BJP Pankaja Munde Sarkarnama
मराठवाडा

Guardian Minister Appointment : नांदेडचा बीड करायचा नाही; मंत्री मुंडे बंधू-भगिनीच्या पालकमंत्रीपदाचे अडथळे वाढले

Nanded Sakal Maratha Coordinators BJP Pankaja Munde NCP Dhananjay Munde guardian ministers Mahayuti government : नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री पदावर मंत्री मुंडे बंधु-भगिनीचे नाव समोर येताच सकल मराठा समन्वयक यांनी घेतली वेगळी भूमिका.

Pradeep Pendhare

Mumbai News : बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण राज्यभर गाजत आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याला या हत्येच्या कटात अटक केली आहे. यातूनच मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्यात. महायुती सरकारमधील पालकमंत्रीपदाच्या नियुक्ती लवकरच जाहीर होत आहेत. यात मंत्री मुंडे बंधू-भगिनीला कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळणार याची उत्सुकता आहे.

नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्रीपदी मंत्री मुंडे बंधू-भगिनी नको, अशी आक्रमक भूमिका सकल मराठा समाजाने घेतली. नांदेडचा बीड करायचा नाही, असा टोला मराठा समन्वयक श्याम वडजे पाटील यांनी लगावला.

नांदेडचा बीड (BEED) करायचा नाही, असे म्हणत मंत्री मुंडे बंधु-भगिनींना नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यास सकल मराठा समन्वयकाने विरोध केला आहे. तसा इशाराच या मराठा समन्वयकाने दिला. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ नांदेडमध्ये 18 जानेवारीला मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु वाल्मिक कराड याच्या 'SIT' कोठडीमुळे हा मोर्चा रद्द करण्यात आला आहे.

नांदेड (Nanded) मराठवाड्यातील सांस्कृतिक राजधानी आहे. राज्यातील बीड जिल्ह्याचा बिहार झाला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर तिथल्या गुन्हेगारीचे अनेक किस्से समोर येत आहे. त्यामुळे आम्हाला नांदेडचा बीड होऊ द्यायचा नाही. बीडची संस्कृती नांदेडमध्ये रुजू नये, म्हणून राज्य सरकारने बीडचे मंत्री मुंडे बंधू-भगिनींना नांदेडचे पालकमंत्री पद देऊ, नये अशी मागणी मराठा समन्वयक श्याम वडजे पाटील यांनी केली.

खासदार चव्हाण यांची काय भूमिका?

दरम्यान, नांदेडचे नेते भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी शिर्डीत भाजपच्या महाविजय अधिवेशनात मंत्री पंकजा मुंडे यांच्या नांदेडच्या पालकमंत्रीपदावर मत व्यक्त केले होते. अशोक चव्हाण यांनी, तो फार मोठा विषय नाही, असे एका वाक्यात प्रतिक्रिया देत विषय संपवला होता. खासदार चव्हाण यांची भूमिका आणि सकल मराठा समाज समन्वयकांची याबाबत वेगवेगळी भूमिका दिसते.

मंत्री मुंडे बंधू-भगिनींना पालकमंत्रीपद मिळणार?

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लवकरच पालकमंत्रीपदाच्या घोषणा होणार असल्याचे जाहीर केले आहे. यात मंत्री मुंडे बंधू-भगिनीला कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळणार याची चर्चा आहे. बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर तापलेले वातावरण पाहता तिथं मुंडे बंधू-भगिनीला पालकमंत्रीपदावर संधी मिळणे, सध्या तरी अवघड असल्याचे चित्र आहे. महायुतीमधील नेते मंत्री मुंडे यांच्या पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीबाबत कोणता निर्णय घेतात, याकडे लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT