Osmanabad to Dharashiv Politics :
Osmanabad to Dharashiv Politics :  Sarkarnama
मराठवाडा

Osmanabad to Dharashiv Politics : उस्मानाबाद ते धाराशिव; आधी विलासराव देशमुखांनी रद्द केला आणि आता केंद्र सरकारची मंजुरी

सरकारनामा ब्युरो

Osmanabad to Dharashiv Politics : महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेवटच्या कॅबिनेट बैठकीत उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला. पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी हा निर्णय रद्द करत नव्याने प्रस्ताव काढला आणि नामकरणाचा निर्णय घेतला.

राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात काहीजणांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयात हे प्रकरण सुरू असतानाच गेल्या आठवड्यात केंद्र सरकारच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी केंद्राने ‘धाराशिव’ला मान्यता दिल्याचे न्यायालयात सांगितले.

उस्मानाबाद ते धाराशिव... असा आहे प्रवास

२५ वर्षांपूर्वी उस्मानाबादचे धाराशिव करण्याची मागणी शिवसेनेने केली होती. २५ मे १९९५ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी पहिल्यांदा उस्मानाबादच्या नामांतराची घोषणा केली. मंत्रिमंडळ बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब झाले. पण या निर्णयाविरुद्ध दोन जणांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करत नामांतराला स्थगिती मिळविली.

त्यानंतर २००० मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी देखील मंत्रिमंडळ बैठकीत उस्मानाबादचे नामांतर धाराशिव करण्याचा निर्णय रद्द केला आणि औरंगाबाद खंडपीठाने याचिका निकाली काढली.

उस्मानाबादची धारासूर मर्दिनी ग्रामदेवतेच्या नावाचा पुरावा

निजामाने मराठवाड्यातील शहरांची नामांतरे केली, त्यात उस्मानाबाद शहराचा समावेश आहे. उस्मानाबादचे जुने नाव धाराशिव असे असल्याचे काही पुरावे आहेत. गावचे ग्रामदैवत असलेल्या धारासूर मर्दिनी देवीच्या नावावरून ‘धाराशिव’ असल्याचे पुरावे सापडतात. पण निजामशाहीमधील सातवा निजाम उस्मान अली खान याच्या काळात धाराशिव शहराचे नाव उस्मानाबाद झाल्याचेही काही संदर्भ आढळतात. नगर परिषदेच्या सुधारित नगर विकास योजनेच्या प्रकरण एकमध्ये उस्मान अली खानने १९०० मध्ये ‘धाराशिव’चे उस्मानाबाद केल्याचा उल्लेख आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT