

Parliament Sesssion : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. आज पहिल्या दिवशी राज्यसभेत उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन सभापतीपदाच्या आसनावर विराजमान झाले. त्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक सदस्यांनी स्वागत केले. सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही त्यांच्या खास शैलीत सभापतींना शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी आपल्या खासदारकीचाही मुद्दा काढला.
रामदास आठवले हे भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर गेलेले आहेत. सध्या त्यांच्याकडे केंद्रात राज्यमंत्रिपदही आहे. पण त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ पुढील वर्षी २ एप्रिलला संपत आहे. त्यामुळे त्यांच्याकडे जेमतेम चार महिने उरले आहेत. पुन्हा एकदा भाजपच्या कोट्यातून राज्यसभेत येत मंत्रिपद टिकविण्यासाठी त्यांची धडपड सुरू असल्याचे आजच्या त्यांच्या विधानावरून स्पष्ट झाले.
राधाकृष्णन यांचे स्वागत करता-करता त्यांनी हा मुद्दा काढला. आठवले म्हणाले, ‘तुम्ही इथे पाच वर्षे राहाल. माझे फक्त तीन-चार महिनेच राहिलेत. पण एप्रिलमध्ये मी पुन्हा येईन. कारण मोदीसाहेब मला पुन्हा आणणार आहेत. त्यानंतर सहा वर्षे मी इथे राहील.’ हे सांगत असताना सभागृह नेते व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हेही सभागृहात उपस्थित होते. त्यांच्याकडे पाहत आठवलेंनी आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवत आपल्याला पुन्हा राज्यसभेवर पाठविण्यासाठी त्यांच्याकडे एकप्रकारे शब्द टाकला.
आठवलेंसोबतच महाराष्ट्रातील एकूण सदस्यांची राज्यसभेची मुदत पुढील वर्षी २ एप्रिलला संपत आहे. त्यामध्ये भाजपचे भागवत कराड आणि धैर्यशील पाटील यांचा समावेश आहे. कराड हे २०२० पासून तर पाटील २०२४ पासून खासदार आहे. कराड यांना केंद्रीय राज्यमंत्रिपदही मिळाले होते. पाटील यांना मात्र जेमतेम दोन वर्षेच मिळाली आहेत. भाजपच्या कोट्यातील तीन जणांची मुदत संपत असल्याने त्यांना पुन्हा संधी मिळणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
आंबेडकरी चळवळीतील नेते म्हणून रामदास आठवले भाजपला हवे आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाच्या माध्यमातून ते महाराष्ट्रात अजूनही आपली ताकद टिकवून आहेत. त्यामुळे भाजपकडून त्यांना पुन्हा उमेदवारी दिली जाऊ शकते. मात्र, कराड आणि पाटील पुन्हा राज्यसभेत दिसणार की नाही, नव्या वर्षातच स्पष्ट होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.