Vilas Ghule Murder Case; Bajrang Sonawane son Sourabh Sonawane sarkarnama
मराठवाडा

Beed Crime News : विलास घुले हत्या प्रकरणात नाव येताच बजरंग सोनवणेंच्या मुलाचा मोठा खुलासा! लोकेशन, वेळ, ठिकाणासह सगळंच सांगितलं

Bajrang Sonawane-Sourabh Sonawane On Vilas Ghule Murder Case : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले यांच्या हत्याप्रकरणाने राजकारण चांगलेच तापले असतानाच आता सौरभ सोनवणे याने पुढे येत मोठा खुलासा केला आहे.

Jagdish Pansare

Bajrang Sonawane-Sourabh Sonawane : चार दिवसापूर्वी बीड जिल्ह्यातील केज तालुक्याच्या टाकळी येथे विलास घुले या हॉटेल चालकाची एका टोळक्याने चाकूने हल्ला करत हत्या केली होती. या हत्या प्रकरणानंतर आरोपींच्या अटकेसाठी व त्यांना पळून जाण्यास मदत व गाडी दिल्याचा आरोप खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलावर करण्यात आला होता. यानंतर सौरभ सोनवणे याच्यावर गुन्हा दाखल करण्याचा मागणीसाठी घुले कुटुंबिय आणि गावकऱ्यांनी आक्रमक पावित्रा घेतला होता. दरम्यान आता पुरवणी जबाबात नाव आल्यानंतर आता सौरभ सोनवणे याने पुढे येत मोठा खुलासा केला आहे.

राजकीय दबावातून या प्रकरणात माझे नाव गोवले जात आहे. पोलीसांनी घटना घडली त्या दिवशी माझे लोकेशन, मी कुठे होतो, माझी गाडी कुठे होती? हे तपासले आहे. असे असताना माझ्यावर खोटे, बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. मी कोणत्याही चौकशीला समोर जाण्यास तयार असल्याचा व्हिडिओ सौरभ सोनवणे सोशल मिडियावर व्हायरल केला आहे. यामधून सौरभ सोनवणे याने 20 जून रोजी म्हणजेच ज्या दिवशी विलास घुले यांची हत्या झाली, त्या दिवशीचा सगळा घटनाक्रम सांगीतला आहे.

त्यानुसार 20 जून रोजी सौरभ सोनवणे हे केज येथील आपल्या निवासस्थानातून सकाळी नऊ वाजता येडेश्वरी शुगर कारखान्याच्या युनिट क्रमांक 1 येथे गेले होते. तिथून दुपारी दोन वाजता ते घरी आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशीपर्यंत ते घरीच होते. शिवाय ज्या थार गाडीचा उल्लेख घुले कुटुंबिय व ग्रामस्थांकडून आरोपींना पळून जाण्यासाठी दिल्याचा आरोप केला जातो, ती गाडी 20 जून दुपारी दोन पासून दुसऱ्या दिवशीपर्यंत घरीच होती. याचे सीसीटीव्ही फुटेज पोलीसांनी तपासले आहेत.

या दरम्यान, मी कोणाशी बोललो, कोणाला फोन केले याचे काॅल डिटेल देखील पोलीसांनी तपासले आहे. घडलेली घटना दुर्दैवी आहे, विलास घुले यांच्या हत्येतील आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, हीच माझी देखील मागणी आहे. परंतु केवळ राजकीय द्वेषातून या प्रकरणाशी माझा संबंध जोडला जात आहे. माझे नाव गोवण्याचा काही राजकीय लोकांकडून प्रयत्न केला जात आहे. पोलीसांनी मला चौकशीला बोलावल्यास मी त्याला समोर जाण्यास तयार असल्याचे सौरभ सोनवणे यांनी आपल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे.

पोलीस अधीक्षक नवनीत कावँत यांनी यापुर्वीच या प्रकरणात पुरावा सापडला तर सौरभ सोनवणे यांनाही अटक करू, असे आश्वासन घुले कुटुंबिय आणि आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांना दिले होते. विधीमंडळ अधिवेशनात मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे यांनी हे प्रकरण लावून धरले. आरोपी व त्यांना साथ देण्याचा आरोप असलेल्या खासदार पुत्र बजरंग सोनवणे यांच्या मुलाचे नाव एफआयआरमध्ये घेण्याची मागणी आंदोलक सातत्याने करत आहेत.

विलास घुले याच्या हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे. या घटनेला जातीय रंग दिला जात असल्याचा आरोप देखील केला जात आहे. बीडचे आमदार संदीप क्षीरसागर, खासदार बजरंग सोनवणे यांनीही चौकशी करा, जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई करा, अशी भूमिका घेतली आहे. माझ्या मुलाच्या विरोधात पुरावे सापडले तर निश्चित कारवाई करा, सरकार, पोलीस तुमचे आहेत, असे म्हणत खासदार बजरंग सोनवणे यांनी या प्रकरणात राजकारण आणले जात असल्याचा आरोप केला होता. या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना पोलीसांनी अटक केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT