Jayant Patil | Ajit Pawar Sarkarnama
मराठवाडा

Jayant Patil : जयंत पाटील थेट अजितदादांच्या आमदाराच्या घरी, बंद दाराआड चर्चा; 'घड्याळ' सोडून 'तुतारी' हाती घेणार?

Akshay Sabale

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठं यशं प्राप्त झालं आहे. महाविकास आघाडीच्या तब्बल 31 जागा निवडून आल्यानं घटकपक्ष, नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये 'बळ' आलं आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अनेक आमदार, माजी आमदार आणि नेते महाविकास आघाडीतील घटकपक्षांच्या संपर्कात आहेत.

यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीतील आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या निवासस्थानी भेट दिली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

जयंत पाटील गुरुवारी ( 25 जुलै ) परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी आमदार आणि जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी (Babajani Durrani) यांच्या घरी जाऊन भेट घेतली. बाबाजानी दुर्राणी यांच्या कार्यकर्त्यांनी जयंत पाटील यांचं जंगी स्वागत केलं. जयंत पाटील आणि बाबाजानी दुर्राणी यांच्यात बंद दाराआड चर्चा देखील झाली.

भेटीचा आणि चर्चेचा तपशील अद्याप समजू शकल नाही. पण, आमदार दुर्राणी अजितदादांच्या राष्ट्रवादीचं 'घड्याळ' सोडून राष्ट्रवादीची (शरदचंद्र पवार) 'तुतारी' हाती घेणार का? अशी चर्चा परभणीच्या राजकीत वर्तुळात रंगली आहे.

गेल्या दीड वर्षांपासून आमदार दुर्राणी यांचे महत्त्वाचे नेते, खंदे समर्थक आणि कार्यकर्त्यांनी त्यांची साथ सोडत शिवसेना नेते सईद खान यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आमदार दुर्राणी हे अस्वस्थ झाले होते. आमदार दुर्राणी पुन्हा उभारी घेण्यासाठी घरवापसी करणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, अजितदादांसह अनेक आमदारांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करत जुलै 2023 मध्ये शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला होता. त्यानंतर पक्ष आणि चिन्हही अजितदादांना मिळालं. पण, 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजितदादांच्या पक्षानं 4 जागा लढविल्या होत्या. मात्र, अजितदादांच्या पक्षाला फक्त 1 जागेवर विजय मिळाला.

उलट राष्ट्रवादी काँग्रेसचा ( शरदचंद्र पवार ) 'स्ट्राईकरेट' 80 टक्के होता. राष्ट्रवादीनं 10 पैकी 8 जागांवर विजय मिळवला. त्यामुळे अजितदादांसोबत गेलेल अनेक आमदार, माजी आमदार, नेते पुन्हा राष्ट्रवादीत ( शरदचंद्र पवार ) घरवापसी करत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT