MNS| Raj Thackeray|  Sarkarnama
मराठवाडा

राज ठाकरेंच्या सभेचं 'यूपी कनेक्शन'! अयोध्येतून येणार अडीच हजारांची कुमक

राज ठाकरेंच्या सभेमुळे राजकीय वातावरण तापलं

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची १ मे रोजी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर जाहीर सभा होणार आहे. या सभेला पोलिसांकडून अधिकृत परवानगीची घोषणा आज सांयकाळपर्यंत होऊ शकते. या सभेमुळं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या सभेसाठी अयोध्येतून तब्बल अडीच हजार हिंदुत्ववादी कार्यकर्ते औरंगाबादमध्ये दाखल होणार आहेत.

राज ठाकरेंच्या सभेला अयोध्येतील हिंदुत्वावादी संघटनांनी पाठिंबा दिला आहे. यामुळे या सभेसाठी सुमारे अडीच हजार हिंदुत्ववादी कार्यकर्ते औरंगाबादमध्ये दाखल होणार आहेत, अशी माहिती मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी दिली आहे. दरम्यान, परवानगी मिळाली नाही तरी सभा घेण्यावर मनसे ठाम असल्याने पोलिसांनी देखील संघर्ष टाळत संयमाची भूमिका घेतली आहे. मनसे नेत्यांच्या आधी काल स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानाची जाऊन पाहणी केली होती. त्यानंतर सायंकाळी पोलीस आयुक्त डाॅ. निखिल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकाऱ्यांची महत्वाची बैठकही पार पडली.

राज ठाकरे यांची सभा १ मे म्हणजेच महाराष्ट्रदिनी होत आहे. ३ मे रोजी रमजान सण असल्याने या सभेतून कुठल्याही प्रकारचे वादग्रस्त वक्तव्य केले जाऊ नये, याकडे पोलिसांनी लक्ष्य केंद्रित केले आहे. सभेला काही कडक अटी-शर्ती घालूनच परवानगी देण्यात येणार आहे. असे असले तरी कुठलाही अनुचित प्रकार सभेदरम्यान किंवा त्यानंतर घडू नये, यासाठी पोलिसांनी देखील कंबर कसली आहे.

या सभेच्या बंदोबस्तासाठी तब्बल ८ डीसीपींसह अन्य अधिकारी व दोन हजार पोलिस असा प्रचंड फौजफाटा तैनात करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. औरंगाबाद हे संवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते. राज्य व देश पातळीवरील घटना घडामोडींचे पडसाद इथे ताबडतोब उमटते. त्यातच राज ठाकरे हे मशिदीवरील भोंग्याविषयी सभेत बोलणार आहेत, त्यामुळे पोलिस अधिक सतर्क झाले आहेत. राज ठाकरे यांची सभा शांततेत पार पडावी, यासाठी पोलिसांकडून मनसेच्या नेते, पदाधिकाऱ्यांना देखील आवाहन करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT