Ashok Chavan Sarkarnama
मराठवाडा

Nanded DCC Bank: नांदेड जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी 'हेवीवेट' रिंगणात : कट्टर विरोधकासह 4 आमदारांची अशोक चव्हाणांकडे फिल्डिंग

Nanded DCC Bank, Ashok Chavan, Shetkari Vikas Panel: नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलचे वर्चस्व प्रस्थापित झाले. आता बँकेला अ वर्गात आणणे, नफा वाढवणे आणि सभासदांचा विश्वास संपादन करणे हे मोठे आव्हान आहे.

Jagdish Pansare

Nanded DCC Bank: नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ताब्यात घेण्यासाठी भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी सर्वपक्षीय नेत्यांची मोट बांधली. ११ संचालक बिनविरोध निवडून आणल्यानंतर उर्वरित १२ जागांपैकी दहा जागा जिंकत त्यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलने २३ पैकी २१ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.

कोण होणार अध्यक्ष?

नांदेड जिल्हा बँकेत २३ पैकी २१ जागा जिंकत शेतकरी विकास पॅनलने बाजी मारल्यानंतर अध्यक्षपदावर कोणाची वर्णी लागणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. अशोक चव्हाण यांनी जिल्हा बँक ताब्यात घेण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची मोट बांधली असली तरी अध्यक्षपदावर ते आपल्या समर्थकाचीच वर्णी लावतील असे बोलले जाते.

दरम्यान नव्या संचालक मंडळामध्ये आधीच्या संचालक मंडळात असलेले सहा संचालक पुन्हा निवडून आले आहेत. त्यामुळे या संचालकांचाही अध्यक्षपदावर दावा असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर, प्रणिता देवरे चिखलीकर, बँकेचे माजी अध्यक्ष भास्कर पाटील खतगावकर यांच्या सुनबाई मीनल पाटील खतगावकर, भाजपचे आमदार डॉ. तुषार राठोड, भीमराव केराम, आमदार राजेश पवार यांच्या पत्नी पूनम पवार, मारोतराव कवळे यांच्यासह अनेक इच्छुक अध्यक्षपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत.

शेतकरी हितासाठी राजकारण बाजूला ठेवून एकत्र आल्याचा दावा करणाऱ्या जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते तसेच नवनिर्वाचित संचालक मंडळासमोर बँकेची आर्थिक स्थिती सुधारून ती ब वर्गातून अ वर्गात आणण्याचे मोठे आव्हान असणार आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी या जिल्हा बँकांची आर्थिक स्थिती गेल्या काही वर्षात सुधारली असली तरी मोठी झेप घेण्यात त्यांना अद्याप यश आलेले नाही.

मराठवाड्यातील एकमेव लातूर जिल्हा सहकारी बँक सोडली तर उर्वरित जिल्हा बँकांची अवस्था बिकट आहे. शेतकरी आणि बँकेच्या सभासदांना कर्ज पुरवठा करणाऱ्या या बँका सक्षम असणे गरजेचे आहे. सर्व जिल्हा बँकांवर राजकारणातील मंत्री,आमदार किंवा त्यांचे नातलग संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे जिल्हा बँकांच्या चांगल्या- वाईट अवस्थेलाही त्यांनाच जबाबदार धरले जाते.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, परभणी व नांदेड जिल्हा बँकेची निवडणूक नुकतीच पार पडली. विशेष म्हणजे या तीनही बँकांमध्ये महायुती प्रणित पॅनलने बाजी मारलेली आहे. नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेत अशोक चव्हाण यांनी सर्वपक्षीय पुढार्‍यांना सोबत घेत योग्य समन्वय साधला. परिणामी निम्मे संचालक मंडळ हे बिनविरोध निवडून आले. उर्वरित १२ संचालकांपैकी १० संचालक ही शेतकरी विकास पॅनलचे निवडून आल्याने बँकेवर अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एकहाती सत्ता गेली आहे.

त्यामुळे शेतकरी आणि बँकेच्या सभासदांना नव्या संचालक मंडळाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. यात प्रामुख्याने नांदेड जिल्हा बँकेला अ वर्गात आणण्यासाठी नव्या संचालकांनी प्रयत्न करावेत. नांदेड जिल्हा बँक पूर्वीच्या आर्थिक कोंडीतून काहीशी सावरल्याचे चित्र आहे. त्यामुळे या बँकेला राज्यातील अग्रगण्य जिल्हा बँकांच्या यादीत आणण्यासाठी संचालक मंडळाला खूप मेहनत घ्यावी लागेल. वेगवेगळ्या उपाययोजना कराव्या लागतील तसेच बँकेबद्दल विश्वासाची भावना निर्माण करणे हे मोठे आव्हान असणार आहे.

मागील संचालक मंडळाच्या कार्यकाळात ही बँक संचित तोट्यातून मुक्त झाली आहे गेल्या आर्थिक वर्षाअखेरीस बँकेला नाममात्र निव्वळ नफा झाला. पूर्वीची दुरावस्था पाहता हे चित्र दिलासा देणारे असले तरी समाधानकारक निश्चितच नाही. नव्या संचालक मंडळाच्या डोक्यावर तोट्याचे ओझे नसल्याने बँकेला अधिकाधिक नफ्यात आणून शेतकऱ्यांना व सभासदांना दिलासा कसा देता येईल यासाठी प्रयत्न करण्यास भरपूर वाव आहे.

नांदेड जिल्हा बँक अजूनही ब वर्गात आहे ऑडिटमध्ये अ वर्ग प्राप्त करून तो सतत तीन वर्षे कायम ठेवण्याचे ध्येय ठेवून संचालक मंडळाला काम करावे लागेल. विविध बँकेच्या ठेवी वाढवणे शहरी व ग्रामीण भागातून व्यावसायिक खातेदार वाढविणे त्यासाठी आवश्यक असलेल्या जलद सुविधा खातेदारांना देणे अशा अनेक आघाड्यांवर नव्या संचालक मंडळाला काम करावे लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT