Sarkarnama
मराठवाडा

Nanded Congress News : काँग्रेसकडून डॅमेज कंट्रोलसाठी नांदेडात आज गुप्त बैठक; चार निरीक्षक दाखल...

Congress News : नांदेडसह मराठवाड्यातील आढावा घेऊन डॅमेज कंट्रोलचे करणार प्लॅनिंग

Laxmikant Mule

Nanded : भारतीय जनता पक्षात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रवेश केल्यानंतर काँग्रेसचे राज्य आणि देशपातळीवरील नेते खडबडून जागे झाले आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अशोक चव्हाण यांच्या भाजपमध्ये जाण्याने मराठवाडा आणि राज्यात कुठेकुठे नुकसान होऊ शकते याचा आढावा घेण्यासाठी चार निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. हे निरीक्षक नांदेडसह मराठवाड्यातील आढावा घेऊन डॅमेज कंट्रोलचे काम करणार असल्याचे समजते.

दोन वेळा राज्याचे मुख्यमंत्री, खासदार, प्रदेश कमिटीचे अध्यक्ष यासह दिल्ली काँग्रेस समितीत विविध पदे मिळाल्यानंतरही अशोक चव्हाण यांनी चार दशकांपासून असलेली काँग्रेसची साथ सोडली. ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय घेत मोठा राजकीय भूकंप राज्यात आणि काँग्रेसमध्ये घडवून आणला. आता या भूकंपाचे धक्के कुठे कुठे बसणार, याचा अंदाज काँग्रेसकडून घेतला जात आहे.

डॅमेज कंट्रोलसाठी काँग्रसने चार निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. भाजपने काँग्रेसचा अशोक चव्हाण यांच्यासारखा मोठा मासा गळाला लावल्याने नांदेड जिल्ह्यात काँग्रेसचे अस्तित्व धोक्यात आले आहे, तर भाजपला अशोक चव्हाण यांच्या रूपाने मराठवाड्यासाठी एक सक्षम व जनाधार असलेला नेता मिळाला आहे. नांदेड जिल्ह्यात अशोक चव्हाण यांची एकहाती सत्ता राहिली आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात आमदार, नगरसेवक, नगराध्यक्ष, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तयार झाले आहेत.

हे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते पक्षापेक्षा अशोक चव्हाण यांच्याशी एकनिष्ठ आहेत. त्यांच्यासोबत आणखी किती पदाधिकारी, कार्यकर्ते, आमदार, माजी आमदार, नांदेड शहरातील नगरसेवक जाऊ शकतात, याचा आढावा घेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चार निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. पक्षाला आत्ता नव्याने उभारी घेण्यासाठी आजी-माजी पदाधिकारी सोबत घेऊन काम करावे लागणार आहे.

याच्याच तयारीचा भाग म्हणून प्रदेश सरचिटणीस अनिल पटेल, अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हात्तीआंबिरे, संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष शेख युसूफ, प्रदेश चिटणीस मुजाहिद या चार निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे चार निरीक्षक आज 15 फेब्रुवारीपासून नांदेड शहरात बैठक घेऊन अहवाल तयार करणार आहेत. या बैठकीचे निमंत्रण आजी-माजी आमदार, पदाधिकारी यांना देण्यात आले असून, बैठकीचे ठिकाण गुप्त ठेवण्यात आले आहे.

काँग्रेसची होणारी पडझड थांबवून नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या कराव्या लागणार आहेत. तसेच लोकसभा निवडणुकीची नव्याने तयारी सुरू करावी लागेल. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे यांनी अशोक चव्हाण यांची साथ सोडून काँग्रेसमध्ये राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच नांदेड शहरातील मुस्लिम नगरसेवक हेही काँग्रेस सोडणार नसल्याची माहिती आहे.

Edited By : Rashmi Mane

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT