Raosheb Danve-Raj Thackeray Sarkarnama
मराठवाडा

रावसाहेब दानवे हे राज ठाकरेंचे प्रवक्ते? राष्ट्रवादीनं उपस्थित केला प्रश्न

राज ठाकरे हे तर भाजपची 'सी' टीम

सरकारनामा ब्युरो

मुंबई : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे प्रवक्ते कधीपासून झाले, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथे होणाऱ्या सभेबाबत पोलिसांनी मनसेच्या स्थानिक कार्यकर्त्यांना सूचना करून ईदनंतर ही सभा घ्यावी, असं कळवलं असताना दानवे यांनी राज ठाकरेंची सभा एक तारखेला होणारच, असं वक्तव्य करून स्वतःचंच हसं करून घेतलं आहे, असा टोलाही तपासेंनी लगावला.

राज ठाकरे यांची सभा व्हावी आणि त्यातून राज्यातले सामाजिक वातावरण बिघडावे, ही भाजपची रणनीती आहे. आता ती उघड झाली आहे. राज ठाकरे हे भाजपची 'सी' टीम आहेत. हे आम्ही आधीच ओळखलं होतं. आता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यानंतर यावर शिक्कामोर्तब झालं आहे, अशी टीका तपासे यांनी केली. राज ठाकरेंनी मशिदीवरील भोग्यांना विरोध करणारी भूमिका घेतली असून, भाजपने याला पाठिंबा दिला आहे.

महाराष्ट्राची सामाजिक व्यवस्था बिघडावी आणि त्यातून राज्यात त्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हावा, असा विरोधकांचा प्रयत्न आहे. हाच एक कलमी कार्यक्रम घेऊन राणा दांपत्यानं मातोश्रीवर जाण्याचा चंग बांधला होता. त्यांच्या या कृतीला भाजपाचे समर्थन होते हे राज्यातल्या जनतेपासून लपलेले नाही, असा आरोपही तपासेंनी केला.

राज्यात २०१९ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आणि त्यानंतरच्या अनेक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये व विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळाले. महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी नवीन युक्ती योजण्यासाठी चिंतन नागपूर व दिल्लीत झाले असावे. त्यातून भाजपने आपली राजकीय रणनीती बदलून धार्मिक तेढ, कायदा व सुव्यवस्था बिघडवणारी परिस्थिती निर्माण करीत आहे. सरकारला घेरण्यासाठी राज ठाकरे व राणा दांपत्य यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे, असा संशय जनतेच्या मनात निर्माण झालेला आहे, असेही तपासेंनी स्पष्ट केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT