Jayant Patil Sarkarnama
मराठवाडा

Jayant Patil : "तुम्ही म्हणा चंद्र पाहिजे, ते म्हणतील 2 महिन्यात..."; महायुती सरकारवर जयंत पाटलांची टोलेबाजी

Jagdish Patil

Jayant Patil News : आगामी विधानसभेसाठी राज्यातील सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. एकीकडे सत्ताधाऱ्यांनी राज्यातील जनतेसाठी काहीही काम केलं नसल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

तर दुसरीकडे राज्यातील जनतेसाठी आपण कोणत्या योजना सुरू केल्या हे सांगण्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणात जाहीरातबाजी करत आहे. अशातच आता सरकारी योजना (Government scheme) जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आता योजनादुतांची नियुक्ती केली जाणार आहे.

या नियुक्तीसाठी सरकारी तिजोरीतून 300 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. याच मुद्द्यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी राज्य सरकारवर जोरदार फटकेबाजी केली आहे. राज्य सरकारने सुरु केलेल्या विविध योजनांवर विरोधकांनी टीका करायला सुरूवात केली आहे.

तर काही योजनांबाबत सरकार काहीही विचार न करता वारेमाप खर्च करत असल्याचा आरोपही विरोधकांकडून केला जात आहे. या योजनांबाबत सरकारमध्ये एकमत नसल्याचंही विरोधकांकडून सांगितलं जात आहे. अशातच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) या दोघांमध्ये फाईलवरील सह्यावरून वाद झाल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

याच मुद्द्यावरुन जयंत पाटलांनी सरकारवर हल्लाबोल केला. सरकारच्या कारभारावर टीका करताना पाटील म्हणाले, मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट काढून त्यातून मलिदा खाण्याच्या योजना हे सरकार राबवत आहेत. अर्थमंत्री म्हणत आहेत की, मी आता बघितल्याशिवाय सही करणार नाही. त्यांच्या लक्षात आलं आहे की, हे कुठेही सह्या घेत आहेत. कोणतेही सरकार आले तरी चालू योजना बंद करणार नाहीत, असं सांगत त्यांनी लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचे संकेत दिले.

तसंच या सरकारने जाहिरातीसाठी 280 कोटी रुपये बाजूला काढले आहेत. त्यामुळे कोणताही पेपर उघडला की, एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री दिसतात. कारण त्यांना 2 महिन्यात 280 कोटी रुपये खर्च करायचे आहेत. शिवाय सरकारने योजना दूत नेमले असून यासाठी 300 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. खुर्ची वाचवण्यासाठी हे सरकार काहीही करेल. तुम्ही म्हणा चंद्र पाहिजे ते म्हणतील दोन महिन्यात देतो, अशा शब्दात त्यांनी सरकारवर टोलेबाजी केली.

नेमका काय आहे योजनादूत कार्यक्रम?

राज्य सरकारच्या योजनांचा दारोदारी जाऊन प्रचार करण्यासाठी राज्यात 50 हजार योजनादुतांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या नियुक्त्या 6 महिन्यांसाठी करण्यात येणार आहेत. प्रत्येक योजनादुताला महिला 10 हजार रुपयांचं मानधन देण्यात येणार असून यासाठी 18 ते 35 वयोगटातील पदवीधर उमेदवारांची निवड करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT