MP Imtiaz Jaleel and Amit Shah Sarkarnama
मराठवाडा

MP Imtiaz Jaleel : 'एवढा मोठा नेता येणार, मग सभेसाठी मैदान तरी मोठे घ्यायचे ना ?' इम्तियाज जलील यांचा भाजपला टोला

Amit Shah Maharashtra Daura : गृहमंत्री अमित शाह आपल्या महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा श्रीगणेशा छत्रपती संभाजीनगरमधून करणार आहेत.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar News: लोकसभा निवडणुकीचा रंग आता हळहळू चढू लागला आहे. देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे अमित शाह आपल्या महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा श्रीगणेशा छत्रपती संभाजीनगरमधून करणार आहेत. 5 मार्चला सायंकाळी त्यांची मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा होणार आहे. या सभेवरून आता राजकारण सुरू झाले आहे. (Marathi News)

'एमआयएम'चे खासदार इम्तियाज जलील यांनी भाजपला टोला लगावतांना 'एवढा मोठा नेता येणार आहे, तर मग सभेसाठी मैदान तरी मोठे निवडायचे ना', ज्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर अमित शाह यांची सभा होणार आहे, ते तर मी एकटाही भरवू शकतो, असा चिमटा इम्तियाज यांनी काढला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'एमआयएम'ही भाजपची बी टीम आहे, असा आरोप सातत्याने पक्षावर केला जातो. एमआयएमने अनेकदा याचे खंडण केले. मात्र, त्यांच्यावर लागलेला हा डाग काही केल्या पुसला जात नाहीये. त्यामुळे संधी मिळेल तेव्हा ओवेसी, इम्तियाज जलील (Imtiaz jaleel) भाजपवर तोंडसुख घेत असतात.

इम्तियाज जलील हे छत्रपती संभाजीनगरचे विद्यमान खासदार आहेत. गेल्या निवडणुकीत हिंदू मतांचे विभाजन झाले आणि त्यांची लॉटरी लागली. पाच वर्षात इम्तियाज जलील यांनी आपली प्रतिमा एक अभ्यासू, आक्रमक अशी प्रतिमा जनमानसात तयार केली असली तरी यावेळची राजकीय परिस्थिती वेगळी आहे. शिवसेना-भाजपची युती आता राहिलेली नाही, जी मुळची शिवसेना म्हणून दावा करते त्यांची शहरात फारशी ताकद नाही.

भाजपकडे सत्ता आहे, आर्थिक ताकद आहे, पण तगडा उमेदवार नाही. या एमआयएमसाठी जमेच्या बाजू असल्या तरी ज्या वंचितमुळे इम्तियाज जलील गेल्यावेळी निवडून आले. ती वंचित सध्या त्यांच्यासोबत नाही. त्यामुळे इम्तियाज यांच्या विजयाचे समीकरण यंदा अवघड असल्याचे बोलले जाते. पण त्यांच्या समर्थकांकडून मात्र यंदा आपण 50 हजारांच्या मताधिक्याने निवडून येऊ, असा दावा केला जातोय. तिरंगी किंवा चौरंगी होऊ पाहत असलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या लढतीत कोण बाजी मारणार? हे पाहणे रंजक ठरणार आहे.

शिवसेनेशिवाय पहिल्यादांच भाजप (BJP) या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. अमित शाह यांनी आपल्या लोकसभेच्या पहिल्या जाहीर सभेसाठी छत्रपती संभाजीनगरची निवड करणं यातच ही जागा कोण लढवणार हे सांगण्यासाठी कुठल्या ज्योतिषाची गरज नाही. भाजपचा उमेदवार विरोधात असला तर इम्तियाज जलील यांना निवडणूक अवघड जाणार आहे. त्यामुळे आतापासूनच त्यांनी भाजपवर हल्ला चढवणे सुरू केले आहे. त्याची सुरूवात अमित शाह यांच्या जाहीर सभेच्या ठिकाणापासूनच त्यांनी केली आहे.

मराठवाडा सांस्कृतीक मंडळ हे राजकीय सभांसाठी ओळखले जाणारे मैदान आहे. 50 हजार ते एक लाख लोक बसू शकतील एवढ्या क्षमतेचे हे मैदान आहे. दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राज ठाकरे यांच्यासह सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या इथे जाहीर सभा, मळावे झाले आहेत. शहराच्या मध्यवर्ती असलेले हे मैदान भरवण्यासाठी मोठी राजकीय ताकद लागते. गेल्या वर्षी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या उपस्थितीत या मैदानावर मोठा कार्यक्रम झाला होता.

परंतु रिकाम्या खुर्च्यांमुळे तेव्हा भाजपची पंचाईत झाली होती. अमित शाह यांची यापूर्वीची नियोजित सभा रद्द झाली होती. त्यानंतर आता येत्या 5 रोजी ही सभा पुन्हा होत आहे. नगर, जालना, संभाजीनगर या तीन लोकसभा मतदारसंघांचा मिळून तयार करण्यात आलेल्या क्लस्टरची ही एकत्रित सभा असल्यामुळे सभेला गर्दी जमवण्याचे मोठे आव्हान भाजपच्या स्थानिक नेत्यांसमोर असणार आहे. तीन लोकसभा मतदारसंघाची एकत्रित सभा, तीही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची तेव्हा मैदान तरी मोठे घ्यायचे ना,असा टोला इम्तियाज जलील यांनी लगावत भाजपला डिवचले आहे. भाजपकडून मात्र अद्याप इम्तियाज यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यात आलेले नाही.

(Edited By-Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT