Pankaja Munde-Raosaheb Danve Sarkarnama
मराठवाडा

Pankaja Munde-Raosaheb Danve : पंकजाताई, दानवेंचा पराभव होणारच; शिवसेना नेत्याचा मोठा दावा

Vijaykumar Dudhale

Chhatrapati Sambhajinagar, 31 May : मराठवाड्यातील आठही जागा महाविकास आघाडीला मिळतील. त्यात भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्या पराभवाचेही संकेत मिळत आहेत. ते दोघेही निवडून येत नाहीत, असे भाजपचेच लोक म्हणत आहेत. मागच्या निवडणुकीत रावसाहेब दानवे यांनीच मला पाडले होते, त्यामुळे परमेश्वर बदला घेत असतो, असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

राज्यात महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) 32, तर महायुतीच्या (Mahayuti) 16 जागा निवडून येतील, असा दावाही खैरे यांनी केला आहे. ते म्हणाले, शिंदे हे लोकसभा निवडणुकीच्या निकालादिवशी तुम्हाला संपलेले दिसतील. खोके घेणाऱ्यांचा लोकांना प्रचंड राग येतो. ज्यांनी मोठं केलं, त्यांच्या विरोधात हे लोक जातात, तर जनतेशी त्यांचा काय संबंधच येत नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मी निवडून यावं; म्हणून अनेकांनी अनेक देवांना नवस केले आहेत. छत्रपती संभाजीनगर हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा गड आहे. तो गड कुठे जाऊ शकत नाही. आमच्यासाठी मित्रपक्षांनही मेहनत घेतली आहे, त्यामुळे संभाजीनगरमधून माझा विजय निश्चित आहे, असेही खैरे यांनी नमूद केले आहे.

संदीपान भूमरे यांच्या एक ते दीड लाख मतांनी निवडून येण्याच्या दाव्याची माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी खिल्ली उडवली. हे कसं शक्य आहे. त्यांनी जर ईव्हीएम मशीन बदलली तरच हे शक्य होणार आहे; अन्यथा नाही. तुम्ही कशाही पद्धतीने गणित लावा, ते सुटणारं नाही. मी मताधिक्क्याचा दावा करणार नाही. पण, संभाजीनगरामधून मीच शंभर टक्के निवडून येणार आहे, असे चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे.

दारू विकणाऱ्या माणसाला कशाला मतदान करायचं, आम्ही तुम्हालाच मतदान केलं आहे, असे संभाजीनगर शहरातील काही महिलांनी परवा मला सांगितले. दारूच्या बाबतीत लोकांना प्रचंड राग आहे. त्यांनी 25-25 दुकानं उघडली आहेत. तुम्ही लोकांची सेवा करण्यासाठी मंत्रिमंडळात गेलात की स्वतःसाठी गेलात, असा सवालही खैरे यांनी भूमरे यांना विचारला.

संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील 22 टक्के मुस्लिम समाज आमच्याबरोबर आलेला आहे. त्याचबरोबर मराठा, धनगर, ओबीसी समाज आहे. त्यामुळे इम्तियाज जलील यांना हिंदू मतांमध्ये विभागणी होईल, असे जरी वाटत असले तरी या वेळी हिंदू मतांमध्ये अजिबात विभागणी होणार नाही, असा दावा खैरे यांनी केला. दिल्लीत गेल्यानंतर मी छत्रपती संभाजीनगरची पाणी योजना पूर्ण करण्याचे पहिले काम करणार आहे. शहरातील लोकांना पाणी देण्याचे काम मी पहिले करणार आहे, असेही खैरे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT