालं. नाशिक महापालिकेवर मनसेची सत्ता आली होती. मात्र राज ठाकरे यांना हे यश फार काळ टिकवता आलं नाही. 2019 च्या निवडणुकीत मनसेचा फक्त एक आमदार निवडून आला. राज ठाकरे यांनी वारंवार भूमिका बदलली. आपल्याकडे महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट आहे, असे कधीकाळी सांगणारे राज ठाकरे आता उघड उघड ध्रुवीकरणाची भाषा करू लागले आहेत. मराठी माणसाच्या मुद्द्यावरून ते आता हिंदुत्वाकडे वळले आहेत. पुत्र अमित यांचे त्यांनी राजकारणात लाँचिंग केले आहे, मात्र त्यांना म्हणावा तसा करिश्मा अद्याप तरी दाखवता आलेला नाही.

Raj Thackeray
Yashvantrao Gadakh : यशवंतराव गडाखांनी बाळासाहेब विखे पाटील यांना पराभूत केलं, पण...

दुसरीकडे, उद्धव ठाकरे पाय रोवून उभे आहेत. पक्ष फुटला तरी ते डगमगले नाहीत. एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदार शिवसेनेतून बाहेर पडले. त्यामुळं त्यांचं मुख्यमंत्रिपद गेलं. पक्षाचे नाव आणि चिन्हही उद्धव ठाकरे यांच्याकडून हिरावलं गेलं. त्यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. असं असतानाही 2024 च्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांचे 9 खासदार विजयी झाले. तिकडे, राज ठाकरे यांचा एकही उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात नव्हता. पक्षाने निवडणूकच नाही लढवली तर कार्यकर्ते कसे टिकून राहणार, याचा विचार राज ठाकरे यांनी केल्याचं दिसत नाही. दोघे भाऊ म्हणजे उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार, अशा चर्चा सतत होत असतात, मात्र त्या एकदाही खऱ्या ठरल्या नाहीत. यापुढेही त्या खऱ्या ठरण्याची शक्यता धूसरच म्हणावी लागेल. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ते अडचणीतच येतील, अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली होती. त्यामुळं आश्चर्य व्यक्त करण्यात आलं होतं.

राज यांच्या तुलनेत वक्तृत्वाच्या बाबतीत डावे ठरणारे उद्धव पक्ष संघटनाच्या बाबतीत निश्चितपणे उजवे ठरले आहेत. उद्धव यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनीही राजकारणात जम बसवला आहे. त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. शिवसेना सोडून राज ठाकरे यांनी काय मिळवलं, असा प्रश्न उपस्थित होतो. शिवसेनेत घुसमट सुरू होती म्हणून बाहेर पडून स्वतःचा पक्ष स्थापन केलेल्या राज ठाकरे यांना मोठी स्पेस होती. सक्षम विरोधी पक्षाची जागा भरून काढण्याची, त्याद्वारे सत्तेचा सोपान चढण्याची संधी त्यांना होती. ती त्यांनी वाया घालवली, असं म्हटल्यास ते चुकीचं ठरणार नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com