Mumbai High Court sarakarnama
मराठवाडा

High Court News : पाटोदा नगरपंचायत भ्रष्टाचार प्रकरणी अतिरिक्त मुख्य सचिवांना नोटीस!

Jagdish Pansare

Beed News : पाटोदा नगरपंचायतीमधील कोट्यवधींच्या अपहार प्रकरणात लेखा परिक्षणाच्या आधारे गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालायत फौजदारी जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. प्राथमिक सुनावणीत अतिरिक्त मुख्य सचिव, वित्त विभागाचे मुख्य सचिव यांच्यासह प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश न्या. मंगेश पाटील व न्या. शैलेश पी. ब्रम्हे यांनी दिले आहेत.

पाटोदा (जि. बीड) नगरपंचायतचा 2015 ते 2020 लेखापरीक्षणाचा अहवाल माहितीच्या अधिकाराखाली राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे तालुकाध्यक्ष शिवभूषण जाधव यांनी प्राप्त केला होता. या कालावधीत लेखा परीक्षणामध्ये गंभीर स्वरूपाच्या त्रुटी आढळून आल्या होत्या. त्यामुळे अहवालातील अंतिम अमान्य रकमा 73 लाख 81 हजार 775 रुपये व 9 लाख 22 हजार 129 रुपये तथाकथित ठेकेदार, नगरसेवक व अधिकाऱ्यांकडून वसूल करावे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तसेच संगणमताने नगरपरिषदेचा व जनतेचा विश्वासघात करून शासकीय कोट्यवधींचा अपहार लेखापरीक्षणात दिसत आहे. त्यामुळेच संबंधितांवर कलम फौजदारी गुन्हे दाखल करावेत तसेच नगरसेवकांना अपात्र घोषित करावे. संबंधीत ठेकेदार तसेच अधिकारी, कर्मचारी यांच्या विरोधात कारवाई करावी, अशी मागणी शिवभूषण जाधव यांनी 13 जुन 2022 रोजी नगर विकास विभागाच्या सचिवांकडे केली होती. परंतु सदरील तक्रारीची दखल न घेतल्याने त्यांनी खंडपीठात फौजदारी जनहितार्थ याचिका दाखल केली होती.

सदर प्रस्तावावर उच्च न्यायालयाने तीन महिन्याच्या आत निर्णय घेण्याचे आदेश शासनाला दिले होते. त्यानंतर मात्र नगर विकास विभागाच्या अवर सचिवांनी 2 जुलै 2023 रोजी निर्णय घेऊन सदर फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या प्रस्तावावर लेखापरीक्षणाच्या आधारे गुन्हा दाखल करता येणार नाही, असा अभिप्राय देत मागणी नामंजूर केली.म्हणून शासनाचे गुन्हा दाखल न करण्याचे आदेश रद्द करून संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी विनंती करणारी जनहित याचिका शिवभूषण लक्ष्मणराव जाधव यांनी अॅड. एन.एल. जाधव यांच्या मार्फत दाखल केली.

सुनावणीत प्रतिवादी अतिरिक्त मुख्य सचिव, पोलिस अधीक्षक लाचलुचपत विभाग छत्रपती संभाजीनगर, पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत विभाग बीड, मुख्य सचिव (आर्थिक सुधारणा) वित्त विभाग, सचिव नगर विकास विभाग, पोलीस अधीक्षक बीड आणि पोलिस ठाणे पाटोदा यांना नोटीस बजावण्याचे आदेश खंडपीठाने दिले. पुढील सुनावणी 28 ऑगस्ट रोजी ठेवली आहे. याचिकाकर्त्या तर्फे नरसिंह जाधव यांनी काम पाहिले. त्यांना अॅड. सोनाली सोमवंशी, गौरव खांडे यांनी सहाय्य केले. शासनातर्फे सहाय्यक सरकारी वकील अॅड. एम. एम. नेरलीकर यांनी काम पाहिले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT