Marathwada News : गेल्या महिन्याभरापासून पावसाने दडी मारल्याने शेतातील पीके करपू लागली आहे. पेरलेलं उगवलं याची आता शाश्वती राहिलेली नाही. पुढे अजून किती दिवस पाऊस पडणार हे ही निश्चित सांगता येत नाही. संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मदत करा, साहेब एकरी पन्नास हजार रुपये मदत द्या, असा आक्रोश हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्यासमोर शेतकर्यांनी केला.
पावसाअभावी करपलेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी झिरवळ हिंगोली जिल्ह्यात आले होते. शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी जास्तीत जास्त मदतीसाठी आपण मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन त्यांनी दिले. पावसाने पाठ फिरवल्याने सेनगाव तालुक्यातील मानसपिंप्री परिसरातील शेतशिवारात करपलेल्या पिकांची पाहणी पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी बुधवारी प्रत्यक्ष बांधावर जाऊन केली.
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा आदी यावेळी हजर होते. पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत पावसाची स्थिती, पिकांची वाढ आणि झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेतली.
पावसाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका खरीप पिकांना बसला आहे. सुरुवातीला झालेल्या पावसानंतर पिकांची वाढ चांगली झाली मात्र, त्यानंतर पावसाने प्रदीर्घ दडी मारल्याने पिके करपू लागली आहेत. अनेक शेतांमध्ये उभ्या पिकांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून, उत्पादनात मोठी घट होण्याची भीती शेतकर्यांनी पालकमंत्र्यांकडे व्यक्त केली.
उत्पादन खर्चही निघण्याची शक्यता मावळल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. अशा परिस्थितीत शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी. नुकसानग्रस्त पिकांसाठी एकरी ५० हजार रुपये आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकर्यांनी झिरवळ यांच्याकडे केली.
शेतकर्यांच्या अडचणी व मागण्यांची शासनस्तरावर दखल घेतली जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून हिंगोली जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले. दुष्काळसदृश परिस्थितीची वस्तुनिष्ठ माहिती घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
दुष्काळाने खरीप पिके हातची गेली असताना पंचनाम्यांच्या प्रक्रियेत वेळ दवडू नये. शासनाने नुकसानग्रस्त शेतकर्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी. तसेच नुकसानीचे निकष, क्षेत्रफळ किंवा वैयक्तिक पंचनाम्याच्या अटी न लावता हिंगोली जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा भरपाई द्यावी.
एकरी ५० हजार रुपये तातडीची मदत, सरसकट पीकविमा भरपाई आणि नागरिक व पशुधनासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.