Shivsena UBT: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष फुटला. मराठवाड्यातील तीन खासदारांसह इतर असे सहा खासदार एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार हे आता स्पष्ट झाले आहे. धाराशीवचे खासदार ओम राजेनिंबाळकर, परभणीचे संजय जाधव, हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर हे कालपर्यंत आम्ही उद्धव ठाकरेंसोबतच आहोत, असे सांगत होते. पण अखेर त्यांच्या पक्षांतरावर आणि ठाकरेंच्या शब्दात गद्दारीवर शिक्कामोर्तब झालेच. धाराशिवचे दोन टर्म खासदार आणि सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा रेकाॅर्ड असणारे ओम राजेनिंबाळकर यांनी पक्ष सोडणे त्यांच्या समर्थकांसाठी धक्कादायक होते.
एकाच नाण्याच्या दोन बाजू ठराव्यात अशी धाराशिव जिल्ह्यातील खासदार-आमदाराची जोडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि ओमराजे यांची सावली राहिलेल्या आमदार कैलास पाटील यांनीही आपल्या ओमराजे यांच्या शिंदेंच्या शिवसेनेतील प्रवेशाबद्दल माहित नसल्याचे सांगीतले. मी माझी गॅरंटी घेऊ शकतो, ओमराजेंची नाही असे ते म्हणाल्याचा दावा ठाकरेंच्या पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. आता ओम राजेनिंबाळकर शिंदेंच्या शिवसेनेत जाणार हे निश्चित झाले आहे.
१९ जून म्हणजे शिवसेनेच्या वर्धापनदिनीच मुंबईत त्यांच्या पक्षप्रवेश होऊ शकतो, अशीही चर्चा आहे. लोकसभा अध्यक्षांकडे शिंदेसेनेत जाणाऱ्या खासदारांचा स्वतंत्र गट स्थापन करण्याची प्रक्रिया पार पडल्यानंतर हे सर्वजण शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होणार ही स्क्रीप्ट ठरलेली आहे. धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात ओम राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांची जोडी कुणाचीही नजर लागावी अशीच होती. इतर जिल्ह्यात स्थानिक आमदार आणि खासदार यांच्यात वाद, मतभेद, राजकीय कुरघोडीचे प्रकार आपण नहेमीच पाहतो. पण धाराशिव जिल्हा याला अपवाद ठरला होता. दोघांमधील समन्वय, मैत्री आणि परस्परांवरील विश्वास हेच दोघांच्याही राजकीय यशाचे गमक असल्याचे बोलले जाते.
ओम राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्यात गेल्या दहा-पंधरा वर्षात कधी वाद झाला, मतभेद झाले किंवा दोघांची भूमिका वेगळी होती, असे कधीच झाले नाही. उलट मतदारसंघातील अनेक जटील प्रश्न या दोघांच्या आक्रमक भूमिकेने सुटले. शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देण्याचा या दोघांचा लढा त्याचे ताजे उदाहरण म्हणावे लागेल. त्यामुळे सहाजिकच ओम राजेनिंबाळकर उद्धव ठाकरेंची साथ सोडून जाणार म्हटल्यावर आमदार कैलास पाटील यांची पुढील भूमिका काय असणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
ओमराजेंची उणीव भरून काढणार का?
धाराशिव लोकसभा मतदारसंघ आणि धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघ अनुक्रमे ओम राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास पाटील हे राखत आले आहेत. ओमराजे दोन टर्म खासदार, तर कैलास पाटील दोन टर्म या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. ओमराजे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याने जिल्ह्यात त्यांची जागा भरून काढेल असे दुसरे नाव म्हणून आमदार कैलास पाटील यांच्याकडे बघितले जाते. मात्र ओम राजेनिंबाळकर यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी विश्वास टाकूनही त्यांनी दगा दिला म्हटल्यावर कैलास पाटील यांच्यावर किती विश्वास ठेवावा? हा मोठा प्रश्न पक्षनेतृत्वाला पडणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.