Congress News : काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांना सुरवातीला जालना जिल्ह्यातील शासकीय कार्यक्रमांमधून डावलण्याचे प्रकार घडले. यावर हक्कभंग आणण्याची नोटीसही त्यांनी संबंधितांना बजावली होती. त्यानंतर आता काळे यांना मतदारसंघातील विकासकामांचे भूमिपूजन, लोकार्पण, उद्घाटनासारख्या कार्यक्रमांना बोलावले जात आहे. जाफ्राबाद-भोकरदन मतदारसंघातील पाणीपुरवठा योजना, बसस्थानक आणि ई बसा चार्जिंग स्टेशनच्या कामाचे भूमीपूजन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित करण्यात आले.
याच कार्यक्रमात कल्याण काळे यांनी आपल्या भाषणातून माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना टोला लगावला. मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी आणि संतोष दानवे योजना मंजूर करून आणतो, पण बातम्या मात्र रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्या नावाने कशा छापून येतात? हे गौडबंगाल काही मला कळत नाही? ही कला मला रावसाहेब दानवे यांच्याकडून शिकावीच लागेल, असा चिमटा कल्याण काळे यांनी काढला. संतोष दानवे यांच्या हातात अजून दादांनी तिजोरीच्या सगळ्या चाव्या दिलेल्या नाहीत, अशी मिश्किल टिप्पणीही काळे यांनी यावेळी केली.
लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर जालना मतदारसंघातील अनेक शासकीय कार्यक्रमांमध्ये विद्यमान खासदार डाॅ. कल्याण काळे (Kalyan Kale) यांना डावलण्यात आले. तर माजी खासदारांना मात्र व्यासपीठावर मानाचे पान दिले जायचे. एक नाही तर अनेक कार्यक्रमात हा अनुभव आल्यानंतर कल्याण काळे यांनी आक्रमक भूमिका घेत ज्या खात्याशी संबंधित हे कार्यक्रम होते, त्या विभागाच्या प्रमुखांना पत्र पाठवून तुमच्यावर हक्कभंग का आणू नये, अशी विचारणा कल्याण काळे यांनी केली होती. त्यानंतर बऱ्याच दिवसांनी आजी-माजी खासदार, आमदार संतोष दानवे आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज एका कार्यक्रमात एकत्र दिसले.
राज्यातील जनतेसाठी राज्य शासन विविध लोककल्याणकारी लोकाभिमूख योजना राबवून गतिमान आणि पारदर्शक पद्धतीने काम करीत आहे. विकासाच्या संकल्पनेत जनतेचा सहभाग महत्त्वाचा आहे. प्रत्येक विकासाचे काम गुणवत्ता पूर्ण होण्यासाठी त्याच्यावर लक्ष ठेवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. समाजाच्या शेवटच्या नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन काम करत असून, जाफ्राबादच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिली.
जाफ्राबाद शहरातील ऐतिहासिक असलेल्या 49 कोटी 43 लाख रुपयांची पाणी पुरवठा योजना तसेच 5 कोटी रुपयांचे बसस्थानक बांधकामासाठी आणि 3 कोटी रुपयांची ई-बस चार्जिंग स्टेशन विकास कामांचा भूमिपूजन सोहळा आज पार पडला. या प्रसंगी खासदार डॉ. कल्याण काळे, आमदार संतोष दानवे, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, नगराध्यक्ष सुरेखा लहाने, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख, भास्कर दानवे, बद्री पठाडे, तहसीलदार श्रीमती सारिका भगत आदींची उपस्थिती होती.
यावेळी आपल्या भाषणात खासदार कल्याण काळे यांनी दानवे पिता-पुत्राला चिमटे काढले. भोकरदनचा पाणी प्रश्न सोडवण्याकडे सरकार म्हणून लक्ष द्या, असे काळे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना उद्देशून म्हणाले. लोकप्रतिनिधी कोणत्या पक्षाचा आहे, किंवा नगर परिषदेत कोणाची सत्ता आहे हे न पाहता नागरीकांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत, असेही काळे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.