Pankaja Munde Sarkarnama
मराठवाडा

Pankaja Munde : २५/१५ च्या निधीसाठी आता मंत्रालयात बेंचवर बसू का? पंकजा मुंडेंचा अगतिक सवाल

Beed News : बीड जिल्हा कार्यकर्ता बैठक व बूथ सशक्तीकरण प्रशिक्षण वर्ग

Dattatrya Deshmukh

Beed BJP : तुमच्यासाठी काहीही करेल, शेतात नांगर हाणते मात्र, मी स्वाभिमानाशिवाय जगू शकत नाही. आता '२५/१५'च्या कामासाठी मंत्रालयाबाहेर बेंचवर बसू का? असा अगतिक प्रश्न करून भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी मला निधीचे सांगू नका, असे कार्यकर्त्यांना सांगितले.

भारतीय जनता पक्षाची (BJP) बीड जिल्हा कार्यकर्ता बैठक व बूथ सशक्तीकरण प्रशिक्षण वर्ग पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी त्यांनी गाव पातळीवरील विविध कामांसाठी अनेक कार्यकर्ते निवेदन देत असल्याबाबत नाराजी व्यक्त करत निधीबाबत आग्रह न धरण्याचे आवाहन केले.

मुंडे म्हणाल्या,"२५/१५ योजनेतील दहा-पाच लाख रुपये मिळाले नाही तर फरक पडत नाही. माझ्या हाती काही आले तर डबल देऊन भरपाई करेल. पण मला पैसे मागायला लाऊ नका. तुम्ही प्रयत्न करा, निधी आणा. पत्र देईन, फोन करेल पण मी येणार नाही. निधीचे मला सांगू नका. पालकमंत्री होते तेव्हा तुम्हाला काहीही करावे लागत नव्हते. सरकार नसताना ३२ महिने कुणाकडेच गेले नाही. काही लोक सतत मंत्रालयात बसून असतात, त्यांना जादा निधी मिळतो. ते उद्योगी असतात."

यावेळी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी रंग, धर्म, जात पाहून राजकारण न करण्याचे आवाहन केले. त्या म्हणाल्या, "गरिबाला केंद्रबिंदू माना, जात-पातीचा उल्लेख सोडून कार्यकर्ता गोळा करा. जात पाहून जाऊ नका. राजकारण रंगाच करायचे नाही. संत, महंत, देव धर्माचे राजकारण मान्य नाही. आपण ज्या धर्मात जन्म त्याचा अभिमान असावा. आपल्या धर्माची शिकवण अहिंसेने काम करण्याची आहे. मात्र, रामरक्षा कोठे म्हणायची, हनुमान चालिसा कोठे म्हणायची याचा राजकारणाशी काय संबंध? सर्व धर्म एकत्र राहून राजकारण करायला हवे."

आता देश कोणत्याही मुद्द्यावरून पेटतो, अशी खंतही मुंडे यांनी व्यक्त केली. पंकजा मुंडे म्हणाल्या, आता कशाचे काय होईल हे सांगता येत नाही. कोणत्या रंगाचे वस्त्र कुण्या अभिनेत्रीने घातले तर देश पेटतो. सर्वांना सोबत घेऊन जायचे आहे. दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना धर्माचे, रंगाचे राजकारण मान्य नव्हते. मानवाच्या हिताच्या निर्णयासाठी काम करा."

बीड जिल्ह्यात (Beed) भाजपमध्ये दिग्गज लोक आहेत. यांच्यासोबत काम करणे सोपे नाही. आमच्यात मनभेद नाहीत, मतभेद थोडे होऊ शकतात. जिल्ह्याचा विकास कोण करु शकतो, हे आता कळल्याने आम्ही एकजीव राहण्याचे ठरविले. माझ्या निर्णयाला कुणी समोर विरोध करत नाही, मागे करतात, अशी कोपरखळीही मुंडे यांनी यावेळी स्थानिक नेत्यांना मारली. त्यानंतर मीही तशी थोडी गडबड करते, अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी यावेळी केली. आता मात्र एकमेकांच्या पायात-पाय घालणार नाहीत, जिल्हा परिषदेच्या जास्त जागा निवडून आणणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

निवडणुकीतील पराभवाचे दु:ख नाही. त्यामुळे वेगळा अनुभव घेता असल्याचे मुंडे यांनी सांगितले. केंद्रात काम करण्याची संधी मिळाली असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे विचारही त्यांनी सांगितले.

मुंडे म्हणाल्या, "निधीच्या पलीकडे जाऊनही राजकारण असते, हे आता लक्षात ठेवले पाहिजे. आता विचार व विश्वासावर राजकारण करण्याची गरज आहे. मी देशात काम करीत असले तरी माझे लक्ष बीड जिल्ह्यावर आहे. कार्यकर्ता ही संपत्ती आहे. या विश्वासावर काम करते. आता सर्वांनी एकत्र येऊन जिल्ह्यात ताकद उभी करावी. एकमेकांच्या पायात पाय न घालता आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या कामाला लागावे. प्रत्येकांनी आपापला मतदार संघ सांभाळून ताकदीने तयारी करावी."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT