Ashok Chavan Sarkarnama
मराठवाडा

Nanded BJP News : अशोक चव्हाणांमुळे नांदेडची जागा सेफ झोनमध्ये; आघाडीला धडकी

Laxmikant Mule

Nanded Politics News :

अशोक चव्हाणांसारखा मोठा मासा गळाला लागल्यामुळे नांदेड लोकसभेची डेंजर झोन मधील जागा आता सेफ झाली आहे. भाजपच्या निवडणुकपुर्व अंतर्गत सर्व्हेमध्ये विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची जागा डेंजर झोनमध्ये दर्शवण्यात आली होती. परंतु त्यानंतर ज्या अशोक चव्हाणांचे भाजपला जिल्ह्यात तगडे आव्हान होते, तेच भाजपमध्ये दाखल झाले. शिवाय त्यांनी सगळा जिल्हा काँग्रेसमुक्त करण्याच्या दिशेने वेगवान वाटचाल सुरू केली आहे. त्यामुळे आता भाजपचा जो कोणी उमेदवार असेल तो निश्चित निवडून येईल, असा विश्वास भाजप नेतृत्वाला आला आहे.

Maha Vikas Aghadi ला मात्र यामुळे धडकी भरली आहे. निवडणूक आचार संहिता आठवडाभरात लागण्याची शक्यता वर्तवली जात असताना अजूनही महाविकास आघाडीचा नांदेडचा उमेदवार ठरताना दिसत नाहीये. भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र वगळता अन्य राज्यातील 195 उमेदवारांची पहिली उमेदवारी यादी जाहीर केली आहे. येत्या काही दिवसांत महाराष्ट्रातील जागावाटप निश्चित झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे.

नांदेडची जागा भारतीय जनता पक्षाने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणात डेंजर झोनमध्ये असल्याची चर्चा सुरू होती. पण अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशमुळे परिस्थिती सुधारली असल्याने उत्सुक उमेदवारांची संख्या वाढत चालली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांची मात्र धाकधूक वाढली आहे. नांदेडची जागा भारतीय जनता पक्षाला सुटणार असल्याने भाजपने पक्षनिरीक्षकांना पाठवून उमेदवारांची चाचपणी केली आहे.

लोकसभेची निवडणूक पुन्हा लढण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी निवडणूकीची तयारी बऱ्याच महिन्यापासून सुरू केली आहे. उमेदवारी बाबत ते प्रचंड आशावादी आहेत. नांदेड दक्षिणचे अध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे यांनी उमेदवारी मागितली आहे. त्यांनी भिंती रंगवून वातावरण निर्मितीही सुरू केल्याने उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे पहायला मिळते आहे.

विधानपरिषद सदस्य राम पाटील रातोळीकर यांनीही लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमांचा धडाका लावला आहे. भाजपमध्ये उत्सुकांची संख्या जास्त असल्याने उमेदवारी कोणाला मिळणार? भाजप विद्यमान खासदारांनाच पुन्हा संधी देणार? की मग अशोक चव्हाण सुचवतील त्या नावावर शिक्कामोर्तब करणार हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल. भाजपमध्ये अशोक चव्हाण आल्याने चिखलीकरांचे टेन्शन वाढले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात भाजपमध्ये मोठा भाऊ कोण असेल याबाबत राजकीय गोटात चर्चा सुरू झाली आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची नांदेड जिल्ह्यात एकहाती सत्ता राहिली आहे. तर गेल्या निवडणुकीत चिखलीकर हे विजयी झाले होते. हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर आता दिसत आहेत. भाजपत अशोक चव्हाण व चिखलीकर यांच्यात वर्चस्वासाठी स्पर्धा होऊ शकते.

त्यामुळे लोकसभा नांदेडला उमेदवारी कोणाला द्यावी? यावरून सध्या बरेच राजकारण सुरू असल्याचे समजते. उमेदवारीसाठी भाजपमध्ये उत्सुकांची मोर्चे बांधणी सुरू आहे. पक्षांतर्गत सर्वेक्षण, पदाधिकारी, विद्यमान आमदार, माजी आमदारांसह इच्छुकांचे प्रगती पुस्तक, निवडून येण्याची क्षमता लक्षात घेऊनच उमेदवारी दिली जाणार आहे. आता या कसोटीवर कोण खरं उतरतं यावरच भाजपचा पुढचा खासदार कोण? हे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT