Vyankat Gund, Omraje nimabalkar  Sarkarnama
मराठवाडा

Dharashiv Loksabha News: ओमराजे हे तर मोदी कृपेने झालेले खासदार; लोकसभेच्या रिंगणात आणखी एका इच्छुकाची भर

Sachin Waghmare

Dharashiv News : लोकसभा निवडणुकीचा रंग आता हळूहळू सगळ्याच राजकीय पक्षांवर चढायला लागला आहे. लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत महायुतीकडून इच्छुकांची नावे चर्चेत होती, त्यात जस जशा निवडणुका जवळ येत आहेत तस तशी रंगत वाढत आहे. ही जागा महायुतीमध्ये कोणाच्या वाट्याला येणार हे ठरले नाही. त्यापूर्वीच महायुतीमधील घटक पक्षाच्या नेत्यात या जागेवरून रस्सीखेच सुरू आहे. त्यामध्ये भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारिणी सदस्य व्यंकट गुंड यांचेही नाव इच्छुकांच्या यादीत समोर येत आहे.

लोकसभा मतदारसंघावर आपला दावा मजबूत करायचा असेल, तर विद्यमान खासदाराच्या विरोधात टीका करणे आलेच. ठाकरे गटाची विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर हे मोदी कृपेमुळेच निवडून आले असल्याची टीका गुंड यांनी पत्रकार परिषद घेऊन केली. या जिल्ह्यात कुठला छोटा-मोठा उद्योग त्यांनी आणलाय का? चार लोकांना रोजगार दिलाय का? फक्त खांद्यावर हात टाकला म्हणजे विकास झाला, असं होतंय का ? असा सवाल करत त्यांनी ओमराजे यांच्यावर टीका केली आहे.

24 तास फोन उचलून जिल्ह्याचा विकास होत असेल तर तो योग्य खासदार होऊ शकतो का ? पाच वर्षांत या जिल्ह्याचा काय विकास झाला ? औद्योगिकदृष्ट्या काय बदल झाला ? मधल्या काळात महाविकास आघाडीचे सरकार होते, त्या काळातील ठळक काम सांगावे, असे जाहीर आव्हान गुंड यांनी केले. देशात लोकसभा निवडणुकीचा बिगुल अजून वाजायचा आहे. त्यापूर्वीच उमेदवारीसाठी लगबग सुरू झाली आहे.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात महायुतीचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात इच्छुकांची गर्दी वाढू लागली आहे. ठाकरे सेनेचे विद्यमान खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या विरुद्ध आरोग्यमंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी त्यांच्या विरुद्ध केंद्रातून आणलेली एखादी योजना दाखवा, मी म्हणेल ती पैज हरायला तयार, असे म्हणत आव्हान दिले होते.

त्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लोकसभा निवडणूक इच्छुक उमेदवार सुरेश बिराजदार यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांना मागील पाच वर्षांत केलेल्या कामाचा जाब विचारला होता. तसेच खासदार ओमराजे यांना सांगा की पैलवान तयार आहे, असे म्हणत दंड थोपटले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आता भारतीय जनता गुंड यांनी खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar ) यांच्यावर ते मोदीच्या लाटेतून खासदार झाल्याची टीका केली आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये मी व माझे कुटुंब अनेक वर्षापासून सक्रिय आहोत. पक्षाच्या आदेशाप्रमाणे मोठ्या प्रमाणात सर्व कामे केली आहेत. पक्षाने दिलेल्या सर्व जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत.

जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर यांच्यासह रोजगार आणि व्यवसाय उपलब्ध मी करून दिला आहे. याच कार्याला आणखी बळकटी येण्यासाठी राजकीय जोड मिळावी म्हणून होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाने उमेदवारी दिल्यास आपण लढण्यास तयार असल्याचे सांगून व्यंकटराव गुंड यांनीही लोकसभेसाठी दंड थोपटले आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawnkule) यांच्याकडे लोकसभेच्या उमेदवारीसाठी आपण मागणीही केली असल्याचे त्यांनी सांगितले.

R

SCROLL FOR NEXT