Ashok Chavan news : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 23 पैकी 21 संचालक निवडून आणत खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या शेतकरी विकास पॅनलने दणदणीत विजय मिळवला. जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र आणण्याची किमया साधल्यानंतर अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात घालायची यासंदर्भात मोठा पेच अशोक चव्हाण यांच्यासमोर असणार आहे.
गेल्या कित्येक वर्षापासून अशोक चव्हाण यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे बी. आर. कदम उर्फ काका आणि सहकार क्षेत्राचा दांडगा अनुभव असणारे मारोतराव कवळे या दोन संचालकांमध्ये अध्यक्षपदासाठी स्पर्धा असल्याचे बोलले जाते. दोघेही अशोक चव्हाण समर्थक असल्यामुळे नेमकी निवड कोणाची होणार? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर बी. आर. कदम हे कोणता राजकीय निर्णय घेतात याकडे सगळ्यांच्या नजरा होत्या. मात्र त्यांनी अशोक चव्हाण यांची साथ न सोडण्याचा निर्णय घेतला. स्वतः अशोक चव्हाण हे कदमांच्या घरी जाऊन त्यांना भेटले होते. विधानसभा निवडणुकीत दोन वेळा इच्छुक असलेल्या परंतु संधी हुकलेल्या कदम काकांना अध्यक्षपद देत अशोक चव्हाण त्यांची नाराजी दूर करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दुसरीकडे साखर कारखानदारी, पतसंस्थेच्या माध्यमातून सहकार क्षेत्र ढवळून काढणारे अनुभवी मारोतराव कवळे अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. संचालक मंडळातील सर्वांशीच सलोख्याचे संबंध असलेल्या कवळे यांना संधी दिली जाऊ शकते अशी ही शक्यता वर्तवली जात आहे. आता अशोक चव्हाण ही कोंडी कशी फोडतात? हे लवकर स्पष्ट होईल.
उपाध्यक्ष पदासाठी प्रणिता देवरे, मीनल पाटील यांच्यात रस्सीखेच
एकीकडे अध्यक्षपद कोणाच्या गळ्यात पडते याची चर्चा सुरू असतानाच उपाध्यक्ष पदावर महिला संचालकाची वर्णी लागावी अशी इच्छा निवडून आलेल्या पाच महिला संचालकांकडून व्यक्त केली जात आहे. अध्यक्षपदाची माळ भाजपच्या संचालकाच्या गळ्यात पडणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे किमान उपाध्यक्ष पद तरी महायुतीतील मित्र पक्षाला मिळावे अशी अपेक्षा नेते बाळगून आहेत. या स्पर्धेत आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या कन्या प्रणिता देवरे चिखलीकर यांचे नाव आघाडीवर आहे.
तर दुसरीकडे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष भास्कर पाटील खतगावकर यांच्या सुनबाई मीनल पाटील खतगावकर या पहिल्यांदाच संचालक म्हणून निवडून आल्या आहेत. सुशीला बेटमोगरेकर, आमदार राजेश पवार यांच्या पत्नी पूनम पवार यांनाही उपाध्यक्ष पदाची अपेक्षा आहे. त्यामुळे या पदावर लेक की सून? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.