Kalyan Kale Sarkarnama
मराठवाडा

MP Kalyan Kale News : खासदार कल्याण काळे यांचे संसदेत जय हिंद, जय संविधान अन् जय महाराष्ट्र..

MP Kalyan Kale Oath Ceremoney : काँग्रेसच्या बहुतांश खासदारांनी शपथ घेतल्यानंतर शेवटी जय संविधान असा उल्लेख केला. कल्याण काळेही त्याला अपवाद ठरले नाही.

Jagdish Pansare

Jalna News : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यादांच निवडून आलेल्या खासदारांच्या शपथविधी बद्दल अनेकांना उत्सुकता होती. विशेषतः त्या त्या मतदारसंघातील त्यांच्या मतदार आणि समर्थकांना आपला खासदार संसदेत काय बोलतो? कसा वावरतो? खासदार पदाची शपथ कोणत्या भाषेत घेतो याबद्दल कुतूहल होते. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड मतदारसंघातून जनतेने यावेळी नव्या चेहऱ्यांना संधी देत संसदेत पाठवले.

लोकसभेच्या जालना मतदारसंघातून काँग्रेस महाविकास आघाडीचे कल्याण काळे यांनी सलग पाचवेळा निवडून आलेल्या माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा पराभव केला. मराठवाड्यात या पराभवाची मोठी चर्चा अजूनही सुरू आहे. संसदेत मंगळवारी (ता.25) जालना मतदारसंघाचे खासदार म्हणून डाॅ. कल्याण काळे यांनी मराठीतून शपथ घेतली. मी डाॅ. कल्याण वैजीनाथराव काळे शपथ घेतो की`, असे म्हणत त्यांनी शेवटी जय हिंद, जय संविधान आणि जय महाराष्ट्र अशी घोषणा दिली.

संसद अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच काँग्रेस इंडिया आघाडीच्या खासदारांनी हातात संविधानाची प्रत घेत सभागृहात प्रवेश केला होता. सत्ताधारी भाजप आणि एनडीए सरकारला देश संविधानावर चालतो याची आठवण यातून करुन देण्याचा त्यांच्या प्रयत्न होता. त्यामुळे काँग्रेसच्या बहुतांश खासदारांनी शपथ घेतल्यानंतर शेवटी जय संविधान असा उल्लेख केला. कल्याण काळेही त्याला अपवाद ठरले नाही.

शपथ घेऊन लोकसभा अध्यक्षांना अभिवादन केल्यानंतर काळे रजिस्टरवर सही करण्याआधी समोरच बसलेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी गेले आणि त्यानंतर त्यांनी स्वाक्षरी केली. कल्याण काळे हे काँग्रेसचे माजी आमदार आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा काँग्रेसचे विद्यमान अध्यक्षही आहेत.

2009 मध्ये कल्याण काळे (Kalyan Kale) यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या रावसाहेब दानवे यांच्याविरोधात पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत काळे यांचा अवघ्या आठ हजार मतांनी पराभव झाला होता. त्यानंतर पंधरा वर्षांनी काँग्रेसने पुन्हा काळे यांनाच जालन्यातून उमेदवारी देत रावसाहेब दानवे यांच्याविरोधात मैदानात उतरवले.

काँग्रेसची ही खेळी यावेळी कमालीची यशस्वी ठरली आणि काळे तब्बल 1 लाख 9 हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले. दोनवेळा आमदार, पाच वेळा सलग खासदार आणि केंद्रात दोनवेळा राज्यमंत्री राहिलेल्या रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांचा काळे यांनी केलेला पराभव मोठा मानला जातो. या विजयाने काँग्रेसने तब्बल चाळीस वर्षाने जालना लोकसभा मतदारसंघात कमबॅक केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT