Dhananjay Munde, Pankaja Munde  Sarkarnama
मराठवाडा

Parli Assembly Election 2024 : परळीत आता `ती` लक्षवेधी लढत पुन्हा होणे नाही..

Pankaja vs Dhananjay match will not be seen in Parli Assembly Constituency now : या दोघांमध्ये दिलजमाई व्हावी, यासाठी अनेक पातळीवरून प्रयत्न झाले. अखेर परळी वैद्यनाथ साखर कारखान्याच्या निवडणुकीत पहिल्यांदा या बहीण-भावांमध्ये कौटुंबिक व राजकीय संबंध सुधारत असल्याचे दिसून आले.

Jagdish Pansare

Beed Mahayuti Political News : बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघ राज्यात प्रसिद्ध आहे तो आपल्या भाऊबंदकीमुळे. काका-पुतण्या आणि त्यानंतर बहीण-भाऊ यांच्यातील राजकी संघर्षाची किनार या मतदारसंघाला आहे. पण म्हणतात ना, राजकारणात कायम कोणी कोणाचा शत्रू आणि मित्र नसतो, तसेच काहीसे कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि त्यांच्या भगिनी पंकजा, डाॅ, प्रीतम यांच्या बाबतीत घडले आहे.

2014 आणि त्यानंतर 2019 च्या परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे (Dhananjay Munde) विरुद्ध पंकजा मुंडे असा सामना पहायला मिळाला. दोघांनी प्रत्येकी एकदा ऐकमेकांचा पराभव केला. 2014 मध्ये पंकजा मुंडे पंचवीस हजाराहून अधिक मताधिक्याने विजयी झाल्या. तर या पराभवाची परतफेड धनंजय मुंडे यांनी पुढील म्हणजेच 2019 च्या विधानसभा निवडणुकीत केली.

अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी 4 हजार सातशे मतांनी विजय मिळवत परळीत आपले वर्चस्व सिद्ध केले. परळीत भावाकडून झालेल्या पराभवानंतर पंकजा-धनंजय यांच्यातील वितुष्ट अधिकच वाढले. गेल्या साडेचार वर्षात ऐकमेकांवर राजकीय आरोप, विकास कामांच्या श्रेयावरून कुरघोडी असे सगळे प्रकार दोन्ही बाजूंनी झाले. मात्र या संघर्षात मतदारंघातील जनता भरडली जाऊ नये, असा सूर निघू लागला होता.

या दोघांमध्ये दिलजमाई व्हावी, यासाठी अनेक पातळीवरून प्रयत्न झाले. अखेर परळी वैद्यनाथ साखर कारखान्याच्या निवडणुकीत पहिल्यांदा या बहीण-भावांमध्ये कौटुंबिक व राजकीय संबंध सुधारत असल्याचे दिसून आले. (Pankaja Munde) दोघांनी शेतकरी आणि कारखाना सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेवत संचालक मंडळाच्या निवडणुकीत मैत्री दाखवली. दोघांनी पुढाकार घेतल्याचा परिणाम पुढे चांगलाच झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आणि अजित पवार समर्थक आमदारांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

यात धनंजय मुंडे यांची भूमिका महत्वाची होती. राज्याचे कृषी मंत्रीपद मुंडे यांना मिळाले आणि लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना बीड लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी त्यांना निवडून आणण्याची जबाबादीर आपल्या खांद्यावर घेतली. मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षण संघर्षाच्या सावटाखाली झालेल्या या निवडणुकीत मुंडे बहीण-भावावर जातीयवादाचा आरोप झाला. बीड जिल्ह्यात काही घटना घडल्या आणि त्याचे पडसाद मतपेटीतून उमटले.

धनंजय मुंडे यांची ताकद, भाजपचे मजबुत संघटन असूनही पंकजा यांना पराभवाचे तोंड पहावे लागले. पक्षाने विधान परिषदेवर संधी देत पंकजा यांचे पुनर्वसन केले, पण त्यात त्यांना फारसे समाधान नाही, असे बोलले जाते. लोकसभेला बहीणीची उमेदवारी बदलली, स्वतःचा पराभव झाला, हक्काचा परळी मतदारसंघ महायुतीमुळे हातचा गेला. बहीण माजी खासदार प्रीतम मुंडे यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप कायम आहे.

दुसरीकडे धनंजय मुंडे यांची परळी मतदारसंघावरील पकड अधिक घट्ट होत चालली आहे. काल झालेल्या जन सन्मान यात्रेत राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विधानसभा निवडणुकीनंतर धनंजय मुंडे यांच्यावर पक्ष आणखी मोठी जबाबदारी देणार असल्याचे सुतोवाच केले. तटकरे यांनी तर धनंजय मुंडे यांची तुलना काका दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्याशीच केली.

एकूणच बीडसह परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे वरचढ ठरू लागले आहे. महायुतीमुळे पंकजा मुंडे यांची मात्र कोंडी झाल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी आणि भाजप हे महायुतीतील घटक पक्ष असल्याने परळीची जागा धनंजय मुंडे हेच लढवणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत दिसलेला बहीण-भावाचा संघर्ष 2024 मध्ये मात्र महाराष्ट्राला पहायला मिळणार नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT