Jayant Patil Sarkarnama
मराठवाडा

Jayant Patil News : जयंत पाटील को गुस्सा क्यो आया..

Tushar Patil

NCP (SP) Political News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध मतदार संघात आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने चाचपणी सुरू आहे.

रविवारी ही शिवस्वराज्य यात्रा जालना जिल्ह्यात होती. बदनापूर मार्गे भोकरदन शहरात आलेल्या शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून झालेल्या सभेतील कार्यकर्त्यांचा उत्साह व प्रतिसाद बघता भोकरदन विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे पारडे जड असल्याचे दिसून आले.

भोकरदन शहरात एखाद्या विजयी सभा भासावी अशी कार्यकर्त्यांची गर्दी पाहून खरतरं प्रातांध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) खूष व्हायला पाहिजे होते. पण घडले उलटेच, काही भावी आमदारांच्या समर्थकांनी घातलेला गोंधळ, केलेली घोषणबाजी पाहून जयंत पाटलांचा पारा चांगलाच चढला. जोरदार भाषणाच्या तयारीत असलेल्या जयंतरावांनी मग आता मी भाषणच करणार नाही, असा आक्रमक पावित्रा घेत गोंधळ घालणाऱ्यांना फटकारले.

एवढेच नाही तर असे वागून तुम्ही रावसाहेब दानवे यांनाच मदत करत असल्याचा थेट आरोपच पाटील यांनी केला. त्यामुळे ऐरवी शांत, संयमी असणाऱ्या `जयंत पाटील को गुस्सा क्यो आया`, अशी चर्चा तालुक्यात रंगली होती.

भोकरदन विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीमध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. मात्र 2021 नंतर झालेल्या घडामोडीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लाडके असणारे या मतदारसंघातील माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी शरद पवार गटासोबत राहणे पसंत केले.

अजित पवार महायुतीकडे गेल्यापासून जालना जिल्ह्यातील राष्ट्रवादीची संपूर्ण सूत्रे ही राजेश टोपे यांच्याकडेच आहेत. (NCP) राजेश टोपे व सुरेखा लहाने यांचे सख्य असून चंद्रकांत दानवे व सुरेखा लहाने यांच्यातील अंतर्गत कलह मतदारसंघाला सर्वश्रुत आहे.

वर्षभरापूर्वी जाफराबादच्या विद्यमान नगराध्यक्ष व राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष सुरेखा लहाने यांच्या निवासस्थानी शरद पवारांनी घेतलेली भेट तसेच शरद पवारांची मुंबई येथे निवासस्थानी घेतलेली भेट यामुळे त्यांनी विधानसभेच्या दृष्टीने तयारी सुरू केली होती.

शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या समोरच काल सुरेखा लहाने व चंद्रकांत दानवे यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. सुरेखा लहाने यांच्या नावाचे भावी आमदाराचे पोस्टर अनेक ठिकाणी झळकले.

दोन्ही गटाचे कार्यकर्ते मोठ्या जोशात घोषणाबाजी करत होते. माजी मंत्री राजेश टोपे यांच्या भाषणावेळी कार्यकर्त्यांची हुल्लडबाजी व गोंधळ अधिकच वाढला. राष्ट्रवादीती लहान-दानवे गटाचे कार्यकर्ते एकमेकांविरोधात घोषणाबाजी करत असल्याने व्यासपीठासमोर गोंधळ सुरू झाला.

शिस्तप्रिय असणारे जयंत पाटील यांनी व्यासपीठावरून या सर्व गोष्टींचे बारकाईने निरीक्षण करत दखल घेतली. आपल्या नेहमीच्या मवाळ शैलीत मात्र योग्य प्रकारे त्यांनी कार्यकर्त्यांचे व अप्रत्यक्षरीत्या नेत्यांचे कान टोचले. "तुमच्यात हुल्लडबाजी जास्त आहे, शिस्त नाही मला आज तुमच्यासमोर भाषण करायची इच्छा नाही. मला हे चालत नाही ही पद्धत नाहीये ,तुम्ही इकडे दादागिरी करायला आलाय का ?

कशाला आलाय, भाषण आहे सभा चालू आहे. तुम्ही सगळे मोठ्या संख्येने बसलेला आहात तिथं, कुणी शुल्लक कारणावरून कोणी कुठे पोस्टर धरला म्हणून इथे गोंधळ करायची काय गरज आहे?

इथे रावसाहेब दानवे ला मदत करायचा धंदा चाललाय तुमचा, असा संताप जयंत पाटील यांनी व्यक्त केला. जयंत पाटलांच्या रुद्रावताराने व्यासपीठावरील सर्वच नेत्यांना झटका बसला. जिल्हाध्यक्ष निसार देशमुख यांनी जयंत पाटलांची माफी मागून त्यांना भाषण करायला भाग पाडले.

महाविकास आघाडी साठी पोषक वातावरण असताना मतदार संघातील राष्ट्रवादीच्या गटातटावरून ही जागा हातची जाऊ शकते हे जयंत पाटलांनी ओळखले. राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुरेखा लहाने यांना भाषण करू न दिल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. तर माजी आमदार चंद्रकांत दानवे यांचे कार्यकर्ते सुरेखा लहाने यांच्या भावी आमदाराच्या पोस्टरमुळे खवळले होते.

सभेतील गोंधळाचे व्हिडिओ व फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेची नाचक्की झाली. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आगामी निवडणुकीत तिकीट कोणाला देणार? की अंतर्गत भांडणात ही जागा काँग्रेसच्या वाट्याला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT