Nanded BJP News : नांदेड-वाघाळा महापालिकेसाठी खासदार अशोक चव्हाण यांच्यावर संपूर्ण जबाबदारी भाजपने सोपवली आहे. नगरपालिका-नगरपंचायत निवडणुकीत मुदखेड, भोकर, अर्धापूरमध्ये अशोक चव्हाण यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले. वर्षानुवर्ष काँग्रेसची सत्ता असलेल्या या नगरपालिकांमध्ये अशोक चव्हाण यांच्या पक्ष प्रवेशाने कधी नव्हे ते कमळ फुलले आहे. महानगरपालिका निवडणुकीत भाजपची उमेदवारी यादी फायनल झाल्याची चर्चा आहे.
अर्थात या यादीवर अशोक चव्हाण यांचेच वर्चस्व असल्याचे बोलले जाते. भाजपचे नेते मंत्री चंद्रशेखर बावनकुळ यांनी मराठवाड्यातील पाच महापालिका निवडणुकांचा आढावा छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतला. अशोक चव्हाण, डी.पी.सावंत, अमर राजुरकर यांना बावनकुळे यांनी संभाजीनगरातच बोलावून घेतले होते, अशी माहिती सुत्रांनी दिली. नांदेड महापालिकेसाठी भाजप उमेदवारांची यादी फायनल झाल्याचे बोलले जाते. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी चार दिवसच शिल्लक राहिले आहेत.
अशावेळी उमेदवारांना पक्षाच्या वतीने आता एबी फाॅर्मचे वाटप करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. नांदेड महापालकेतील भाजप उमेदवारांसाठीचे एबी फाॅर्म चंद्रशेखर बावनकुळे यांनी अशोक चव्हाण यांच्याकडे सोपवले आहेत. आता नांदेडमध्ये शिवसेनेसोबत भाजप युती करणार, की मग स्वबळावर लढणार? हे उद्या स्पष्ट होणार आहे. शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना अशोक चव्हाण युती करणार नाही याचा अंदाज आला आहे. आमदार हेमंत पाटील यांनी आठवडाभरापुर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युतीसाठी हात पुढे केला होता.
राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना युतीची बोलणी कुठपर्यंत आले? याबद्दलही साशंकता आहे. तर दुसरीकडे भाजपनेही आपल्या उमेदवारांची यादी फायनल करत अशोक चव्हाण यांच्याकडे एबी फाॅर्म सुपूर्द केले आहेत. नांदेडमध्ये भाजपचे राज्यसभेतील दुसरे खासदार डाॅ. अजित गोपछडे आणि अशोक चव्हाण यांनी इच्छुक उमेदवारांच्या स्वतंत्र मुलाखती घेतल्या होत्या. त्यामुळे पक्षात अंतर्गत गटबाजी असल्याची चर्चा सुरू होती.
मात्र, खासदार गोपछडे यांना बाजूला ठेवून पक्षाने नांदेड-वाघाळा महापालिका निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी अशोक चव्हाण यांच्यावर दिली आहे. सगळी यंत्रणा चव्हाण-सावंत आणि राजुरकर हे त्रिकुटच हलवत आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसमधून आलेल्या माजी महापौर, नगरसेवक व इतर पदाधिकाऱ्यांना भाजपच्या यादीत मानाचे स्थान देण्यात आल्याचे बोलले जाते. भाजपची उमेदवारी जाहीर होईल तेव्हा त्यात अशोक चव्हाण समर्थकांचाच भरणा अधिक असल्यास आश्चर्य वाटायला नको.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.