Mp Pratap Patil Chikhlikar Sarkarnama
मराठवाडा

Pratap Chikhlikar : खासदार चिखलीकर दोन पावलं मागे; पक्षांतर्गत विरोधकांना शांत करण्यात यशस्वी...

Political News : नियोजनबद्धरित्या पक्षांतर्गत विरोधकांना शांत केले. साम, दाम, दंड अशा सगळ्या अस्त्रांचा वापर त्यांनी केल्याचे बोलले जाते.

Laxmikant Mule

Nanded News : नांदेडचे विद्यमान खासदार प्रताप पाटील-चिखलीकर हे पक्षांतर्गत विरोधामुळे अडचणीत सापडले होते. अगदी मतदारसंघातील आमदारांशीही त्यांचे पटत नसल्याने गेल्या काही वर्षांत त्यांच्याविरोधात वातावरण तयार झाले होते. जाहीरपणे चिखलीकरसमर्थक आपल्याच पक्षाच्या आमदारांवर कार्यक्रमातून टीका करतानाही दिसले. परंतु नांदेड लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा विजय मिळवायचा असेल तर पक्षांतर्गत नाराजी आणि विरोध परवडणार नाही, हे लक्षात घेऊन चिखलीकर दोन पावलं मागे आले.

भाजपने केलेल्या अंतर्गत पाहणीमध्ये नांदेड लोकसभेची जागा डेंजर झोनमध्ये असल्याचा निष्कर्ष आल्यानंतर तर चिखलीकर बॅकफूटवरच गेले. पण वेळीच सावध होत त्यांनी पक्षांतर्गत विरोधकांना शांत केले. साम, दाम, दंड अशा सगळ्या अस्त्रांचा वापर त्यांनी केल्याचे बोलले जाते.

नायगावचे आमदार राजेश पवार यांच्याविरोधात चिखलीकरांसमोरच त्यांच्या समर्थकाने जाहीर टीका केली होती. आमदार पवार हे काँग्रेसधार्जिणे आहेत, असा आरोप केल्याने एकच खळबळ उडाली होती. अखेर राजेश पवार यांनी हा प्रकार भाजपश्रेष्ठींच्या कानावर घातला आणि त्याची गंभीर दखल घेण्याची मागणी केली. निवडणुकीच्या तोंडावर असे आरोप आणि अंतर्गत गटबाजी पक्षाला परवडणार नाही, हे लक्षात घेऊन आमदार पवार यांच्यावर आरोप करणाऱ्या चिखलीकर समर्थकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. कारवाईचे हे इंजेक्शन असे प्रभावी ठरले की पक्षांतर्गत गट-तट शांत झाले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुसरा धक्का दिला तो भाजपचे नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर यांना. पुढील अडीच वर्षे मीच अध्यक्ष राहणार, असा दावा करणाऱ्या भोयर यांना अवघ्या सहा महिन्यांत या पदावरून हटवण्यात आले. आता त्या पदावर चिखलीकर समर्थक किशोर देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली. प्रताप पाटील-चिखलीकर (Pratap chikhlikar) यांच्या मार्गातील अडथळे दूर करीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना झुकते माप दिल्याचे यावरून दिसून आले. भारतीय जनता पक्षाने मिशन 45 यशस्वी करण्यासाठी नांदेडच्या जागेकडे विशेष लक्ष दिले आहे.

संघटनात्मक पातळीवर बांधणी करून पदाधिकाऱ्यांना कामाला लावण्यात आले आहे. खासदार चिखलीकर व आमदार राम पाटील-रातोळीकर, राजेश पवार, डॉ. तुषार राठोड यांच्यातील मतभेदाची चर्चा राजकीय वर्तुळात केली जाते. काही दिवसांपूर्वी नांदेडला महायुतीचा समन्वय मेळावा पार पडला. या मेळाव्यात भाजपचे पदाधिकारी, आमदार एका व्यासपीठावर उपस्थित होते. गेल्या निवडणुकीतील राजकीय परिस्थिती व आजच्या राजकीय परिस्थिती यात खूप मोठा फरक आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सोबत घेऊन लढाई लढली तरच विजय शक्य

त्यामुळे बदलत्या राजकीय परिस्थितीत पक्षांतर्गत वाद परवडणारे नाहीत. त्यासोबतच लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे तूर्तास शांत राहण्याची भूमिका अनेकांनी घेतल्याचे बोलले जाते. चिखलीकरांनी उमेदवारीचा दावा करतानाच निवडून येण्याचा विश्वासही व्यक्त केला आहे. त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन लोकसभेची लढाई लढली तरच विजय शक्य होणार आहे.

नायगाव, बिलोली, देगलूर, मुखेड या भागात गेल्या निवडणुकीत चिखलीकरांना मोठे मताधिक्य मिळाले होते. हे मताधिक्य टिकवून ठेवण्यासाठी आमदार राजेश पवार, डॉ. तुषार राठोड (Tusahr Rathod), राम पाटील-रातोळीकर यांचे सहकार्य घ्यावे लागणार आहे. तेव्हा चिखलीकरांनी तूर्तास डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर असे धोरण स्वीकारले आहे.

(Edited By : Sachin Waghmare)

R...

SCROLL FOR NEXT