Gram Panchayat Sarkarnama
मराठवाडा

Nanded News : आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्यांना दणका; नांदेडमधील ग्रामपंचायतीचा मोठा निर्णय

Gram panchayat Decision : येरगी गावची लोकसंख्या 2800 इतकी आहे. मुलगा, सून किंवा पाल्यांकडून सांभाळ केला जात नसल्याच्या तक्रारी गावातील काही ज्येष्ठ नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे केल्या होत्या.

Roshan More

Nanded : आई-वडिलांना सांभाळा, त्यांची काळजी घ्या, हे धडे अनेकांना मिळाले असतील. मात्र, शहरी भागाप्रमाणे गावखेड्यातदेखील आई-वडिलांना अनाथ आश्रमाचा रस्ता दाखवण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळेच आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या पाल्यांचा स्थावर मालमत्तेवर वारसा लागणार नाही, शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही, असा ठरावच ग्रामसभेत नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील येरगी ग्रामपंचायतीने मंजूर केला. (Nanded News )

येरगी गावची लोकसंख्या 2800 इतकी आहे. मुलगा, सून किंवा पाल्यांकडून सांभाळ केला जात नसल्याच्या तक्रारी गावातील काही ज्येष्ठ नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे केल्या होत्या. त्या तक्रारींची दखल घेत सरपंच आणि सदस्यांनी ग्रामसभा घेऊन आई-वडील यांचा संभाळ न करणाऱ्या मुलांचा वारसा मालमत्तेमध्ये न नोंदवण्याचा ठराव केला. ग्रामसभेत चर्चा होऊन सर्वमताने हा ठराव पारीतही झाला.

तक्रारीची खातरजमा करणार

जर आई-वडिलांच्या संमतीने मुलगा, सून वेगळे राहत असतील तर ग्रामपंचायतीचा हस्तक्षेप असणार नाही. मात्र, आई किंवा वडिलांनी मुलगा, सुनेबाबत तक्रार केली तर त्याची खातरजमा करून वारसा आणि शासकीय योजनाचा लाभ दिला जाणार नाही, असेदेखील ग्रामपंचायतीच्या ठरावमध्ये म्हटले आहे. याच येरगी ग्राम पंचायतीने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात गावात दारू आणि अवैध धंदे बंद करण्याचा ठराव केला होता. तेव्हापासून गावात दारू, शिंदी, मटका जुगार बंद आहे. आता या नवीन निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.

कोल्हापूरमध्येही निर्णय

गेल्या वर्षी कोल्हापूर जिल्ह्यातील माणगाव ग्रामपंचायतीनेदेखील आई-वडिलांची काळजी न घेणाऱ्या मुलांचे ग्रामपंचायतीच्या दप्तरी असलेली वारस नोंद रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच ग्रामपंचायतीकडून कुठलीही सुविधा मिळणार नसल्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयासोबतच मुलांकडून आई-वडिलांची काळजी न घेतल्यास कारवाईसाठी पात्र राहील, अशा आशयाचे प्रतिज्ञापत्रदेखील ग्रामपंचायतीने लिहून घेतले होते.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT