Ashok Chavan- Mp Pratap Patil Chikhlikar News Nanded Sarkarnama
मराठवाडा

Nanded Political News : चव्हाण-चिखलीकरांमध्ये विळ्या-भोपळ्याचे वैर का ?

सरकारनामा ब्युरो

Marathwada : राज्याचे माजी मंत्री काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी दोन दिवसांपुर्वी गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली. आपल्यावर पाळत ठेवली जात आहे, घातपात होण्याची शक्यता आहे, मंत्रीपदाच्या काळातील लेटरहेडचा गैरवापर करून माझ्याविरुद्ध कट कारस्थान केले जात आहे असे आरोप करत चव्हाणांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

एवढ्यावरच ते थांबले नाही, तर अर्धापूर येथील जाहीर कार्यक्रमात आपला विनायक मेटे करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगत त्यांनी आपले राजकीय विरोधक भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhlikar) यांच्याकडे आपला रोख असल्याचे संकेत दिले होते. (Nanded) चिखलीकर त्यांचे भावजी आमदार शामसुंदर शिंदे, बहिणीशी झालेले वाद याचा संदर्भ देत चव्हाणांनी निशाणा साधला होता.

त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. गेल्या १५-२० वर्षापासून जिल्ह्यात चिखलीकर विरुद्ध चव्हाण असा संघर्ष सुरू आहे. विशेष म्हणजे युवक काॅंग्रेस आणि पुढे राष्ट्रीय काॅंग्रेसमध्ये सोबत काम केलेले हे दोन्ही नेते एकमेकांचे चांगले मित्र होते, हे कुणाला सांगितले तर विश्वास बसणार नाही एवढे आता त्यांचे संबंध ताणले गेले आहेत. चिखलीककरांचे राजकारणातील राजकीय गुरू म्हणून दिवंगत शंकरराव चव्हाण यांना मानतात. तर त्यांच शंकररावांचे चिरंजीव असलेल्या अशोक चव्हाणांशी आता त्यांचे वैर आहे.

यामागे सुरूवातीला काॅंग्रेसमध्ये आणि त्यानंतर चिखलीकर जातील त्या पक्षात त्यांचे खच्चीकरण करण्याचे पुरेपूर प्रयत्न अशोक चव्हाण यांनी केल्याचे बोलले जाते. चिखलीकर यांचे सख्खी बहिण आणि भावजीशी बिघडलेले संबंध यात देखील चव्हाणांचाच हात होता, असे सांगितले जाते. काॅंग्रेसमध्ये एकाचवेळी राजकारणाला सुरूवात केलेल्या चिखलीकर-चव्हाणांचे आजचे स्थान पाहता या दोघांमध्ये खूप अंतर असल्याचे दिसून येते.

वडील राज्यात आणि केंद्रात मंत्री असल्याचा फायदा अशोक चव्हाणांना राजकारणात झाला. मुदखेड विधानसभेत पराभूत झाल्यानंतर त्यांना थेट विधान परिषदेवर संधी मिळाली, पुढे राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, दोनवेळा मख्यमंत्री, खासदार असा अशोक चव्हाण यांचा राजकीय आलेख वाढत गेला. तर चव्हाणांसोबतच राजकारणाला सुरूवात केलेल्या चिखलीकरांना मात्र जिल्हा परिषद, सभापती पदावरच समाधान मानावे लागले. तेव्हापासूनच चिखलीकर यांच्या मनात अशोक चव्हाणांबद्दल आकस होता.

चव्हाण मुख्यमंत्री असतांना तर चिखलीकरांचे राजकारणात सर्वाधिक खच्चीकरण झाल्याचे बोलले जाते. लोहा कंधार मतदासंघातून पहिल्यांदा जेव्हा चिखलीकर निवडणूक लढण्यास इच्छूक होते, तेव्हा हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्यात आला. यामागे देखील चव्हाणांचीच खेळी होती असा त्यांच्यावर आरोप केला जातो. दुसऱ्यांदा जेव्हा चिखलीकरांनी पक्षाकडे तिकीट मागितले तेव्हा देखील त्यांना डावलण्यात आले, पण अपक्ष लढत चिखलीकरांनी विजय मिळवला.

तेव्हा विलासराव देशमुख यांनी अपक्ष चिखलीकरांची साथ घेतली आणि अशोकरावांच्या विरोधात नांदेडमध्ये त्यांना बळ दिल्याचे सांगितले जाते. चव्हाणांच्या त्रासाला कंटाळूनच चिखलीकरांनी अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. पण २००८ ते १० दरम्यान, मुख्यमंत्री झालेल्या चव्हाणांनी तेव्हा देखील चिखलीकरांचे पाय ओढण्याचे काम केले. त्यामुळे पुढे राष्ट्रवादीला सोडत चिखलीकरांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि ते लोहा कंधार मतदारसंघातून निवडून आले. पण सुरूवातीची काही वर्ष शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलेल्या चिखलीकरांची भाजपशी मैत्री वाढली.

आमदार शिवसेनेचे असले तरी ते काम भाजपचेच करत होते, असा देखील चिखलीकरांवर आरोप केला जातो. पुढे २०१९ मध्ये अपेक्षेप्रमाणे ते भाजपमध्ये गेले आणि खासदार झाले. विधानसभेला चिखलीकरांना लोहा मतदारसंघातून आपल्या मुलाला आमदार करण्याची इच्छा होती, पण त्यात देखील अशोक चव्हाण यांनीच आडकाठी आणल्याचा चिखलीकर आरोप करतात. उलट त्याच मतदारसंघातून चिखलीकरांचे मेहुणे शामसुंदर यांना बळ देण्याचे काम चव्हाणांनी केल्याचे बोलले जाते.

चिखलीकर जाहीर सभांमधून अशोक चव्हाण यांनी आमचे घर फोडले असा आरोप करतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून दोन दिवसांपुर्वी चिखलीकर व त्यांच्या बहिणीमध्ये जो वाद झाला त्यामागे चव्हाण हेच असल्याचे चिखलीकर सांगतात. नेमका याचाच संदर्भ देत चव्हाणांनी चिखलीकरांना `तुमची बहिण तुम्हाला काय बोलते, ते तुम्ही त्यांना सांगा`, असे सुनावत चिखलीकरांवर निशाणा साधला होता. एकंदरित चिखलीकर आणि अशोक चव्हाण यांच्यातील राजकीय संघर्ष येणाऱ्या काळात अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT