Dharashiv Political News : 'मी कधीच उद्धव ठाकरेंना सोडणार नाही', असे म्हणणारे ओम राजेनिंबाळकर यांनी काहीच दिवसात आपली राजकीय भूमिका बदलली आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात काम करणार, शिवसेना पक्षात प्रवेश करतोय, अशी घोषणा करून एकच खळबळ उडवून दिली. त्यांच्या या निर्णयामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला असून शिंदेंचे ऑपरेशन टायगर अखेर पूर्णत्वास गेल्याची चर्चा आहे.
ओम राजेनिंबाळकर यांच्या या निर्णयामुळे राज्यात आणि दिल्लीतही शिवसेनेचे ताकद वाढली असून दुसरीकडे मात्र धाराशिवच्या राजकारणात उलथापालथ झाली आहे. येथे भाजपबरोबरच त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी राणा जगजीतसिंह पाटील यांना कडवे आव्हान निर्माण झाले आहे. तर ओम राजेनिंबाळकर यांच्या नव्या भूमिकेमागे दोन कारणे असल्याचे बोलले जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा होती. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे तब्बल सहा खासदार फुटल्याची चर्चा होती. पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर’ला धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्यामुळे ब्रेक लागला होता. त्यांनी आपण अद्याप कोणताच निर्णय घेतलेला नाही, ठाकरेंची शिवसेना सोडलेली नाही. दोन दिवसांत कार्यकर्त्यांशी बोलून भूमिका जाहीर करू असे सांगितलं होते. यामुळे ऑपरेशन टायगर फेल झाल्याची चर्चा होती.
मात्र पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला एकनाथ शिंदे यांनी थेट पत्रकार परिषदेतच आपण असे कोणतेही ऑपरेशन अर्धवट सोडत नाही. तुम्हाला लवकरच गुड न्यूज मिळेल असे सांगितले आणि इकडे ओम राजेनिंबाळकर यांनी आपला निर्णय जाहीर केला. जीवात जीव असेपर्यंत उद्धव ठाकरे यांची कधीही साथ सोडणार नाही असे म्हणणाऱ्या ओम राजेनिंबाळकर यांनीही सत्तेच्या मार्गावर पाय ठेवत शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय जाहीर केला.
हा निर्णय त्यांनी मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर घेतला. तसेच ज्या कारणांमुळे आपण राजकारणात आलो, ते आता वाईट वृत्तीचे लोक कोणत्याही परिस्थितीत राजकारणाच्या पटलावर राहिले नाही पाहिजेत, यासाठी काम करणार असल्याचे म्हटले.
तर आपण जरी वेगळी राजकीय भूमिका घेतलेली असली तरी मातोश्रीच्या विरोधात कुणीही काहीही बोलता कामा नये, असेही त्यांनी कार्यकर्त्यांना बजावले. आपण शिंदेंच्या सोबत गेलो असलो, तरी 'मातोश्री' किंवा उद्धव ठाकरेंविरुद्ध कधीही एकही शब्द उलटून बोलणार नाही, असेही ते म्हणाले आहेत.
निधीची चणचण...
यानंतर आता ओम राजेनिंबाळकर यांच्या भूमिकेमागे दोन कारणे असल्याचे बोलले जात असून त्यांना मतदार संघात कामे करताना निधीची चणचण भासत होती असा दावा त्यांनीच केला आहे. यावेळी त्यांनी आपली व्यथा मांडताना आम्ही लोकप्रतिनिधी सामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी संसदेत असतो. पण विरोधी पक्षात असल्याने मतदारसंघात साधा ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी सुद्धा आम्हाला अडचणींचा सामना करावा लागतो. निधीची फार मोठी अडचण होते. हक्काचा निधी असूनही तो मिळत नसल्यामुळेच विकासकामे पूर्णपणे ठप्प झाली असा दावा त्यांनी केला आहे.
तर दुसरे कारण म्हणजे निवडणुकीतील पराभवाची भीती आणि सत्तेसोबत गेलेच पाहिजे असा कार्यकर्त्यांचा सूर. याबाबतही ओम राजेनिंबाळकर यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या चिन्हावर उमेदवार उभे केले. प्रामाणिकपणे काम केले, पण यश आले नाही. शेवटी आम्हाला कार्यकर्त्यांच्या भरोशावरच निवडणुका लढवाव्या लागतात. आमचीच सत्ता नाही नसल्याने त्या हारलो. यामुळेच आपण ठाकरेंची शिवसेना सोडायला भाग पडल्याचे ते म्हणाले. तर याबाबत जेव्हा कार्यकर्त्यांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी आता संघर्ष पुरे झाला, जनतेची कामे करायची असतील तर सत्तेशिवाय पर्याय नाही, असे म्हटल्याचेही ते म्हणाले.
या सर्व घडामोडीत एकाच वेळी राज्यासह धाराशिवच्या राजकारणात उलथापालथ झाली असून थेट भाजपसमोरच आता आव्हान निर्माण झाले आहे. ठाकरेंचा पक्ष सोडताना त्यांनी राणाजगजितसिंह पाटील यांच्यावरही अप्रत्यक्ष निशाणा साधला. राणाजगजितसिंह पाटील हे भाजपचे नेते आहेत.
ओम राजेनिंबाळकर यांनी आपण त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही तर त्यांच्या उरावर जाऊन बसणार असल्याचे म्हणत अप्रत्यक्ष पणे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याविरोधात नव्याने एल्गार पुकारला आहे. यामुळे आता महायुतीतील दोन प्रमुख पक्षामध्ये हे दोन्ही कट्टर विरोधक एकाच जिल्ह्यात असल्याने भविष्यात राजकीय संकंट निर्माण होणार आहेत. यामुळे हा संघर्ष महायुतीचे नेते कसा मिटवतात हे पाहावं लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.