Parbhani Hingoli MLC Election; Rajesh Vitekar, MLC Saeed Khan and Eknath Shinde sarkarnama
मराठवाडा

Saeed Khan : 'शपथ घेऊन सांगतो, गद्दारी करणाऱ्यांना सोडणार नाही'; आमदार होताच शिंदेंच्या शिलेदाराचा विटेकरांना गर्भित इशारा

Parbhani Hingoli MLC Election Winner Saeed Khan Signals Political Retaliation Against Rajesh Vitekar and Opponents : परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून शिवसेना महायुतीचे सईद खान हे विजयी होताच त्यांनी विरोधकांना थेट इशारा दिला आहे.

Jagdish Pansare

Parbhani Politics News : 'मला पाडण्यासाठी ज्यांनी सोबत राहून प्रयत्न केले, गद्दारी केली त्यांनाही मी सोडणार नाही. देव माझ्यासोबत होता, एकनाथ शिंदेसाहेबांच्या आशिर्वादाने मी आमदार झालो, पण लक्षात ठेवा आज मांडव माझ्या दारात होता, उद्या तो तुमच्या दारासमोर असेल. आमची वेळ येईल, तेव्हा कोणालाही सोडणार नाही' असा गर्भीत इशारा परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार शिवसेनेचे सईद खान यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश विटेकर यांना नाव न घेता दिला.

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून शिवसेना महायुतीचे सईद खान हे 242 मतं घेऊन विजयी झाले. महायुतीकडे 307 मत असताना सईद खान यांना 242 एवढीच मतं मिळाल्याने महायुतीची मतं फुटल्याचे स्पष्ट झाले. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मतं ही महाविकास आघाडीचे विवेक नावंदर यांना तर काही अपक्ष सुशील देशमुख यांना गेल्याचे बोलले जाते. मतमोजणीनंतर राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर, रासपचे गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यावर अप्रत्यक्षरित्या सईद खान व त्यांच्या समर्थकांकडून टीका केली जात आहे.

महायुतीकडे कागदावर 307 मते असताना सईद खान यांचा विजय सहज व्हायला हवा होता. परंतु स्थानिक पातळीवर सईद खान यांच्या उमेदावारीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या काही मित्र पक्षांमध्ये प्रचंड नाराजी होती. त्याचा फटका महायुतीची 65 मते फुटण्यात झाला. सईद खान पहिल्या पसंतीच्या मतांवर निवडून आले असले तरी महायुतीची मतं फुटल्याचे शल्य त्यांना टोचत आहे. महाविकास आघाडीकडे 102 एवढेच संख्याबळ असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डॉ. विवेक नावंदर यांना 169 तर अपक्ष सुशील देशमुख यांना 56 मते मिळाली.

सईद खान यांनी सगळी व्यवस्था चोख केल्यानंतरही त्यांना दगाफटका झाला. महायुतीची मतं फुटल्याबद्दलचा संताप खान यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला. एकनाथ शिंदे यांची शपथ घेत त्यांनी सोबत राहून गद्दारी करणाऱ्यांना सोडणार नाही, अशी धमकी वजा इशारा दिला.

यावेळी त्यांच्या समर्थकांकडून थेट आमदार राजेश विटेकर यांचे नाव घेतले गेले, मात्र सईद खान यांनी त्या कार्यकर्त्याला गप्प केले. मला पराभूत करण्यासाठी ज्यांनी सोबत राहून प्रयत्न केले, त्यांनी पुढे तुमच्यावर जेव्हा अशी वेळ येईल, तेव्हा याचा हिशेब केला जाईल, असे सुनावले. सईद खान यांचा रोख राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर यांच्याकडे होता.

परंतु या गद्दारीचा सगळा अहवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवण्यात येईल, तेच यावर काय तो निर्णय घेतील, अशी भूमिका घेत तुर्तास खान यांनी शांत राहणे पसंत केले आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने सईद खान यांचा करेक्ट कार्यक्रम लावला होता. परंतु आधीच अलर्ट असलेल्या खान यांनी प्रचाराची योग्य यंत्रणा राबवून होणारा दगाफटका पराभवापर्यंत पोचणार नाही, याची काळजी घेतली होती. मात्र येणाऱ्या काळात परभणी जिल्ह्यात आमदार सईद खान विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा संघर्ष अटळ दिसतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT