Pankaja Munde Dasara Melava 2023  Sarkarnama
मराठवाडा

Pankaja Munde Dasara Melava Speech : माईक बंद पडला अन् पंकजा मुंडेंच्या भाषणाची लिंक तुटली...

Jagdish Pansare

Marathwada Political News : परळी विधानसभा मतदारसंघात पराभव झाल्यापासून गेली चार वर्षे पक्षाने डावलल्यामुळे भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना प्रचंड सहानुभूती मिळत आहे. (Pankaja Munde Dasara Melava News) नुकत्याच झालेल्या शिव परिक्रमा यात्रेत त्यांना जो प्रतिसाद मिळाला तो पाहता पंकजा मुंडे आता ठोस निर्णय घेणार, अशी अपेक्षा त्यांचे समर्थक बाळगून होते. त्यामुळे राज्यभरातील शिवशक्ती परिक्रमा यात्रेच्या यशानंतर सावरगाव येथील भगवान भक्तीगडावर आज होणाऱ्या पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याकडे राज्याचे लक्ष लागले होते.

पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या परळी वैद्यनाथ साखर कारखान्यावर जीएसटी विभागाने धाड टाकल्यानंतर हा कारखाना वाचवण्यासाठी पंकजा (Pankaja Munde) समर्थकांनी दोन दिवसांत अकरा कोटी उभारले होते. (BJP) यावरून पंकजा यांना मानणारा त्यांच्यावर प्रेम करणारा वर्ग त्यांच्या पाठीशी किती खंबीरपणे उभा आहे हे दिसून आले होते. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे मेळाव्यात काय बोलणार? काही ठोस राजकीय निर्णय घेणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

परंतु, आता माझे लोक संयम बाळगणार नाही, असा निर्वाणीचा इशारा देत पंकजा यांनी पुन्हा एकदा संयम बाळगल्याचे दिसून आले. पंकजा मुंडे भाषणासाठी व्यासपीठावर आल्या तेव्हा त्यांच्यात प्रचंड उत्साह होता. (Maharashtra) उपस्थीत गर्दीला पाहून त्यांनी शेवटपर्यंत माझा आवाज येतोय का? कुठून कुठून आलात तुम्ही.. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा सगळ्या भागातून आलात. नतमस्तक होऊन तुमचे स्वागत करते, विजयादशमीच्या तुम्हाला शुभेच्छा देते असे म्हणत दमदार सुरुवात केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाषण करू का जाऊ ?

दरम्यान, समोरच्या कोपऱ्यात गोंधळ सुरू होता. लोक पुढे येण्याचा प्रयत्न करत होते, त्यामुळे पंकजा यांना मधेच भाषण थांबवून `बसलेले उठू नका, शपथ आहे माझी. वायर हलवू नका, राज्यातून लोकं भाषण बघताहेत. आवाज देशात पोचला पाहिजे. भाषण करू का जाऊ, असे म्हणत शांत राहण्याचे आवाहन करावे लागले. राज्यात माझे सकल मराठा, धनगर, माळी, मुस्लिम, ऊस तोडणाऱ्यांनी स्वागत केले. तेवढच तुमचं स्वागत मला महत्त्वाचे आहे. मला पद मिळालं का, खुर्ची मिळाली म्हणून आलात का? मी तुम्हाला काय दिलंय, अस विचारत पंकजा यांनी शिवशक्ती परिक्रमा यात्रेचा उल्लेख केला.

तेवढ्यात पुन्हा समोरून गोंधळ आणि घोषणाबाजीने भाषणात अडथळा आला. राजकारण करू का सोडून देऊ. माझ्यावर प्रेम करणारे असाल तर खाली बसा, घोषणा बंद करा. आवाज बंद करा, नाहीतर बाजूच्याने त्याला बघून घ्या, असा इशारा पंकजा यांना द्यावा लागला. पुढे मला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात खूप प्रेम मिळालं. माझ्या कारखान्यावर रेड झाली तेव्हा दोन दिवसांत ११ कोटींचे चेक तुम्ही जमा केले. तुम्हाला बसायला मला साधी संतरजी अंथरता आली नाही, तुम्हाला खाऊ घालता आलं नाही. तुम्ही उन्हात असताना मी सावलीत बसू शकत नाही. मला काही देऊ नका, पण माझ्या लोकांना तसे ठेवू नका.

गोंधळ, घोषणाबाजी आणि...

पद घेतलेले मेळाव्यापासून दूर जातील, पण ही जनता मेळाव्यापासून कधीच दूर जाऊ शकत नाही. निवडणूक हरले असेल, पण तुमच्या नजरेतून पडले का? इथे सगळ्या समाजाचे लोक आले आहेत. शेतकरी सुखी आहे का? तुम्ही आनंदात आहात का? विमा मिळाला का? अनुदान मिळाले का? पैसा वाढवून दिल्याशिवाय ऊस तोडायला मजूर जाणार नाही, असा इशारा देत पंकजा यांच्या भाषणाने लय पकडली होती. तेवढ्यात ट्रायपाॅडवर लागलेला माईक बंद पडला. गर्दीतून ताई आवाज येत नाहीये, अशा आरोळ्या सुरू झाल्या. यावर माझी वायर कोणी तोडली, माझा आवाज कोणी दाबू शकत नाही, असे म्हणत त्यांनी माईक दुरुस्त होण्याची वाट पाहिली.

प्रयत्न करूनही माईक दुरुस्त होईना, भाषणात व्यत्यय येऊ लागला. नंतर पंकजा यांनी निवेदकाचा माईक हाती घेतला आणि पुढचे भाषण त्यावरूनच केले. दरम्यान, गोंधळ, घोषणाबाजी आणि माईकमधील बिघाडामुळे पंकजा यांच्या भाषणाची लिंकच तुटली. पुढे अर्ध्या तासात त्यांनी राज्यातील परिस्थिती, शेतकरी, ऊसतोड कामगार, मजूर यांच्या प्रश्नावर भाष्य करत त्यांच्यासाठी काम करणार असल्याचे सांगितले. महाराष्ट्रात गंभीर प्रश्न आहेत, मराठा आरक्षणासह ओबीसींच्या मनात गंभीर प्रश्न आहेत. लोकांच्या सरकारकडून अपेक्षा आहेत, पण अपेक्षाभंग झाला तर समाजाची शक्ती आता राहिलेली नाही.

कारखान्यावरील कारवाई, नेत्यांबद्दल मौन

मी तुम्हाला फक्त स्वाभिमान देऊ शकते असे सांगत तुम्ही ज्या दिवशी ११ कोटी जमवत होतात, तेव्हा मी ठरवले पैसे घेणार नाही, पण तुमचे आशीर्वाद घेतल्याशिवाय राहणार नाही. माझ्या मुलाआधी काकनभर जास्त जबाबदारी तुमची माझ्यावर आहे. ग्रामीण विकास हे माझ्याकडचं शेवटच पदं होतं. गावागावांत काम केलं का नाही? असा सवाल पंकजा यांनी केला. आता आपल्याला त्रास देणाऱ्यांचे घर उन्हात बांधू. आता माझे माणसं उन्हात राहणार नाहीत, आता ते संयम दाखवणार नाहीत. शिवशंकर भोळा आहे, पण त्यालाही तिसरा डोळा आहे. पडले ते सोडा, आता पाडणार, असा इशारा पंकजा यांनी दिला.

पाऊण तासाच्या भाषणात पंकजा यांनी सत्तेत असताना ज्यांना पदं दिली ते आज त्यांच्यासोबत नसल्याची खंत व्यक्त केली. परंतु संपूर्ण भाषणात त्यांनी राज्य किंवा केंद्रातील भाजप नेत्यांवर कुठलेही भाष्य केले नाही. परळी कारखान्यावर जीएसटीने केलेल्या कारवाईचा उल्लेख पंकजा यांनी केला, तोही कारखाना वाचवण्यासाठी दोन दिवसांत लोकांनी अकरा कोटी कसे जमा केले? हे सांगण्यासाठी. परंतु राज्यात आणि केंद्रात भाजपचीच सत्ता असतानाही ही कारवाई झाल्यामुळे राज्यातील पक्षांतर्गत पंकजा विरोधकांकडे संशयाची सुई गेली होती. परंतु यावर पंकजा यांनी मेळाव्यात भाष्य केले नाही. राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी अशा कुठल्याच नेत्याचा पंकजा यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला नाही, याबद्दलही आश्चर्य व्यक्त होत आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT