Raosaheb Danve - Pritam Munde - Pankaja Munde  Sarkarnama
मराठवाडा

Raosaheb Danve News : बीड लोकसभेसाठी पंकजा की प्रीतम मुंडे ? रावसाहेब दानवेंनी दिलं 'हे' उत्तर

Beed Loksabha Election 2024 : बीड लोकसभेसाठी विद्यमान खासदार डॉ. प्रीतम मुंडेच भाजपच्या उमेदवार असतील की राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचे नाव भाजपच्या उमेदवार यादीत येणार यावरून कार्यकर्त्यांत संभ्रम सुरू आहे.

Datta Deshmukh

Beed News : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह नेतेमंडळींनी देशासह महाराष्ट्रातही 'चारशे पार'करण्यासाठी कंबर कसली आहे. यात बीडची जागा राज्यात चांगलीच चर्चेत आली आहे. या ठिकाणी प्रितम मुंडेंना खासदारकीच्या हॅट्ट्रिकची संधी मिळणार की पंकजा मुंडेंचं पुनर्वसन भाजप करणार याविषयी चर्चांना उधाण आले आहे. याचवेळी आता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी नवा बॉम्ब टाकत आणखी सस्पेन्स वाढवला आहे.

भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी गुरुवारी(ता.7) अहमदगनर - बीड -परळी लोहमार्ग कामाचा आढावा घेतला. यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, खासदार डॉ.प्रितम मुंडे,जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे, पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी बीड लोकसभेच्या उमेदवारीवरही भाष्य केले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत महायुतीच्या भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे जागावाटप निश्चित होणार आहे. मराठवाड्यातील बहुतांशी जागा भाजप लढविणार असल्याचे सांगितले जात आहे.यात महत्त्वाची बीड लोकसभेची जागा भाजपच लढविणार असले तरी उमेदवार कोण हा संभ्रम नव्याने तयार झाला आहे. विद्यमान खासदार डॉ. प्रीतम मुंडेच भाजपच्या उमेदवार असतील की राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचे नाव भाजपच्या उमेदवार यादीत येणार यावरून कार्यकर्त्यांत संभ्रम सुरू आहे.

दानवे म्हणाले, बीड लोकसभेची भाजपची उमेदवारी कोणाला याचा निर्णय पक्षाचे पार्लमेंट्री बोर्ड घेईल.आपण स्वत:केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड हे निवडणुक रिंगणात असतील का,याचा निर्णयही तेच घेतील,असे सांगून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनीही उमेदवारीबाबत सस्पेन्स वाढविला आहे.बदलत्या राजकीय समीकरणामुळे बीडची लोकसभेची भाजपची उमेदवारी कोणाला, असा संभ्रम आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खासदार डॉ.मुंडेंच्या उपस्थितीत रावसाहेब दानवे यांनीही वरील उत्तर देऊन यात भरच पाडली.दोन महिन्यांपूर्वी झालेल्या महायुतीच्या मित्रपक्ष संमेलनात शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांनी डॉ.प्रीतम मुंडे याच उमेदवार असतील व त्या तिसऱ्यांदा विक्रमी मतांनी लोकसभेत पोहोचतील असे जाहीर केले.मात्र,या मित्रपक्ष संमेलनाला जिल्ह्यातील भाजपच्या तीनपैकी एकही आमदाराची उपस्थिती नव्हती इथेच पाल चुकचुकली आहे.

दरम्यान, पंकजा मुंडे यांचा परळी विधानसभा मतदारसंघातून 2019 च्या निवडणुकीत पराभव झालेला आहे.आता महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी झाला आहे.आगामी विधानसभा निवडणुकीत ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाला जागा असे समीकरण ठरले तर या जागेवर राज्याचे कृषिमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना उमेदवारी भेटू शकते. मग पंकजा मुंडेंचे काय असा पेच आहे.

त्यामुळे लोकसभेची उमेदवारी पंकजा मुंडेंना दिली जाऊ शकते असे गणित मांडले जात आहे. एकूणच भाजपची उमेदवारी जरी मुंडेंनाच भेटणार असली तरी पंकजा मुंडे की खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या नावाबाबत आजतरी संभ्रम आहे. त्यात आता रावसाहेब दानवे यांनीही उमेदवारीचा चेंडू भाजपच्या केंद्रीय पार्लमेंट्री बोर्डाकडे टोलावून सस्पेन्स वाढविला आहे.

उमेदवारांची यादी माझ्या खिशात...

रावसाहेब दानवे यांनी यावेळी भाजप उमेदवारांच्या यादीवर बोलताना त्यांच्या नेहमीच्या शैलीत उत्तर दिले.ते म्हणाले,भाजपच्या लोकसभेच्या उमेदवारांची यादी माझ्या खिशात आहे.यात धुळे,जळगाव,रावेर,पाचोरा, अकोला,भंडारा,गडचिरोली,नांदेड,दिंडोरी,नाशिक, पालघर,भिवंडी या मतदारसंघाची नावेही दानवेंनी घेतली.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT