Asauddin Owesi Sarkarnama
मराठवाडा

Nanded AIMIM News : नांदेड लोकसभा मतदारसंघात यंदा एमआयएमच्या पतंगाची भरारी नाहीच...

Poliitical News : 2019 मध्ये प्रकाश आंबेडकरांची भक्कम साथ मिळाल्यामुळे एमआयएम-वंचितच्या उमेदवाराने लाखोंची मते घेतली.

Laxmikant Mule

Nanded News : गेल्या लोकसभा निवडणुकीत वंचितच्या साथीने नांदेड लोकसभा मतदारसंघात अशोक चव्हाणांची विकेट घेणाऱ्या एमआयएमची यंदा मात्र जिल्ह्यात दुरवस्था झाली आहे. 2019 मध्ये प्रकाश आंबेडकरांची भक्कम साथ मिळाल्यामुळे एमआयएम-वंचितच्या उमेदवाराने लाखोंची मते घेतली अन् अशोक चव्हाणांची दुसरी दिल्लीवारी हुकवली. पण अवघ्या सात महिन्यांत वंचित-एमआयएमची युती तुटली आणि एमआयएम बॅकफूटवर गेली.

हैदराबादमार्गे नांदेडमधून महाराष्ट्रात दाखल झालेल्या एमआयएमने अशोक चव्हाण यांच्या काँग्रेसला पदार्पणातच धक्का दिला होता. नांदेड-वाघाळा महापालिका निवडणुकीत काँग्रेसकडे असलेली मुस्लिमांची एकगठ्ठा मते एमआयएमने पळवली आणि मोठ्या संख्येने आपले नगरसेवक निवडून आणले. भविष्यातील धोका ओळखत अशोक चव्हाणांनी तेव्हा एमआयएमच्या मुसक्या आवळल्या. पण गेल्या लोकसभा निवडणुकीत एमआयएमचा मेलेला पोपट प्रकाश आंबेडकरांच्या वंचितने पुन्हा जिवंत केला होता.

2024 च्या लोकसभा निवडणुका तीन महिन्यांवर असताना नांदेड जिल्ह्यात एमआयएमचा पतंग मात्र हवेत उडण्याच्या तयारीतच नाही. नुकत्याच झालेल्या तेलंगणा राज्यातील विधानसभा निवडणुकतही एमआयएमला माफक यश मिळाले. त्यांच्या आमदारांची संख्या ना वाढली ना घटली. परिणामी नांदेड लोकसभेच्या आखाड्यात यंदा एमआयएमचा पतंग उडतो की नाही? अशी चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे.

नांदेडच्या सीमा तेलंगणा राज्याला लागून असल्याने एमआयएमने नांदेड शहरासह जिल्ह्यात मुस्लिमबहुल भागात पक्षवाढीसाठी काम सुरू केले होते. ओवैसीबंधूंच्या आक्रमक भाषणाने मुस्लिम तरुण एमआयएमच्या झेंड्याखाली एकवटला. गेल्या लोकसभा निवडणुकीत एमआयएम व वंचित बहुजन आघाडीने राज्यातील सर्वच लोकसभा मतदारसंघातून उमेदवार उभे केले होते. या आघाडीला छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात विजयही मिळाला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आंबेडकरांमुळे एमआयएमला मोठ्या प्रमाणात दलित, वंचित समाजाची मते मिळाली. पण स्वतः प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना मात्र अकोला आणि सोलापूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघात मुस्लिमांची मते मिळाली नाहीत, परिणामी त्यांचा दोन्ही ठिकाणी पराभव झाला. त्यानंतर सात महिन्यांनी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत वंचितने एमआयएमशी (MIM) फारकत घेतली आणि ते स्वबळावर लढले.

आता साडेचार वर्षे उलटली तरी एमआयएमला नवा मित्रपक्ष मिळाला नाही. त्यामुळे त्यांच्या राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तयारीवरही परिणाम होताना दिसतो आहे. छत्रपती संभाजीनगर वगळता एमआयएम मराठवाड्यातील इतर मतदारसंघात लढणार की नाही? हे अद्याप स्पष्ट नाही. नांदेडमध्येही एमआयएमच्या पातळीवर शांतता दिसून येत आहे.

(Edited By Sachin Waghmare)

R...

SCROLL FOR NEXT