Mla Abhimanyu Pawar News, Aurangabad
Mla Abhimanyu Pawar News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

MPSC News : विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी झटले, विद्यार्थ्यांनी अभिमन्यू पवारांना खांद्यावर उचलून घेतले..

सरकारनामा ब्युरो

Aurangabad : एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या राज्यातील लाखो विद्यार्थांना दिलासा देणार निर्णय काल घेण्यात आला. (MPSC Exam) नवा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय घेणार असल्याचे आश्वासन सरकारच्या वतीने देण्यात आले आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश मिळाले. या विद्यार्थ्यांच्या वेळोवेळी झालेल्या आंदोलनात सत्ताधारी, विरोधक अशा सगळ्याच लोकप्रतिनिधींनी भेटी देवून पाठिंबा दर्शवला होता.

त्यामुळे आता या निर्णयाचे श्रेय घेण्यासाठी देखील चढाओढ सुरू झाली आहे. (Marathwada) पण काल एमपीएससी विद्यार्थ्यांच्या पुण्यातील आंदोलनात एक चेहरा जो सरकार आणि विद्यार्थ्यांमध्ये समन्वयाची भूमिका निभावत होता तो लक्ष वेधून घेणारा ठरला. तो म्हणजे औसा विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार अभिमन्यू पवार (Abhimanyu Pawar) यांचा.

आंदोलन चिघळत असतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून विद्यार्थ्यांचा संपर्क साधून दिल्यामुळे यातून मार्ग निघाला आणि लाखो विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात पडला. नवा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय घेण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी अभिमन्यू पवार यांना खांद्यावर उचलून धरत जल्लोष केला. यावरून पवारांनी या सगळ्या आंदोलनात किती महत्वाची भूमिका बजावली याचा अंदाज येतो.

या संदर्भात आमदार अभिमन्यू पवार यांच्याशी `सरकारनामा`ने संपर्क साधला. तेव्हा त्यांनी लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न सोडवण्यासाठी केलेला पाठपुरावा, भेटीगाठी, दौरे या संदर्भात माहिती दिली, अभिमन्यू पवार म्हणाले, बारा भेटी आणि आणि साडेचार महिन्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आज यश मिळाले याचे समाधान आहे. राज्यसेवा वर्णनात्मक परीक्षापद्धतीची अंमलबजावणी २०२५ पासून करण्याचा शासनाचा हा संवेदनशील निर्णय आहे.

राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय २०२३ ऐवजी २०२५ पासून लागू करण्यात यावा या मागणीसाठी मी मागच्या साडेचार महिन्यांपासून पाठपुरावा करत होतो. या मागणीसाठी मागच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ४ वेळा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ५ वेळा तर मुख्य सचिव यांची १ वेळा, सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांची २ वेळा भेट घेतली होती. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न असल्यामुळे यासंदर्भात निर्णय घेण्याची विनंती केली होती.

१० डिसेंबर, २०२२ रोजी उपमुख्यमंत्री महोदयांनी तर १३ डिसेंबर, २०२२ रोजी मुख्यमंत्र्यांनी या मागणीसंदर्भात अहवाल सादर करण्याच्या सूचना अतिरिक्त मुख्य सचिव (सामान्य प्रशासन विभाग) यांना दिल्या होत्या. त्यानंतर १९ जानेवारी, २०२३ रोजी पुन्हा उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या विषयाचा पाठपुरावा केला होता. सर्व बाजूंनी विचार करून अतिशय संवेदनशील मनाचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महोदयांनी राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय घेतला.

मंत्रिमंडळ बैठकीत याला मंजुरीही प्राप्त झाली आहे. राज्यसेवा जागावाढ करवून घेण्यात व पोलीस उपनिरीक्षक पदभरती महिला उमेदवारांसाठीचे शारीरिक चाचणीचे निकष बदलवून घेण्यात आलेल्या यशानंतर 'राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय २०२५ पासून करण्यात यावा' या महत्वपूर्ण मागणीला सुद्धा पूर्णत्वास नेण्यात यश लाभले, याचा मनस्वी आनंद आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे तरुण वर्गाच्या प्रश्नांप्रती अतिशय संवेदनशील असल्याची प्रचिती आज पुन्हा एकदा आल्याचे पवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT