मुंबई : भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर हल्ला झाल्यानं राजकारण तापलं आहे. शिवसैनिकांनी हा हल्ला केल्याचा दावा सोमय्यांनी केला आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्याचा दावा भाजप नेत्यांनी सुरू केला आहे. यासाठी आज सोमय्यांनी भाजपच्या पाच नेत्यांसह थेट दिल्लीत केंद्रीय गृहसचिवांची भेट घेऊन तक्रार केली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सोमय्यांना इशारा दिला आहे.
‘मातोश्री’समोर हनुमान चालिसा पठणाच्या आंदोलनाचा प्रयत्न करणं खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना महागात पडलं आहे. त्यांना पोलिसांनी अटक केली असून, सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांना भेटण्यासाठी सोमय्या पोलीस ठाण्यात गेले असता 23 एप्रिलला त्यांच्या गाडीवर हल्ला झाला होता. यानंतर भाजपने महाविकास आघाडी सरकारविरोधात मोहीम उघडली आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्याची ओरड करीत सोमय्या यांच्यासह आमदार मिहिर कोटेचा, आमदार अमित साटम, आमदार पराग शाह, आमदार राहुल नार्वेकर आणि भाजपचे महापालिका नेते विनोद मिश्रा यांनी केंद्रीय गृहसचिवांची भेट घेऊन तक्रार दिली.
किरीट सोमय्या यांनी आज दिल्लीत गृहसचिवांची दिल्लीत भेट घेतली. त्यावेळी त्यांनी गृहसचिवांनी त्यांच्यावरील हल्ल्याची माहिती देत राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा दावा केला. यावरून छगन भुजबळ यांनी सोमय्यांना परस्थितीची जाणीव दिली आहे. ते म्हणाले की, सोमय्या म्हणतात त्याप्रमाणे राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडली असती तर ते दिल्लीत पोचू शकले नसते.
राणा दांपत्याला अटक केल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. राणा दांपत्याला 23 एप्रिलला खार पोलीस ठाण्यात भेटायला गेलेल्या सोमय्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. विशेष म्हणजे, सोमय्यांना झेड प्लस सुरक्षा असतानाही हा हल्ला झाला होता. सोमय्या हे यात किरकोळ जखमी झाले आहेत. सोमय्यांनी या प्रकरणी शिवसैनिकांकडे बोट दाखवलं आहे. तर सोमय्यांनी अंगावर गाडी घातल्याचा दावा शिवसैनिकांनी केला आहे. याबाबत सोमय्या म्हणाले की, मी जखमी असून, माझ्या कारमध्ये बसून आहे. माफिया सेनेच्या गुंडावर पोलीस कारवाई करीत नाहीत, तोपर्यंत मी वांद्रे पोलीस ठाण्यासमोर कारमध्येच बसून राहणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.