Bajrang Sonwane Vs Pankaja Munde Sarkaranama
मराठवाडा

Beed Constituency : निकालानंतर बीड तापलं, पाथर्डी, शिरुरनंतर परळी बंदची हाक; 'हे' आहे कारण

Jagdish Patil

Beed Lok Sabha Constituency: राज्यात सर्वाधिक चर्चेच्या ठरलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी भाजपच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव केला. मुंडे यांचा हा पराभव भाजपसाठी मोठा धक्का होता. अत्यंत चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या निवडणुकीत निकालाची उत्सुकता शेवटच्या क्षणापर्यंत कायम होती. मतमोजणीत कधी सोनवणे तर कधी मुंडे आघाडी घेत होत्या. अखेर या निवडणुकीत बजरंग सोनवणे हे 6 हजार मतांनी विजयी झाले.

मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाचा केंद्रबिंदू असलेल्या जालना आणि बीड लोकसभा मतदारसंघाच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत प्रथमच जातीय रंग पाहायला मिळाला. मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष या निवडणुकीच्या प्रचारादम्यान दिसला. तो निवडणुकीच्या निकालानंतरही कायम असल्याचं दिसत आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच जाहीर नाव घेतलं नव्हतं. तरीही त्यांचा रोख कोणाकडे होता हे लपून राहिलं नाही. मराठा आंदोलनाला विरोध करणाऱ्यांना पाडा असा आदेशच जरांगे यांनी मराठा समाजाला दिला होता. त्यामुळेच बीडमधील निवडणुकीत जातीय रंग आल्याचं बोललं जात आहे. शिवाय जरांगेच्या या भूमिकेचा बजरंग सोनवणे यांनाच फायदा झाला. त्यामुळेच निवडणुकीनंतर त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत आभार मानले.

या सर्व घडामोडींमुळे जरांगे फॅक्टरमुळेच या निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्याचं म्हटलं जात आहे. अशातच आता निवडणुकीच्या निकालानंतर या मतदारसंघात तणाव निर्माण झाला आहे. पंकजा मुंडेंचा पराभव झाल्यानंतर सोशल मीडियावर काही वादग्रस्त पोस्ट व्हायरल होत आहेत. या पोस्टमध्ये फेसबुकवर काही लोक नाचत असलेला व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे, शिवाय त्याच्या कॅप्शनमध्ये आक्षेपार्ह कंटेंट लिहिला होता.

ही आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. पण तरीही संतप्त मुंडे समर्थकांकडून पाथर्डी शहर बंद करण्यात आलं होतं. त्यानंतर, शनिवारी (ता. 8 जून) रोजी बीड जिल्ह्यातील शिरूर कासार शहर बंद ठेवण्यात आलं. तर आता वंजारी समाजाच्यावतीने रविवारी (ता. 9 जून) रोजी परळी शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत शहरातील नागरिकांनी पोलिस स्टेशनमध्ये एकत्र येत हा निर्णय घेतला.

यावेळी पंकजा मुंडे यांच्याबाबत जे लोक वादग्रस्त पोस्ट शेअर करत आहेत, त्यांना आवार घालण्याची मागणी नागरिकांनी पोलिसांकडे केली. दरम्यान, निवडणूक निकालानंतर पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी परळीतील एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या तरुणाला अटकही केली. तरीही मुंडे समर्थकांनी बीड जिल्ह्यातील पाथर्डी-शिरुर बंदची हाक दिली होती. त्यानंतर आता परळी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता निवडणुकीनंतरही बीड मतदारसंघातील वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT