Municipal Corporation News : नांदेड जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेसची वाताहत झाली आहे. अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसकडे असलेली मुस्लिम मतांची वोट बँक तोडण्यासाठी मुदखेड आणि भोकरमध्ये केलेला प्रयोग प्रभावी ठरल्यानंतर महापालिकेसाठीही त्यांनी एमआयएमच्या माध्यमातून काँग्रेसला धक्का आणि भाजपच्या विजयाचा मार्ग स्वीकार करण्याचे प्रयत्न सुरू केले.
नांदेडमध्ये काँग्रेसच्या दहा माजी नगरसेवकांनी एमआयएममध्ये अचानक प्रवेश केल्याने यामागे अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचेच डोके असल्याची चर्चा सुरू झाली आहे. हैदराबादमधून तेलंगणा मार्गे सर्वात आधी नांदेडमध्ये आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात एमआयएमने आपल्या पक्षाचा विस्तार केला. या पक्षाचा सर्वाधिक फटका तेव्हा काँग्रेसमध्ये असलेल्या अशोक चव्हाण यांना नांदेडमध्येच बसला होता. भविष्यातील ही धोक्याची घंटा ओळखत काही काळातच अशोक चव्हाण यांनी एमआयएमचा बंदोबस्त केला.
मराठवाड्यातील बीड, परभणी, नांदेड छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये एमआयएमचा मोठा प्रभाव आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीत भोकरमधून कन्या श्रीजया चव्हाण यांना निवडून आणत राजकीय समीकरण जुळवून आणली. नांदेड जिल्ह्यात महायुतीने सर्व जागा जिंकले असल्या तरी यात अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वापेक्षा राज्य सरकारने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' आणली त्याचे श्रेय अधिक होते.
आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये आपापले जिल्हे आणि मतदारसंघ सांभाळण्यासाठी नेत्यांनी डावपेच टाकण्यास सुरुवात केली आहे. अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीपासूनच याला सुरुवात केली. भोकर आणि मुदखेड या सुरुवातीपासूनच्या बालेकिल्ल्यात अशोक चव्हाण यांनी भाजपला (BJP) मुस्लिम मतदार मतदान करणार नाही हे आधीच ओळखले. मात्र ही मत काँग्रेसकडे जाऊ नये यासाठी एमआयएमच्या माध्यमातून उमेदवार उभे केले आणि त्यांनी टाकलेला डाव कमालीचा यशस्वी ठरला.
नांदेड वाघाळा महापालिकेवर आपले वर्चस्व राखण्यासाठी अशोक चव्हाण यांनी काँग्रेसमधील आपल्या जुन्या समर्थकांना विश्वासात घेत एमआयएममध्ये पाठवत मुस्लिमांची मते काँग्रेस पासून तोडण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जाते. महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेसच्या 10 नगरसेवकांनी एमआयएममध्ये केलेला प्रवेश हा अशोक चव्हाण यांच्या रणनीतीचा भाग असल्याचेच मुस्लिम नेते ठामपणे बोलत आहेत.
भोकर, मुदखेड नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी अशोक चव्हाण यांनी हा प्रयोग केला होता. भाजपाच्या भगवान दंडवे यांना 7 हजार 670 तर काँग्रेसच्या संदीप गोविंद बाबा गौड यांना 4 हजार 647 मते मिळाली होती. त्यांचा 2700 मतांनी पराभव झाला. निवडणुकीआधी गोविंद बाबा गौड यांचे कट्टर समर्थक मुबीन मौलाना यांनी अचानक एमआयमध्ये प्रवेश केला आणि नगराध्यक्ष पदाची उमेदवारीही मिळवली. त्यामुळे मुस्लिम मतांची विभागणी झाली आणि त्याचा थेट फायदा भाजपच्या दंडवे यांना झाला.
हाच प्रयोग मुदखेड नगर परिषदेतही करण्यात आला. काँग्रेसच्या माजी नगरसेवकाच्या पत्नीने एमआयएमकडून नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवली. हिना कौसर यांनी 2559 मते घेतली. या ठिकाणी भाजप उमेदवार विश्रांती कदम या सतराशे मतांनी विजयी झाल्या. काँग्रेसच्या उमेदवार शीला कोत्तावार यांचा या निवडणुकीत पराभव झाला. एमआयएमच्या उमेदवारांचा मुदखेड आणि भोकर नगर परिषदेत भाजपाला थेट फायदा झाल्याचे दिसून आले.
आता नांदेड महानगरपालिकेसाठी मुस्लिम बहुल भागात हाच प्रयोग राबवला जाणार आहे. महापालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू होताच काँग्रेसचे माजी महापौर शमीम अब्दुल्ला, मसूद अहमद खान यांच्यासह हबीब बागवान, चांदपाशा कुरेशी, अब्दुल रशीद, अन्सार खान, अब्दुल हफिज आणि नासिर खान यांनी एमआयएममध्ये प्रवेश केला. आणखी दोन माजी नगरसेवकही एमआयएममध्ये जाण्याचे तयारीत असल्याचे बोलले जाते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.