shrikant shinde  sarkarnama
मराठवाडा

Shrikant Shinde : जागा शिवसेनेची, दावा राष्ट्रवादीचा; पण श्रीकांत शिंदेंच्या विधानानं गुंता वाढला

Mahayuti News : अजितदादांची राष्ट्रवादी महायुतीत आल्यानं अनेक ठिकाणी जागांचा पेच निर्माण झाला आहे. यातच राष्ट्रवादीनं शिवसेनेच्या जागेवर दावा ठोकल्यानं नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

Datta Deshmukh

महायुतीत शिवसेनेची जिल्ह्यात एकमेव विधानसभेची जागा असलेल्या बीड मतदारसंघावर राष्ट्रवादीने दावा ठोकलाय. त्यामुळे जनसंवाद मेळाव्यात बीडची जागा शिवसेनेचीच, असं खासदार श्रीकांत शिंदे ठासून सांगतील, असे अपेक्षित होते. पण, श्रीकांत शिंदे यांनी पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच होतील, असा विश्वास व्यक्त केला.

त्यासाठी बीड विधानसभेतून शिवसेनेचाच आमदार करा म्हणण्याऐवजी महायुतीचाच उमेदवार विजयी करायचाय, असे म्हणत शिवसेना ऑक्सिजनवर आणि राष्ट्रवादीच्या अशा पल्लवित ठेवल्या. आता अखेर महायुतीच्या जागा वाटपात बीड कोणाच्या पदरात पडणार तोवर सर्वांनाच वाट बघावी लागणार आहे.

पूर्वीची युती आणि नंतरच्या महायुतीमध्ये जिल्ह्यातील बीड विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आहे. या युतीत केज, परळी, माजलगाव, आष्टी व गेवराई या पाच विधानसभेच्या जागा भाजपला ( Bjp ) असायच्या. आता नव्याने महायुतीत आलेल्या राष्ट्रवादीकडून बीड मतदारसंघावर दावा ठोकला जातोय.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात राष्ट्रवादीचे चार आमदार विजयी झाले. यातील बीडमधून विजयी झालेले संदीप क्षीरसागर ( Sandip Kshirsagar ) शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत आहेत. मात्र, ज्यांचा आमदार त्यांचा उमेदवार असे समीकरण मांडत आता बीड मतदारसंघावर राष्ट्रवादीने दावेदारी केली आहे. अगदी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी तसे सुतोवाच केल्याने राष्ट्रवादीतील इच्छुकांचाही हुरुप वाढला आहे. त्यामुळे जागा शिवसेनेची आणि उमेदवारीसाठी स्पर्धा राष्ट्रवादीत, असे सध्या मतदार संघातील चित्र आहे.

बीडमधून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल जगताप तयारी करत आहेत. दरम्यान, चार दिवसांपूर्वी शिवसेना उपनेते अर्जुन खोतकर यांनी बीडची जागा शिवसेनेचीच असेल, असे सांगितले होते. त्यामुळे शिवसेना नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे याच्यावर आणखी जोर देत जागा शिवसेनेचीच, असे ठासून सांगतील असे वाटले होते. त्यांच्या उपस्थितीत जनसंवाद मेळावा झाला. पण, डॉ. शिंदे यांनी या जागेवरून महायुतीच विजयी झाली पाहिजे, असे म्हणत राष्ट्रवादीलाच थोडीशी वाट मोकळी ठेवली आहे.

नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका करताना श्रीकांत शिंदे यांनी सरकारच्या योजनांचा उहापोह केला. या योजनांच्या जोरावर एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री होणार, असाही विश्वास दिला. पण, त्यांना मुख्यमंत्री होण्यासाठी बीडचा आमदार शिवसेनेचा असावा, असे मात्र ते म्हणाले नाहीत. त्याऐवजी आमदार महायुतीचीच विजयी करा, असे आवाहन केले. अर्जुन खोतकर, संजय निरुपम, जिल्हा प्रमुख अनिल जगताप, सचिन मूळूक व बाजीराव चव्हाण आदी उपास्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT