Shiv sena UBT News : शिवसेना शिंदे गटाकडून सुरु असलेल्या 'मिशन टायगर'ला यश येत असल्या दावा केला जातोय. दिल्लीत सध्या शिंदेंच्या मंत्री, खासदारांकडून सर्वपक्षीय जेवणावळीच्या नावाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सहा खासदारांसाठी गळ टाकला जात आहे. शिवसेनेचे केंद्रातील मंत्री प्रतापराव जाधव यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजन कार्यक्रमाला परभणीचे खासदार संजय जाधव, हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर यांनी हजेरी लावली.
दोन दिवसापुर्वीच या दोघांनी पत्रकार परिषद घेऊन आम्ही उद्धव ठाकरेंना सोडून कुठेही जाणार नाही, अशी ग्वाही दिलेली आहे. (Parbhani) आज दिल्लीत या दोघांनी शिंदेंच्या मंत्र्यांनी दिलेल्या जेवणाच्या पंगतीत हजेरी लावल्याचे समोर आल्यानंतर या दोघांच्या मतदारसंघात विरोधकांकडून रान उठवले गेले. परंतु ज्या मतदारांनी जाधव,आष्टीकरांना निवडून दिले त्यांना मात्र हे दोघेही गद्दारी करणार नाहीत, ते पक्ष सोडून जाणार नाही, असेच वाटते.
परभणी जिल्ह्याला शिवसेनेच्या राजकीय इतिहासात मोठे महत्व आहे. शिवसेना पक्षाच्या धनुष्यबाण चिन्हाला मान्यता मिळण्यात परभणीतील हिंदुत्ववादी मतदारांची मोठी भूमिका होती. शिवसेनेने अनेकांना आमदार, खासदार केले, यातील काहींनी पक्ष सोडला पण परभणीच्या मतदारांनी मात्र शिवसेनेची साथ कधीच सोडली नाही. विद्यमान खासदार (Sanjay Jadhav) संजय जाधव हे सलग तीसऱ्यांदा लोकसभेवर निवडून गेले. त्यांच्या या हॅट्रीकमध्ये पक्ष फुटीनंतर त्यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर दाखवलेली निष्ठा महत्वाची ठरली होती.
जिल्ह्यात 'बंडू बॉस'नावाने परिचित असलेल्या संजय जाधव यांच्याबद्दल गेल्या काही दिवसापासून ते शिंदेच्या शिवसेनेत जाणार, अशी चर्चा सुरू आहे. स्वतः जाधव यांनी याबाबत खुलासा करत आपण कुठेही जाणार नाही, शिवसेनेने मला खूप काही दिले असे स्पष्ट केले. एकीकडे ते पक्षासोबत निष्ठा कायम असल्याचे सांगत आहेत, तर दुसरीकडे दिल्लीत सुरू असलेल्या त्यांच्या संशयास्पद हालचालीने इकडे मतदारसंघातही उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
विरोधकांनी तर ते पक्ष सोडून जाणार हे ठामपणे सांगायला सुरूवात केली आहे. पण परभणीच्या ज्या मतदारांनी जाधव यांना सलग तीन वेळा लोकसभेवर निवडून पाठवले, त्यांना मात्र अजूनही बंडू जाधव हे उद्धव ठाकरे आणि शिवसेनेशी कधीच गद्दारी करणार नाही, असा विश्वास आहे. वारकरी संप्रदायाशी जोडले गेलेले, पंढरपूरची वारी करणारे जाधव आपल्या निष्ठा विकणार नाही, असे त्यांचे समर्थक ठामपणे सांगत आहेत.
उद्धव ठाकरेंशी झाले होते मतभेद..
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आणि मुख्यमंत्री पदी उद्धव ठाकरे विराजमान झाल्यानंतर खासदार संजय जाधव यांचे त्यांच्याशी मतभेद झाले होते. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पालकमंत्र्यांकडून विकास कामासाठी निधी देताना अन्याय केला जातो. मतदारसंघात लोकांची कामं करता येत नसतील तर खासदारकी काय कामाची? अशी नाराजी व्यक्त करत त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला होता. याशिवाय महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना त्यांनी आदित्य ठाकरेंना मंत्री करायला नको होते, अशी थेट टीकाही तेव्हा केली होती.
मतभेदाचे असे अनेक प्रसंग घडले, पण शिवसेना फुटली तेव्हा या संकटाच्या काळात संजय जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरच विश्वास दाखवला होता. दिल्लीत माध्यमांनी आज जेव्हा त्यांना प्रताप जाधव यांच्या घरी जेवणाला जाणे योग्य आहे का? असा प्रश्न विचारला तेव्हा संजय जाधव यांनी त्रागा केला, पत्रकारांवरच ते घसरले. एवढेच नाही तर 'मिशन टायगर' फेल आहे, असे सांगत आपण पक्ष सोडून जाणार नाही हे स्पष्ट केले. आता संशयाचे जाळे फिटते का? परभणीकरांचा जाधव यांच्यावरचा विश्वास सार्थ ठरतो का? हे काही दिवसातच स्पष्ट होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.