Shivsena UBT MP sanjay jadhav sarkarnama
मराठवाडा

Shiv-Sainiks Protest against Sanjay Jadhav : खासदार संजय जाधव यांच्या विरोधात परभणी जिल्ह्यातील शिवसैनिक रस्त्यावर; सोनपेठमध्ये प्रतिकात्मक अंत्ययात्रा!

Sonpeth symbolic funeral procession news : परभणी जिल्ह्यात खासदार संजय जाधव यांच्या विरोधात शिवसैनिक रस्त्यावर उतरले. सोनपेठमध्ये प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

Jagdish Pansare

Parbhani News : शिवसेनेला पहिला खासदार देणाऱ्या परभणी जिल्ह्यात गद्दारीची परंपरा तीन टर्म खासदार म्हणून निवडून आलेल्या संजय जाधव यांनी कायम राखली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरचे शिकार झालेले खासदार संजय जाधव यांच्याविरोधात त्यांच्याच मतदारसंघात संतापाचे वातावरण आहे.

'बंडू बॉस' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संजय जाधव यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढत शिवसैनिकांनी आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली. इकडे संजय जाधव यांना वाय सुरक्षा पुरविण्यात येणार असल्याची माहिती असतानाच परभणीतील त्यांच्या बाळासाहेब ठाकरे नगरातील सद्गुरू कृपा या निवासस्थानी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

गेल्या वर्षभरापासून खासदार संजय जाधव हे शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार अशी चर्चा होती. अखेर ही चर्चा खरी ठरली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा खासदार शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. आज राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांच्या लोकसभेतील पक्ष कार्यालयात बोलावण्यात आलेल्या बैठकीला नऊपैकी फक्त तीन खासदार हजर होते. ऑपरेशन टायगरमध्ये चर्चा असलेल्या सहा खासदारांनी या बैठकीला दांडी मारल्याने ते फुटले हे आता स्पष्ट झाले आहे.

मराठवाड्यातील परभणीचे संजय जाधव, धाराशिवचे ओमराजे निंबाळकर आणि हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर यांचा ऑपरेशन टायगरमध्ये समावेश आहे. आपला खासदार फुटला याची खात्री पटल्यानंतर परभणीमध्ये संतप्त पडसाद उमटत आहेत. सोनपेठ तालुक्यात संतप्त शिवसैनिकांनी संजय जाधव यांच्या प्रतिमेला जोडे मारत त्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्राही काढली.

सोनपेठ येथील पक्ष कार्यालयासमोर सकाळपासूनच संतप्त शिवसैनिक जमा व्हायला सुरुवात झाली होती. संजय जाधव यांच्या प्रतिमेला चपलांचा हार घालत नंतर त्यांच्या पुतळ्याची प्रतीकात्मक अंत्ययात्रा देखील काढण्यात आली. यावेळी गद्दार संजय जाधव अशा घोषणाही देण्यात आल्या. छत्रपती शिवाजी महाराज चौकात संजय जाधव यांच्या प्रतिमेचे दहन करत शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता. आम्ही फक्त उद्धव ठाकरे यांच्यासोबतच अशी ग्वाही देखील शिवसैनिकांनी दिली.

संजय जाधव यांच्या विरोधातील वाढता रोष पाहता त्यांच्या निवासस्थानी मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. याशिवाय जाधव यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा प्रदान करण्या संदर्भात गृह विभागाने पोलीस अधीक्षकांना आदेश दिल्याचे समजते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT