Sharad Pawar- Let.Vasantrao Naik News
Sharad Pawar- Let.Vasantrao Naik News Sarkarnama
मराठवाडा

मुख्यमंत्री नाईकांकडील खात्याचे नव्वद टक्के काम राज्यमंत्री असूनही मीच करायचो..

अतुल पाटील

औरंगाबाद : ` मी राजकारणात आलो, त्यामागे यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव नाईक यांची शक्ती होती. त्यामुळेच ते दोघे कायम माझ्या अंत:करणात राहतील. नव्या पिढीला प्रोत्साहन द्यायचे, हा नाईक साहेबांचा स्वभाव होता`. असे गौरवोद्गार ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी काढले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या खात्याचा राज्यमंत्री म्हणून वसंतराव नाईक यांनी दिलेल्या जास्तीच्या अधिकाराचाही उल्लेख केला.

राज्यस्तरीय निमंत्रित कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी सोमवारी (ता. ११) ते बोलत होते. (Aurangabad) वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक मंडळ आणि वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष तसेच माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे प्रणेते (कै.) वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयाच्या प्राचार्य समाजभुषण राजाराम राठोड क्रीडा संकुलात सकाळी हा कार्यक्रम झाला. (Marathwada)

यावेळी पवार म्हणाले, वसंतराव नाईक महाराष्ट्रात शेती क्षेत्रात अमुलाग्र बदल करणारे असे मुख्यमंत्री होते. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्यासोबत एक तरुण कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. त्यांच्यामुळेच मी पहिल्यांदा विधानसभेत निवडून गेलो. ही गोष्ट माझ्या जन्मभर लक्षात राहणारी आहे.

त्यानंतर पाच वर्षांनी महाराष्ट्राचे मंत्रीमंडळ झाले. त्यात मुख्यमंत्री नाईक साहेब आणि त्यांच्याकडे खाते होते जनरल ॲडमिनिस्ट्रेशन आणि गृहमंत्री. त्या खात्याचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी माझी निवड केली. नाईक साहेबांचा स्वभाव असा होता कि, नव्या पिढीच्या लोकांना प्रोत्साहन द्यायचे. मदत करायची. अधिकार द्यायचा आणि जबाबदारी द्यायची. आणि जरी मी राज्यमंत्री असलो तरी, त्या खात्याचे ९० टक्के काम नाईक साहेबांनी माझ्यावर सोपवले होते.

जर काही चुकले तर, ते दुरुस्त करण्याची जबाबदारी घ्यायची. बाकी सगळी कामे तुम्ही करा. नवीन नेतृत्व तयार करण्यासाठी अशाप्रकारे प्रोत्साहन देणारे व्यक्तीमत्व म्हणून वसंतराव नाईक यांच्याकडे पाहिले जाते. या महाविद्यालयात शिकणारी मुले मराठवाड्यातील, विदर्भातील होती. या महाविद्यालयासाठी अनेकांनी कष्ट घेतले. यात वसंतराव नाईक, खासदार उत्तमराव राठोड, माजी आमदार धोंडीराम राठोड, राजाराम राठोड यांचे नाव घ्यावे लागेल.

यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उभारलेली मिलिंद सारखी संस्थाही औरंगाबादेत सोबत होती. कर्तृत्वान पिढी निर्माण करण्याचे काम संस्थेतर्फे केले आहे. तसेच यापुढे संस्थेच्या विकासासाठी कुठले प्रश्‍न आले तर, तुम्हाला साथ देण्याची भूमिका निश्‍चितपणे पाडली जाईल. अशा विश्‍वास पवार यांनी व्यक्त केला.

औरंगाबादमध्ये सरकारी कामे झाल्यानंतर माझा एक उद्योग असायचा कि, याभागातील तरुण साहित्यिक, कवी यांना एकत्रित करायचे आणि त्यांना ऐकायचो. प्रा. जवाहर राठोड, प्रा. मोतीराम राठोड ही मंडळी आमच्या सर्कलमध्ये असायची. यात आजही जवाहर यांची ‘पाथरवट’ही कविता आठवते. प्रा. मोतीराम राठोड हे देखील उत्तम दर्जाचे साहित्यिक होते, असेही पवार यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT