Pratap Chikhlikar Sarkanama
मराठवाडा

Nanded Loksabha Constituency : चिखलीकरांचे देवदर्शन, मतदारांनी कौल दिला; आता विजयासाठी देवाचा धावा...

Sachin Waghmare

Nanded News : मराठवाड्यातील पहिल्या टप्प्याचे मतदान 26 एप्रिलला पार पडले. नांदेडसह परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांतील आपापला कौल मतपेटीत बंद केला आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघात महायुतीचे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि महाविकास आघाडी काँग्रेसचे वसंतराव चव्हाण यांच्यात थेट लढत झाली. अशोक चव्हाण भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर एकतर्फी वाटणारा चिखलीकरांचा विजय आता अटीतटीचा वाटू लागला आहे.

मतदारांनी आपला कौल मतपेटीत बंद केल्यानंतर आता चिखलीकरांनी विजयासाठी देवाचा धावा सुरू केला आहे. मतदान होईपर्यंत तणावात असलेले चिखलीकर (Pratap Chikhlikar) आता देवदर्शन करत आहेत. नुकतेच त्यांनी तुळजापूरात तुळजाभवानी मातेचे दर्शन घेत पूजा-आरती करून आशीर्वाद घेतले. 'चारशे पार'मध्ये चिखलीकरांचा क्रमांक वरचा असेल असा दावा करणारे अशोक चव्हाण (Ashok Chavan) सध्या गप्प आहेत. (Nanded Loksabha Constituency News)

चिखलीकरांसाठी नांदेडात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतल्यानंतरही भाजपच्या मनात निकालावरून धाकधूक असल्याने वसंत चव्हाण यांनी महायुतीला किती कडवी झुंज दिली याचा अंदाज येतो. त्यामुळे चिखलीकरांना देव आठवत असल्याचे बोलले जाते. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मतदारसंघात चिखलीकर-चव्हाण यांना मोठा विरोध झाला होता, सभा, प्रचारा दरम्यान त्यांना रोखण्यात आले होते.

याचा फटका चिखलीकरांना बसल्याची चर्चा जिल्ह्यात होतांना दिसते आहे. परंतु निवडणुकीचा पेपर चिखलीकर यांनी दिला आहे. आता ते किती मार्क घेऊन पास होतात, हे पाहावे लागणार आहे. दरम्यान, लातूर भाजपचे उमेदवार विद्यमान खासदार सुधाकर श्रृंगारे यांची आणि प्रताप पाटील चिखलीकर यांची भेट एका विवाह सोहळ्यात झाली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

श्रृंगारे यांच्यासाठी घेणार लातुरात सभा

या वेळी चिखलीकरांनी श्रृंगारे यांची गळा भेट घेत त्यांना काहीतरी कानमंत्रही दिला. लातूरमध्ये शृंगारे यांना महाविकास आघाडीच्या डाॅ. शिवाजी काळगे यांचे आव्हान आहे. चिखलीकरांसाठी मोदींनी नांदेडात सभा घेतली होती, मंगळवार (ता.30) रोजी श्रृंगारे यांच्यासाठी लातुरात सभा घेणार आहेत.

(Edited By : Sachin Waghmare)

R

SCROLL FOR NEXT