Ashok Chavan Y Plus Security  Sarkarnama
मराठवाडा

Nanded BJP News : भाजपात गेलेल्या अशोक चव्हाण यांना '50 कोटींचे' रिटर्न गिफ्ट...

Laxmikant Mule

Nanded Polilitical News : राज्यातील राजकारणात पक्षांतराच्या घटना दररोज घडत आहेत. नुकतेच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना त्यांच्या या पक्षप्रवेशाबद्दल राज्यातील शिंदे फडणवीस पवार सरकारकडून रिटर्न गिफ्ट देण्यात आले आहे अशोक चव्हाण ज्या भोकर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत, त्या मतदारसंघातील रस्त्यांच्या कामासाठी 50 कोटींचा निधी देण्यात आला आहे. (Latest Marathi News)

भारतीय जनता पक्षात अशोक चव्हाण यांनी प्रवेश केल्यानंतर अवघ्या 24 तासांच्या आत त्यांना राज्यसभेचे उमेदवारी मिळाली. अशोक चव्हाण बिनविरोध निवडून आले व राज्यसभेत गेले. त्यांच्या भाजप मधील दुसऱ्या इनिंगला दमदार सुरुवात झाली आहे. काँग्रेसमध्ये असतानाही त्यांच्या विकासकामांना महायुतीचे सरकार मंजुरी देत असे. आता तर ते सत्ताधारी पक्षाचे खासदार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यामुळे आता अशोक चव्हाण यांना सरकारकडून भरघोस निधी दिला जाणार आहे. याची सुरुवात त्यांच्या भोकर विधानसभा मतदारसंघातून झाली आहे. मतदारसंघातील तीन रस्त्यांच्या कामांना 50 कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याला दिडशे कोटींच्या कर्जाला शासनाने थकहमी दिली होती. तेव्हा ते काँग्रेसमध्ये मध्ये होते.

तसेच भोकर विधानसभा (ASSEMBLY Election) मतदारसंघातील पाणी पुरवठा योजनेसाठी सुमारे साडेसातशे कोटींची मंजुरी देण्यात आली होती. या कामाला गेल्या वर्षी सुरुवातही झाली आहे. केंद्र सरकारने केंद्रीय रस्ते विकास निधीतून राज्यातील 81 रस्ते विकासाच्या कामांसाठी 1 हजार 600 कोटी रुपये मंजूर केले असून, त्यामध्ये अशोक चव्हाण यांच्या पाठपुराव्याने भोकर विधानसभा मतदारसंघातील 50 कोटी रुपयांच्या तीन कामांचा समावेश आहे.

या कामांसाठी अशोक चव्हाण आग्रही होते. मागील अनेक आठवड्यांपासून यासाठी त्यांनी प्रयत्न चालवले होते. त्या पाठपुराव्याला यश आले असून, आर्थिक वर्ष 2023-24 च्या केंद्रीय रस्ते निधीतून या कामांना मान्यता मिळाली आहे. त्यामध्ये राज्य महामार्ग क्र. 419 वरील किनी ते पाळज रस्त्याची घाटासह सुधारणा (15 कोटी रूपये), प्रमुख जिल्हा मार्ग क्र. 100 वरील शेलगाव, बामनी, मेंढला, सांगवी, अर्धापूर, देळूब आणि शेनी या गावांना जोडणारा रस्ता (20 कोटी रूपये) तर राज्य महामार्ग क्र. 423 वरील डौर, सायाळ, रायखोड या गावांना जोडणाऱ्या रस्त्याचा (15 कोटी रूपये) समावेश आहे.

विशेष म्हणजे अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांची कालच राज्यसभेचे खासदार म्हणून बिनविरोध निवड झाली आणि त्यानंतर सदरहू कामांच्या मंजुरीचे वृत्त येऊन थडकले. पुढील काळात नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी निधी उपलब्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT