Parbhani Local Body Election Sarkarnama
मराठवाडा

Parbhani Local Body Election : बोर्डीकर, वरपूडकर, भांबळे, गुट्टे, जाधवांची प्रतिष्ठा पणाला; सात नगराध्यक्ष, 165 नगरसेवकांसाठी लावली ताकद...

Maharashtra local body elections : निवडणुकीत स्थानिक प्रश्न, विकासाची दिशा आणि पक्ष व अपक्ष नेत्यांचे व्यक्तिमत्त्व हे समीकरण ठरवणारे घटक ठरणार आहेत. नगरपालिकांच्या सातही ठिकाणच्या नगराध्यक्षपदाच्या लढती रंगतदार ठरणार आहेत.

Jagdish Pansare

Marathwada Politics : प्रचाराच्या तोफा रात्री दहा वाजता थंडावत आहेत, परभणी जिल्ह्यातील राजकीय वातावरण नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपाने आठवडाभर तापले होते. त्यानंतर आता जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर, माजी मंत्री भाजप नेते सुरेश वरपडूकर, माजी आमदार विजय भांबळे, आमदार रत्नाकर गुट्टे आणि खासदार संजय जाधव यांची पत सिद्ध करण्याचा दिवस उद्या उजाडणार आहे. प्रचाराचा धुराळा शांत झाल्यानंतर सात नगराध्यक्ष आणि 165 नगरसेवकांवर मतदानानंतर मोहोर उठवली जाणार आहे.

परभणी जिल्ह्यात स्थानिक पालकमंत्री दिल्यानंतर होत असलेल्या या पहिल्याच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीकडे वेगळ्या दृष्टीने पाहिले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला रोखण्यासाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मदत करण्याचा निर्णय आणि त्यासाठी पाथरीत भाजपच्या उमेदवारांना एबी फॉर्मच मिळू दिले नाही, असा आरोप पालकमंत्र्यांवर केला जात आहे. तिकडे पाथरीमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार बाबाजानी दुर्राणी, शिंदेच्या शिवसेनेचे सईद खान यांच्यातील संघर्ष हातघाईवर आला होता. राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे बोर्डीकरांशी असलेल्या संघर्षाचे उट्टे काढण्याच्या तयारीत आहेत.

महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे खासदार संजय जाधव, आमदार राहुल पाटील यांनी या निवडणुकीत काहीशी मवाळ भूमिका घेतल्याचे चित्र आहे. या सगळ्या राजकीय घडामोडी आणि वातावरणात उद्या पूर्णा, गंगाखेड, पाथरी, सेलू, मानवत, सोनपेठ आणि जिंतूर या नगरपरिषदांसाठी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वेळेत मतदान होणार आहे. जिल्ह्यातील सातही नगरपरिषद क्षेत्रांमध्ये मिळून 165 जागांसाठी 871 अर्ज दाखल झाले होते. माघारीनंतर 602 उमेदवार रिंगणात आहेत.

थेट नगराध्यक्ष पदांसाठी 89 पैकी 40 उमेदवारांनी माघार घेतली होती. आता 49 उमेदवारांमध्ये थेट सामना रंगणार आहे. महत्त्वाच्या नगरपरिषदांमध्ये राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांबरोबरच बंडखोर तसेच प्रभावी अपक्ष उमेदवारही जोरदारपणे रिंगणात असल्याने मतविभाजनाला चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही प्रभागांत पक्षांतर्गत समन्वय झाल्याने बंडखोरांना माघारी खेचण्यात यश आले असले तरी अनेक ठिकाणी बहुरंगी चुरस कायम आहे.

या निवडणुकीत स्थानिक प्रश्न, विकासाची दिशा आणि पक्ष व अपक्ष नेत्यांचे व्यक्तिमत्त्व हे समीकरण ठरवणारे घटक ठरणार आहेत. नगरपालिकांच्या सातही ठिकाणच्या नगराध्यक्षपदाच्या लढती रंगतदार ठरणार आहेत. गंगाखेडमध्ये यशवंत सेना - शहरविकास आघाडी, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात चौरंगी झुंज होत आहे. दुसरीकडे पूर्णा नगरपरिषदेतील चित्रही तेवढेच रंजक असून ठाकरेंची शिवसेना, यशवंत सेना, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी असे चारही संघटनात्मक गट चौरंगी संघर्षात उतरले आहेत.

पाथरीमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात तिरंगी सामना आकार घेत आहे. स्थानिक पातळीवरील गटबाजी आणि वैयक्तिक प्रभावांमुळे ही लढत अधिक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान मानवत नगरपरिषदेत चित्र वेगळे असून येथे राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना - भाजप युती असा दुरंगी मुकाबला होणार आहे.

सेलू नगरपरिषदेतील लढतही दुरंगीच असून भाजप आणि काँग्रेस आघाडी आमनेसामने आले आहेत. सोनपेठमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शहर परिवर्तन विकास आघाडी यांच्यात दुरंगी स्पर्धा रंगणार असून प्रभागनिहाय समीकरणे निर्णायक ठरणार आहेत. तर जिंतूरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांमध्ये थेट टक्कर आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT