Pankaja Munde  Sarkarnama
मराठवाडा

Pankaja Munde : मांजरीच्या क्रूर हत्येने पंकजा मुंडे संतापल्या; व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांना तातडीच्या कारवाईचे निर्देश

राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी ठाणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना पत्र पाठवून संबंधित व्यक्तीवर तत्त्काळ कारवाईसाठी पत्र पाठवले आहे.

Jagdish Pansare

Pankaja Munde Letter to Police: अंबरनाथच्या रॉयल फ्लोरा फेज-2 मध्ये २६ जुलैला बाराव्या मजल्यावरून मांजरीला खाली ढकलून ठार केल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होताच सर्वत्र संतापाची लाट उसळली होती. संबंधित व्यक्तीवर कारवाई करा, त्याला अटक करा, अशी मागणी सर्वच स्तरावरून होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी ठाणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना पत्र पाठवून संबंधित व्यक्तीवर तत्त्काळ कारवाईसाठी पत्र पाठवले आहे.

'प्राण्यांच्या जीवाचे मोल जपणे हे आपले कर्तव्यच आहे, मी स्वतः यात लक्ष घातले आहे, अशी क्रूरता अक्ष्यम आहे' अशा शब्दांत त्यांनी या घटनेवर भाष्य केले आहे. पोलीस अधीक्षकांना पाठवलेल्या पत्रात पंकजा मुंडे यांनी त्या घटनेचा उल्लेख करत नमूद केले आहे, की मांजराच्या लहान पिल्लाला इमारतीवरून एका व्यक्तीने खाली फेकल्यामुळे मृत्यू झाल्याची बदलापूर येथील घटना निदर्शनास आली आहे.

या विरोधात स्थानिक प्राणिमित्र संघटनांनी कारवाई होत नसल्याने रोष व्यक्त केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात पसरला आहे. यातील आरोपी व्यक्तीची कृती प्राण्यांविरुद्ध क्रूरता करणारी असल्याने प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा 1960 अन्वये दखलपात्र गुन्हा आहे. अशा व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023, कलम 325 नुसार कोणत्याही प्राण्याला मग तो पाळीव असो भटका असो किंवा जंगली असो, ठार मारणे, विष देणे, त्याच्या शरीराचा अवयव तोडून त्याला अपंग करणे किंवा त्याला कायमचे निरुपयोगी करणे प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायदा 1960 पीसीए अॅक्ट 1960च्या कलम 11(1) अ नुसार प्राण्यांना शारीरिक इजा पोहोचेल अशाप्रकारे मारहाण करणे गुन्हा आहे.

तसेच त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त काम करून घेणे किंवा त्यांना विनाकारण वेदना देणे प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायदा 1960 पीसीए ऍक्ट 1960च्या कलम 11 (1) ल नुसार कोणत्याही प्राण्याला अमानुषपणे अपंग करणे किंवा स्ट्राइकनाईन सारख्या विषारी रसायनांचा वापर करून अथवा विनाकारण क्रूरपणे मारणे या विषयात मी स्वतः लक्ष घालत आहे. मानवाप्रमाणेच प्राण्यांच्या जीवाचं ही तेच मोल आहे, अशी क्रूरता अक्षम्य आहे त्याबाबत त्वरित कार्यवाही करून मला अवगत करावे, असे पंकजा मुंडे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. या पत्राची प्रत जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा प्राणीक्लेश प्रतिबंधक समिती ठाणे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त तथा सदस्य सचिव जिल्हा आणि प्राणीक्लेश प्रतिबंधक समिती जिल्हा ठाणे यांनाही पाठवण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण?

अंबरनाथच्या रॉयल फ्लोरा फेज-2 मध्ये 26 जुलैला बाराव्या मजल्यावरून मांजरीला खाली ढकलून ठार केल्याचा आरोप एका व्यक्तीवर आहे. घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून मृत मांजरीचे अवशेष पुन्हा बाहेर काढून शवविच्छेदन करण्यात आले आणि त्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

अंबरनाथमधील पहाटे सुमारे 5.45 वाजता एका व्यक्तीने इमारतीच्या बाराव्या मजल्यावरील कठड्यावर बसलेल्या मांजरीला खाली ढकलल्याचा आरोप आहे. या घटनेत मांजरीचा खाली पडून मृत्यू झाला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संपूर्ण प्रकार कैद झाला. बाराव्या मजल्यावरील डक्टच्या कठड्यावर मांजर बसलेली होती.

संबंधित व्यक्ती तिथे आली आणि मांजरीला धक्का देऊन खाली ढकलले. त्यानंतर तो व्यक्ती तेथून निघून गेल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. मांजर खाली पडून मृत झाल्यानंतर तिचे मृत शरीर सोसायटी परिसरातच दफन करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर प्राणीप्रेमी आणि रहिवाशांनी या घटनेची गंभीर दखल घेतली.

त्यानंतर मृत मांजरीचे अवशेष बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पशुवैद्यकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. या प्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT