Manoj Jarange Patil, Laxman Hake Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil : "ज्या वेशीमधून बेकायदा मागण्या..."; जरांगे पाटलांनी उपोषण स्थगित करताच लक्ष्मण हाकेंची पहिली प्रतिक्रिया

Jagdish Patil

Manoj Jarange Patil News : मागील नऊ दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेले उपोषण स्थगित करण्याचा निर्णय मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी घेतला आहे. कोर्टाच्या निर्देशानुसार आपण उपचार घेत असून सलाईन लाऊन उपोषण करणे योग्य नसल्याचं सांगत आपण उपोषण स्थगित करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

जरांगे यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेताच ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांचे मनसुबे आम्ही उधळून लावले असून आमच्या लढ्याला यश आल्याचं हाकेंनी म्हटलं आहे.

मागील नऊ दिवसांपूर्वी अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलं होतं. तर जरांगे यांच्या मागण्या बेकायदेशीर असून सरकारने त्यांच्यापुढे लोटांगण घालू नये, अशी आक्रमक भूमिका घेत. लक्ष्मण हाके देखील ओबीसी समाजाच्या मागणीसाठी उपोषणाला बसले. त्यामुळे ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद निर्माण झाला होता.

तर आता जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण स्थगित केल्यामुळे हा वाद कमी होण्याची शक्यता दिसत असतानाच हाके यांनी पुन्हा एकदा जरांगे पाटलांवर हल्लाबोल केला आहे. आम्ही महाराष्ट्र शासनाला रोखले आणि जिथून या आंदोलनाची सुरुवात झाली, ज्या बेकायदा मागण्याला सुरुवात झाली, त्याच वेशीत जरांगे पाटील नावाचं घोड आम्ही अडवलं आणि असं तसं नाही, तर ते जागेवर थांबवलं.

ते उलटं करायचं ? की पालट करायचं ? का माघारी घालवायचं ? की अरबी समुद्रात घालायचं ? यामध्ये आम्ही सक्सेस झालो आहोत, असं म्हणत त्यांनी जरांगे पाटलांना डिवचलं आहे. हाके म्हणाले, "ब्राह्मणांची भीती घालून आम्हा बहुजनांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचे काम कोणी केलं? हे आम्हाला सांगायला लावू नका, त्यात मेलेली मढी उकरून काढावी लागतील, जुन्या नेत्यांची सगळी धोरणं काढावी लागतील, त्यांचे चेले यशवंतरावांचे मानसपुत्र मानणारे लोक कसे वागले हे सांगावे लागेल."

तर जरांगेना भारतरत्न पुरस्कार मिळतो का ते पहावं, असं म्हणत हाकेंनी बोचरी टीका देखील केली. ते म्हणाले, "जरागेंना सदिच्छा आहेत, शुभेच्छा आहेत, त्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी, त्यांना एखादा पुरस्कार भेटावा भारतरत्न पुरस्कार मिळतो का? पहावं, साधे सरपंच झाले होते त्यांच्या जातीचे, त्यामुळे आम्ही जरांगेना एका पुरस्काराची शिफारस करू आणि त्याच पुरस्कारावर बसून याची मिरवणूक काढावी."

जरांगेंचे मनसुबे उधळून लावले

दरम्यान, आमच्या उपोषण संदर्भात समिती निर्णय घेईल, मात्र, मला एक आनंद आहे, ज्या वेशीमधून बेकायदा मागण्या, ओबीसी आरक्षणमधून (OBC Reservation) आम्हाला आरक्षण पाहिजे, असा हट्ट करणं, ओबीसींना टार्गेट करणे, हे सगळे मनसुबे या जरांगे नावाच्या माणसाचे आम्ही उधळून लावले आहेत, त्यामुळे आमच्या आंदोलनाला यश आलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT